
सुट्टी संपून शाळा सुरु होण्याच्या दिवसात सगळ्यात बोअर काय असतं माहितीये? धड शाळा नसते आणि धड सुट्टी नसते. मित्रांना घरी बोलवू शकत नाही कारण त्यांचे क्लासेस सुरु होतात. हवं ते खाता येत नाही कारण 'नेमकं शाळा सुरु होण्याच्या वेळी आजारपण नका काढू आता!' आईवडील सारख्या आपल्याला सूचना देऊन पिसाळून सोडतायत. 'यावर्षी सुरुवातीपासून अभ्यास कर.' वगैरे तर १ जूनपासूनच सुरु होतं. कधीही बोअर होतंय म्हटलं की ‘‘अभ्यास कर / पुस्तकं वाच / आधी तो फोन खाली ठेव’’ असलं काहीतरी सांगतायत. किंवा ‘आमच्या लहानपणी’ ची कॅसेट वाजवतायत.
खरं म्हणजे आपल्यालाही सुट्टीचा कंटाळा आलेला असतो, पण शाळा, रोज दप्तर, अभ्यास रुटीन पण नको वाटत असतं. त्यामुळे काहीच आपल्या मनासारखं होत नाही असं आपल्याला वाटतं.
पण हे सगळं आपल्याला वाटतंय तितकं खरंच वाईट आहे का? का यातपण थोडं थोडं चांगलं काहीतरी होतंय आणि आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत? ते ठरवायचं कसं? तर हॅपिनेस जार मधून! म्हणजे आनंदाची बरणी तयार करुन!
हेही वाचा!
डिंकाने नाही तर पाण्याने कागद चिकटवायचा का? हे कसं शक्य आहे?
काय करायचं, तर आईकडून एक छोटी बरणी मिळवायची. ती तुम्हाला कोणीच काचेची देणार नाही त्यामुळे ती प्लॅस्टिकची पण चालेल. त्याच्या झाकणाला एक छोटी फट तयार करायची. पिगी बँकला असते तशी. मग घरातले सगळे रंगीत कागद गोळा करायचे. घरात रंगीत कागद नसतील तर वॉटर कलर्सनी रंग देऊन, त्यावर डिझाईन काढून आपण ते कागद तयार करायचे. आणि मग, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते एका चिट्ठीवर लिहायचं. त्याची घडी करायची आणि त्या बरणीत टाकून द्यायची.
या चिठ्ठयांमध्ये काय काय असू शकेल?
१. बाल्कनीत ठेवलेल्या पाण्यात चिमण्या येऊन अंघोळ करून गेल्या.
२. रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्याला पोळी घातल्यामुळे त्याची तुमची दोस्ती झाली.
३. आज छान चित्र काढता आलं.
४. आज मी पहिल्यांदाच पोळी केली.
असलं काहीही छान घडलेलं तुम्ही त्या चिट्ठीवर लिहू शकता. आता या बरणीचं काय करायचं? तर ती सांभाळून ठेवायची. तिच्याकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला सगळंच काही वाईट घडत नाहीये. काही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला.


