गोष्टीची पुस्तकं, खेळणी यापेक्षा तिला आवडतो कॅमेरा आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफी!

 

लहानपणापासून आपल्याला कसली ना कसली आवड असते. जसं मोठं होत जातो तशी आपली आवडही बदलते किंवा तीच राहाते. शाळेत जायला लागलं की अनेकांच्या बाबतीत आवड मागे पडते आणि अभ्यास पुढे पळतो. अभ्यासाच्या मागे धावता धावता आवडीचा विसर पडतो. अनेकदा आई बाबाही आवडीच्या तुलनेत अभ्यासाकडेच लक्ष दे असं सांगत राहातात. पण श्रेयोवी मेहताच्या बाबतीत मात्र असं अजिबात झालं नाही. आज ती फक्त अकरा वर्षांची आहे पण या वयात ती उत्तम वाइल्डलाइफ फोटोग्राफी करते. श्रेयोवी शाळेत जाते, अभ्यास करते पण त्याआधी तिला जे आवडतं त्यासाठी ती आवर्जून वेळ काढते, सराव करते. जे आवडतं ते उत्तम करण्यासाठी त्यातले बारकावे मन लावून शिकते.
वन्यजीव, निसर्ग आणि कॅमेरा या तीन गोष्टी श्रेयोवीला फारच प्रिय. तिच्या आईबाबांनी तिला कधी गोष्टीची पुस्तकं आणून दिली नाही. कारण लहानपणापासून श्रेयोवीला वन्यजीवांचे, निसर्गाचे निरीक्षण करण्याची आणि कॅमेरा शिकण्याची आवड होती. श्रेयोवी चालायलाही शिकली नव्हती तेव्हापासून जंगलं फिरणाऱ्या आपल्या बाबांसोबत जंगलात जायची. श्रेयोवीचे बाबा शिवांग मेहता वाइल्ड लाइफ फोटोग्राफर. वन्यजीव छायाचित्रकार. ते सतत देश विदेशातील अभयारण्यात प्राण्यांचे फोटो काढण्यासाठी जात. सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आईबाबा आणि कॅमेरा हे तिच्या अवतीभवती होतंच. श्रेयोवी एबीसीडीही शिकलेली नव्हती तेव्हा तिला जंगलातल्या विविध प्राण्यांची नावं, परफेक्ट शाॅट घेण्याच्या टेक्निक्स या गोष्टी तिच्या कानावर पडायच्या. त्यामुळे कॅमेरा तिला आवडू लागला. लहानपणापासून तिला कॅमेऱ्याचा लळा लागला. बाबांसारखा आपल्याही हातात कॅमेरा असावा असं तिला वाटू लागलं.

हेही वाचा!

८ वर्षांचा रणवीर एआय तज्ज्ञ म्हणून भाषण करतो तेव्हा!

श्रेयोवीचे आई बाबांची 'नेचर्स वंडररर्स'नावाची वाइल्ड लाइफ फोटोग्राफी टूरिझम कंपनी आहे. त्यामुळे देश विदेशतातल्या अभयारण्यात, जंगलात फिरणं त्यांच्यासाठी नेहमीचंच. गळ्यात कॅमेरा अडकवलेल्या आपल्या बाबांकडे श्रेयोवी पाहायची, ते नैसर्गिक अधिवासातील प्राण्यांची अचूक हालचाल टिपण्यासाठी किती संयम राखतात, त्यांनी काढलेले फोटो कसे परफेक्ट असतात याकडे तिचं लक्ष असायचं. फोटोग्राफीचं बाळकडू तिला असं घरातून तिच्या बाबांकडून मिळालं. श्रेयोवी फक्त दोन वर्षांची होती तेव्हा तिने तिच्या वडिलांच्या डीएसएलआर कॅमेऱ्याला हात लावला.

 

फोटोग्राफ्री, वन्यजीव यातली रुची वाढू लागल्यावर श्रेयोवीलाही सतत बाबांसोबत जंगलात जाण्याची उत्सुकता असायची. तिच्या बाबांनीही तिच्या या आवडीला खतपाणीच घातलं. श्रेयोवी चार वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला पहिल्यांदा स्वतंत्रपण कॅमेरा वापरुन फोटो काढण्याची संधी दिली. तिला तिचे बाबा तर मार्गदर्शन करायचेच पण श्रेयोवीलाही हातातला कॅमेरा वापरुन अनेक प्रयोग करुन पाहायचे असायचे. ती सहा वर्षांची होती तेव्हा तिला स्वत:चा पहिला प्रोफेशनल कॅमेरा मिळाला. ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सुरुवातीला लहानशा श्रेयोवीला कॅमेऱ्याचं वजन पेलायचं नाही. पण नेचर वंडररर्समधील तज्ज्ञ माणसं तिला मार्गदर्शन करायची. त्यातूनच श्रेयोवी कॅमेऱ्याचे बारकावे, उत्तम फोटोग्राफीचे तंत्र शिकली. १० वर्षांची होईपर्यंत केनयामधील मसाई मारा अभयारण्यासह ती १० अभयारण्यात फिरुन आली. तिथे फोटोग्राफी करुन आली. वर्षातले ३० ते  ४०  दिवस श्रेयोवी आपल्या बाबांसोबत जंगल सफारी आणि वन्यजीव छायाचित्रणाच्या मोहिमेवर असते. फोटोग्राफी करत जंगलं पालथी घालणं ही गोष्ट श्रेयोवीच्या बाबांसाठी सहज होती पण लहानग्या श्रेयोवीसाठी मात्र ते अवघड काम होतं. पण ती स्वभावाने हट्टी आणि धडपडी. अंगात चिकाटी आणि फोटोग्राफीची आवड यामुळे तीही बाबांसोबत जंगल तुडवायची. डोंगरावरचे चढउतार सहज पार करायची.

आठव्या वर्षापासून श्रेयोवी पहाटे साडे चार वाजता उठू लागली. शाळेत जाण्याआधी कॅमेऱ्याचा सराव करु लागली. पहाटे पाच ते सहा ती नेचर वंडररर्स संस्थेतील तज्ज्ञांसोबत सराव करायची. नियमित सरावाने श्रेयोवीच्या अंगी शिस्त आणि संयम हे दोन्ही गुण रुजले ज्याचा तिला पुढे उत्तम फोटोग्राफी करण्यासाठी उपयोग झाला. तिचे आई बाबा शनिवारी रविवारी तिला तिची फोटोग्राफीची आवड फुलवण्यासाठी फरीदाबादमधील पाणथळीच्या जागी किंवा मोकळ्या जागी घेऊन जायचे. २०२३ मध्ये भरतपूर येथील अभयारण्यात ती, तिचे बाबा आणि नेचर वंडररर्समधील सदस्य गेले होते. पहाटे श्रेयोवी फेरफटका मारण्यासाठी सगळ्यांसोबत बाहेर पडली. ते ज्या रस्त्यावरुन जात होते तो रस्ता जंगलातली पायवाट होती. नुकताच सूर्योदय झाला होता. सूर्याची कोवळी किरणं पांगलेली होती. आकाशात पहाटेचा प्रकाश पसरलेला होता. त्या जंगलाच्या पायवाटेवर डोक्यावर झाडांची कमान होती. तितक्यात श्रेयोवीला दोन लांडोर दिसलेत. या दृष्याचा फोटो काढायला हवा हा विचार डोक्यात चमकता क्षणीच श्रेयोवी जमिनीवर झुकली. तिने कॅमेऱ्याचा ॲंगल सेट करुन पोझिशन घेतली. तिने त्या लांडोरांचा फोटो काढला. त्या फोटोत एक नीलगायही आली. एरवी मोठ्यांच्या नजरेला नीलगाय दिसलीच नसते पण श्रेयोवीला ती दिसली आणि तिने ती आपल्या फोटोत आणली. या तिच्या फोटोला नॅचरल हिस्टरी म्युझियम लंडनचा  ६० वा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर द इयर नावाचा पुरस्कार मिळाला. एवढ्या लहान वयात असा पुरस्कार मिळवणाऱ्या श्रेयोवीच्या फोटोग्राफीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागच्या वर्षी ती 'नॅचरल हिस्टरी म्युझियम पाहायला गेली होती. तेथील छायचित्र प्रदर्शनात लावलेले फोटो पाहून श्रेयोवी भारावून गेली. आपल्यालाही अशीच फोटोग्राफी करायची अशी श्रेयोवीची तीव्र इच्छा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact