माणसांप्रमाणे रॅकून्सलाही कोडी सोडवायला आवडतात? हे प्राणी एवढे हुशार कसे?

Image: freepik

माणसं हुशार असतात. अडचण आली की त्यातून मार्ग काढतात. संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधतात. पण हे फक्त माणसंच करतात असं नाही तर प्राणी देखील करु शकतात. रॅकून नावाच्या प्राण्याला अडचणीतून मार्ग शोधायला खूप आवडतं. रॅकूनकडे असणारी हुशारी शास्त्रज्ञांनी प्रयोगातून सिध्द करुन दाखवली आहे. रॅकून हे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात आढळतात. डोळ्यांभोवती काळे डाग आणि गोलाकार पट्टेरी शेपटी असलेला निशाचर प्राणी म्हणजे रॅकून. हा प्राणी प्रामुख्याने त्यांच्यातल्या हुशारीसाठी म्हणूनच ओळखले जातात. त्यांना स्वच्छता तर एवढी आवडते की ते खाण्यापूर्वी त्यांचं अन्नही पाण्यात धुतात. शास्त्रज्ञ म्हणतात की खाताना अन्नाची स्पर्श संवेदना वाढवण्यासाठी ते असं करतात.

 

हेही वाचा!

प्राण्यांना कुठे विचार करता येतो पण रॅकून्सला करता येतो!

रॅकून्स आणि पझल बाॅक्सचा प्रयोग

  • रॅकून्सना कोडी सोडवायला खूप आवडतात. या त्यांच्यातल्या कौशल्यामुळेच जिथे माणसं राहतात त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितपणे राहता येतं. हे रॅकून्स जेव्हा अन्नाच्या शोधात असतात तेव्हा कुलुप ,बटणं, कड्या कशा उघडायच्या हे शोधतात. ही माहिती ते त्यांच्याकडे साठवून ठेवतात आणि त्याचा उपयोग ते भविष्यात तशीच परिस्थिती निर्माण झाली की करतात. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियाच्या शास्त्रज्ञांनी रॅकूनवर केलेल्या प्रयोगातून हे दिसून आलं आहे.
  • शास्त्रज्ञांनी रॅकून्सच्या हुशारीबद्दल जो अंदाज बांधला होता तो तपासून पाहण्यासाठी प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी तीन 'पझल बाॅक्स' तयार केले. प्रत्येक बाॅक्सच्या आतमध्ये पाहता येत होतं. प्रत्येक बाॅक्स उघडण्यासाठी तीन बाॅक्समध्ये स्वतंत्र मार्ग ठेवलेले होते. हे मार्ग कोणते हे रॅकून्सला शोधून काढायचे होते. रॅकून्सने पझल बाॅक्समध्ये जाऊन ते मार्ग शोधावे यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून बाॅक्सच्या आत मार्शमॅलो नावाचा पदार्थ ठेवला गेला. हा पदार्थ पाहून रॅकून्स तो बाॅक्स उघडण्याचा प्रयत्न करतील असं शास्त्रज्ञांना वाटलं होतं.
  • त्याआधीच्या एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी जेव्हा पझल बाॅक्स वापरले होते तेव्हा त्यांनी या बाॅक्समधे शिरण्यासाठी एकच मार्ग ठेवलेला होता. फक्त प्रत्येक वेळी त्यांनी प्राण्यांसाठी वेगवेगळं बक्षीस ठेवलं होतं. पण या प्रयोगात प्रत्येक पझल बाॅक्ससाठी शास्त्रज्ञांनी मार्शमॅलो हा एकच पदार्थ ठेवला होता. रॅकूनने बाॅक्समध्ये शिरल्यानंतर मार्शमॅलो खाऊन झाल्यानंतरही बाॅक्सचं निरीक्षण करावं, बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा हा शास्त्रज्ञांचा उद्देश होता. या प्रयोगाचे निष्कर्ष शास्त्रज्ञांनी रॅकूनच्या हुशारीबाबत जो विचार केला होता तो बरोबर होता हे सिध्द करणारे ठरले.

Image: newsforkids

  • रॅकून्स पझल बाॅक्समध्ये जायचे, आत ठेवलेले मार्शमॅलो खायचे. खाल्ल्यानंतर तो बाॅक्स धुंडाळण्यास सुरुवात करायचे. बटन, कडी, कुलुप कसे उघडायचे हे शोधायचे. असा प्रयत्न करताना त्यांच्यासमोर मार्शमॅलो नसायचा. तो तर त्यांनी आधीच खाऊन टाकलेला असायचा. म्हणजे केवळ तो पदार्थ खाण्यासाठी ते पझल बाॅक्समध्ये यायचे नाही तर त्यांना त्यापेक्षा काही अधिक शोधायचं असायचं.
  • शास्त्रज्ञांना हे अपेक्षितच नव्हतं की रॅकून्स हे तिन्ही पझल बाॅक्स एका प्रयत्नात उघडतील. त्यांना एवढंच पाहायचं होतं की मार्शमॅलो नसताना ते बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग शोधता का? आणि हे रॅकून्स हा मार्ग खरंच शोधतात. या प्रयत्नातून ते आपल्याकडे माहिती साठवतात. हे रॅकून्स कधी आणि कसा विचार करतात हे मात्र शास्त्रज्ञांना कळू शकलं नाही. पण रॅकून्सला अन्नापेक्षाही काहीतरी असं आहे जे रॅकून्सना जास्त आवडतं. ते काय हे शास्त्रज्ञांना या प्रयोगातून समजलं. माणसांना ज्याप्रमाणे कोडी सोडवायला, मार्ग काढायला आवडतं तसंच रॅकून्सलाही ते आवडतं. समस्या सोडवण्याचे नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न रॅकून्स करतात . त्यांच्या आवडीचं अन्न समोर नसलं तरी ते करतात. रॅकून्सकडे असलेल्या या कौशल्यामुळेच रॅकून्स शहरात माणसं अवती भवती असताना सुरक्षितपणे राहू शकतात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact