रिया आणि अयानने एक डझन पतंगांना मंगळसूत्र बांधून ठेवली होती. आपापल्या पालकांशी भांडून खूप महागाच्या नायलॉनच्या मांजाची चक्री आणली होती. आणि दोघंही संक्रांतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजताच बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन वारं सुटायची वाट बघत बसले होते.

चार दिवसांपूर्वी त्यांचं शेजारच्या बिल्डिंगमधल्या सूरज आणि केदारशी जोरदार भांडण झालेलं होतं. म्हणजे झालं असं, की रियाने सूरजला विचारलं की पतंग आणायला आपण बरोबर जायचं का? आणि त्यावर सूरज आणि त्यावेळी त्याच्या शेजारी उभा असलेला केदार तिला सॉलिड हसले होते. एक म्हणजे दोघं रिया आणि अयानपेक्षा दोन वर्षांनी मोठे होते. रिया दहा वर्षांची होती आणि सूरज आणि केदार बारा वर्षांचे होते. त्यामुळे त्या दोघांना कायम रिया आणि अयान लहान आणि बावळट वाटायचे. त्यात रिया पतंग उडवणार म्हंटल्यावर तर त्यांना हसू आवरेना.
खूप हसून झाल्यावर सूरज म्हणाला,“तू??? तू पतंग उडवणार?”
केदार म्हणाला, “अरे उडवणार नसेल ती… बनवणार असेल. आपल्याला नाही का बालवाडीत असतांना शिकवायचे… खराट्याच्या काड्यांचा पतंग…”
“अरे हो… रियाला या वर्षी शिकवलं असेल नाही का? तू कुठल्या बालवाडीत आहेस गं? लहान की मोठ्या?”
या वर्षी चौथीत असलेली रिया अर्थातच भयंकर चिडली होती. तिने त्या दोघांना धरून चांगले टोले द्यायचा प्रयत्न केला होता आणि शेवटी “हिंमत असेल तर संक्रांतीला पेच खेळून दाखवा.” असं खुल्लं चॅलेंज देऊन परत आली होती.
हेही वाचा!
घरभर पूर, दूधही नासलं, ग्लोबल वार्मिंग घरात कसं घुसलं?
सूरज आणि केदार ती गेल्यानंतर पण खूप वेळ हसत होते. त्यात त्यांना दोन दिवसांनी समजलं की रिया आणि अयान मिळून पतंग उडवणार आहेत. मग तर त्यांना काय बोलावं तेच कळेना. अयानला मागच्या वर्षी त्यांनी एकदा पतंग धरायला दिला होता. त्याने वरच्या हवेला लागलेला पतंग तीन मिनिटात खाली आपटवला होता. आणि रियाला मागच्या वर्षी शेवटपर्यंत पतंग वर सोडता आला नव्हता. आणि हे दोघं मिळून पतंग उडवणार? आणि आपल्याशी पेच खेळणार???
संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूरज आणि केदार एकीकडे रिया आणि अयानला हसत होते. आणि दुसरीकडे त्यांचा पतंग उडवायची तयारी करत होते. त्यांना बराच वेळ वाटत होतं की त्या दोघांच्या मदतीला कोणीतरी मोठं येणार आहे. पण नऊ वाजून गेले, तरी समोरच्या गच्चीत रिया आणि अयान दोघंच दिसत होते. साडेनऊ होऊन गेले तशी हवा सुटायला लागली. सूरज आणि केदारने पतंग उडवायची तयारी करेपर्यंत रिया आणि अयानचा पतंग उंच आभाळात गेलेला होता. सूरज आणि केदारला कळेचना की हे झालं कसं?
आणि त्यांची तोंडं बघून रिया आणि अयानला सॉलिड मजा येत होती. कारण रिया आणि अयान मागच्या रविवारी पतंग बनवून उडवायच्या शिबिराला गेले होते, आणि तिथून छान पतंग उडवायला शिकून आले होते. आणि ते सूरज आणि केदारला माहिती नव्हतं.
पण त्यांनी थोड्याच वेळात स्वतःला सांगितलं की रिया आणि अयानचा एखादा पतंग उडाल्याने काही होत नाही. हवा चांगली असेल तर चुकून कोणाचाही पतंग उडू शकतो. त्यांना पेच खेळायला येऊ दे. मग कळेल गंमत. आणि मग त्या दोघांनी पण पतंग उडवला. त्यांचाही पतंग रिया आणि अयानच्या पतंगाच्या जवळ गेला. आता पेच होणार असं दिसायला लागलं.
रिया पतंग उडवत होती. अयान चक्री धरून उभा होता. त्या दोघांनी प्रत्यक्षात कधीच पेच खेळलेला नव्हता. त्यामुळे ते दोघं एकमेकांना धीर देत होते. पण रियाला वाटलं त्यापेक्षा तिचा पतंगावर कंट्रोल चांगला होता. ती लक्ष देऊन पतंग उडवत होती आणि तेवढ्यात अयान जोरात ओरडला, “रिया! ते काय आहे बघ तिकडे!”
आधी रियाला तो काय म्हणतोय ते कळलं नाही. ती म्हणाली,
“ते जाऊदे. तू ढील दे अजून.” आणि एकदम तिच्या हाताला ढील जाणवली. तिने मागे बघितलं, तर अयानने चक्री सोडून दिली होती आणि तो आ वासून आकाशाकडे बघत होता. आकाशात त्यांच्या पतंगाच्या दिशेने एक मोठ्ठा काळा ढग सुसाट वेगाने येत होता.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


