मनासारखं घडलं नाही तर राग येणारच. पण तो येवू नये म्हणून काय करायला हवं?

 Image: freepik

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीच तुमच्या मनासारखं होत नाही? म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला होता, पण नेमकं परीक्षेच्या वेळी बरं नव्हतं म्हणून चांगले मार्क्स मिळाले नाहीत... किंवा तुम्ही खरंच गृहपाठ केला होता, पण तुम्ही खरंच वही घरी विसरलात आणि मग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली... किंवा तुम्ही मित्र/मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीला जाण्यासाठी तुमच्या सगळ्यात आवडत्या नवीन ड्रेसला इस्त्री करायला घेतलीत आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि त्या गडबडीत नेमकं त्याचं वरचं नेट जळलं आणि आता तो ड्रेस तुम्ही पुढे कधीच घालू शकत नाही

जाऊदे. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत सारख्या घडत असतात आणि त्यामुळे आपली त्या त्या वेळी भयंकर चिडचिड पण झालेली असते. आणि सारखं सारखं असं व्हायला लागलं की आपल्याला वाटतं, की अशा सगळ्या गोष्टी फक्त माझ्याच बाबतीत होतात. इतर सगळ्यांचं सगळं छान होतं. त्यांची किती मजा होते आणि मलाच फक्त हवं तसं मिळत नाही, माझ्याच बाबतीत मनासारखं काही घडत नाही. असे विचार यायला लागले की मग आपली कोणत्याही गोष्टीवरुन चिडचिड होते. लहान भावंडाने आपल्या गोष्टींना हात लावल्यावर आपण त्यांच्यावर चिडतो, आईने किंवा बाबाने छोटीशी सूचना केली तरी वैतागतो, मोठ्यांनी सांगितलेलं काम नकोसं वाटतं. आपल्याला आवडतं तेही करावंसं वाटत नाही. सतत चिडचिड आणि रागराग होतो. 'आपलं लकच खराब' म्हणूनच असं होतं असं वाटायला लागतं. आणि असा विचार केला तर होणारा त्रास आणखीनच वाढतो.

हेही वाचा!

पण आपल्याला जरी असं वाटत असलं तरी ते काही खरं नसतं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात हेही खरं नसतं आणि आपल्या बाबतीत सगळं वाईटच घडतं हेही खरं नसतं. पण ज्यावेळी काहीतरी असं मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते हँडल कसं करायचं ते आपल्याला कळत नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. आणि त्यावरचं उत्तर आहे, 'तरी बरं! आपल्या मनासारखं घडलं नाही, तर स्वत:ला दोष देण्यापेक्षा , इतरांवर विनाकारण चिडचिडण्यापेक्षा 'तरी बरं ' असं स्वत:च स्वत:ला सांगायचं. असं सांगितलं की काय जादू घडते ते पाहा!

'तरी बरं'ने होईल काय?

प्रत्येक वेळी असं काही तरी झालं की त्याहून काय वाईट घडलं असतं त्याचा विचार करायचा आणि स्वत:ला सांगायचं की, ‘तरी बरं, इतकं वाईट काही घडलं नाही!’ 'भलेही आज इस्त्री करताना ड्रेस जळाला, तरी बरं माझा हात भाजला नाही.' 'यंदा सुटीत गावाला जाण्याचा प्लॅन बाबांना अचानक काम आल्यानं रद्द करावा लागला, तरी बरं आईने वेळ काढून खूप ठिकाणी तिच्यासोबत फिरायला नेलं!'

काहीही घडलं तरी आपण 'तरी बरं' असं म्हणत याच्यापेक्षा काय वाईट घडलं असतं, आणि बरं झालं ते आपल्याबाबतीत नाही घडलं.. असा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कमी त्रास होतो. झालेला त्रास आपण लवकर विसरतो

 Image: freepik

परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो ना! बघा प्रयत्न करून!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact