- डॉ. वैशाली देशमुख

Image: freepik
तुमच्यासारख्याच एका किशोरवयीन मुलाची ही गोष्ट. त्याला आपण समीर म्हणूया. तो राहायचा त्या सोसायटीत त्याच्या वयाची खूप मुलं-मुली होती. लहानपणी सगळे एकत्रच धुडगूस घालायचे. पण आजकाल मात्र त्यांचा फक्त मुला-मुलांचा ग्रुप झाला होता. मुली जरा वेगळ्या, घोळक्यानं गप्पा मारत असायच्या.
समीरची आणि तनिशाची शाळा एकच होती, ते एकाच व्हॅननं जायचे. त्यादिवशी इतर सगळ्या शाळांना सुट्टी होती. त्यामुळे ते दोघंच व्हॅनची वाट बघत उभे होते. इकडे तिकडे बघत असताना एकदम समीरच्या लक्षात आलं की तनिशाच्या युनिफॉर्मच्या स्कर्टला लालसर डाग पडलाय. आधी त्याला काही कळलंच नाही. मग त्याला आठवलं. त्याची ताई एकदा शाळेतून लवकर घरी आली होती, तेव्हा तिच्याही स्कर्टला डाग पडला होता. ती खूप घाबरून, गोंधळून गेली होती. आई तिला आत घेऊन गेली होती आणि मग बऱ्याच वेळानं त्या दोघी बाहेर आल्या होत्या. समीरच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून आईनं त्याला जवळ घेऊन त्यावेळी काही माहिती दिली होती. ती त्याला आत्ता आठवली.
हेही वाचा!
समीरने काय केलं ?
समीरला आठवलं ,आई म्हणाली होती, की वयात येताना जसे मुलांमधे बदल होतात तसेच मुलींमध्येही होतात, मुख्यत: प्रजननसंस्थेमधे. मुलींच्या प्रजननसंस्थेचा प्रमुख भाग म्हणजे गर्भाशय (uterus). दर महिन्याला त्यामध्ये एक अस्तर तयार व्हायला लागतं आणि महिन्याच्या शेवटी ते बाहेर टाकलं जातं. तो द्राव लालसर रंगाचा असतो. त्या द्रावामुळे कपडे खराब होऊ नयेत म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात. त्याच्या जाहिराती तर समीरनं बघितल्याच होत्या टीव्हीवर. तो धीर एकवटून तनिशाजवळ गेला आणि स्कर्टकडे बोट दाखवून तिला म्हणाला, “तुला घरी जायला हवं, तनिशा. कपडे बदलायला लागतील तुला.” त्याचं बोलणं अगदी शांत होतं पण तनिशा साहजिकच एकदम घाबरली. तिचा चेहरा संकोचानं लाल झाला. 'अं, पण माझ्या घरी तर कुणी नाहीये. आता?' समीरनं क्षणभर विचार केला. 'माझ्या घरी येतेस? आई आहे घरी.' ते समीरच्या घरी गेले आणि मग आईनं गोष्टी हातात घेतल्या.
हेही वाचा!
त्या रात्री आईनं त्याला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, 'मला खूप अभिमान वाटला तुझा आज, समीर. तुला माहितेय, आपला जन्म स्त्रियांच्या प्रजननसंस्थेतून होतो. आपण सगळ्यांनीच आदर करायला हवा या संस्थेचा. पण मुलांना अनेकदा याची कल्पना नसते, मग ते बसतात चिडवत. पण तू आज जे वागलास ना, त्यातून तुझी जबाबदारी आणि समज दिसली.' आईच्या डोळ्यातलं समाधान बघून समीरला खूप बरं वाटलं.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact