
गणिताचं नाव काढलं तरी धडकी भरते असा अनुभव अनेक मुलं सांगतात. तर्कबुध्दी, समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित करणारा गणित हा खरंतर खूप महत्त्वाचा विषय आहे. पण प्राथमिक इयत्तातच गणिताने मुलांना घाम फुटो आणि ही मनात बसलेली ही गणिताची भीती वेळीच घालवली नाही तर ही भीती मोठ्या वर्गातही कायम राहाते. या भीतीला शास्त्रीय भाषेत 'मॅथस ॲंक्झायटी' म्हटलं जातं. ही मॅथस ॲंक्झायटी केवळ गणित नावडण्यापुरती नसते. ही भीती म्हणजे तीव्र भावनिक प्रतिक्रिया असते. ताण, भीती, अस्वस्थता, टाळाटाळ या सर्व गोष्टी गणिताच्या अभ्यासाला चिकटलेल्या असतात. ही मॅथस ॲंक्झायटी गणित विषयाशी निगडित वागण्यातूनही दिसते.
गणिताची भीती वागण्यातून दिसते तेव्हा..
१. गणिताच्या पेपरला गोठून गेल्यासारखं होणं. आपल्याला काहीच येत नाही असं वाटत राहाणं.
२. गणिताच्या अभ्यासाची टाळाटाळ करणे.
३. गणिताची साधी योपी उदाहरणं सोडवतानाही आत्मविश्वास नसणं.
४. गणिताच्या तासाला अस्वस्थ आणि चिंताग्रस्त वाटणं.
हेही वाचा!
गणित विषय अजिबात आवडत नाही. नापास होण्याची भीती वाटते?
गणिताची भीती का वाटते?
प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाची गणिताची भीती वाटण्याचं कारण वेगळं वेगळं असू शकतं.
गणित हा विषय सोपा सहज वाटण्यासाठी आधी या विषयाचा पाया पक्का असायला हवा. आकड्यांची समज, त्यांचं मूल्य, प्राथमिक अवस्थेतील गणिती प्रक्रिया हे समजून घेण्यात तारांबळ उडत असेल, अडचण जाणवत असेल तर गणित शिकणं अवघड होऊ शकतं. बेरीज वजाबाकी अवघड वाटणं, गुणाकार-भागाकाराच्या क्रिया करताना गोंधळून जाणं, शाब्दिक उदाहरणं न कळणं या अडचणींमुळे गणित अतिशय कठीण वाटू लागतं.
गणिताला घाबरतच बसलो तर..?
१. एका गणित या विषयाची एवढी धास्ती घेतली तर जे विषय चांगले येतात त्यातही कामगिरी सुमार होते. सोप्या वाटणाऱ्या विषयातही कमी मार्क्स मिळतात.
२. गणित अवघड आहे, गणित अवघडच जातं असा मनाचा पक्का समज करुन घेतल्याने पुढे जाऊन गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान हे विषय अवघड वाटतात, नकोसे होतात.
३. आपल्याला गणितं सोडवता येत नाही, गणित अवघड जातं म्हणजे आपल्याला काहीच येत नाही असं वाटतं. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.

गणित पक्कं करण्यासाठी काय करायचं?
गणित सरावाने, योग्य मार्गदर्शनाने आणि गणिताबद्दल आपले विचार सकारात्मक म्हणजेच 'पाॅझेटिव्ह' ठेवल्याने जमू शकते.
१. गणितासाठी तंत्र समजणं महत्त्वाचं योग्य तंत्रानं अभ्यास केल्यास गणित सोपं होऊ शकतं.
२. गणिताची भीती आणि नावड बाजूला ठेवून गणिताचा पाया पक्का करावा. संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. गणिताच्या पुढच्या संकल्पना समजून घेण्यासाठी आधीच्या संकल्पना समजून घ्याव्यात. संकल्पना समजून घेतल्याने मनातल गोंधळ काढून टाकता येतो.
३. पुस्तकातलं गणित सोपं करण्यासाठी गणित हा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी जोडायला हवा. वस्तू खरेदी करताना त्यावरील डिस्काउंट आणि मूळ भाव याचा हिशेब करुन पाहावा, स्वयंपाकघरात आई आजीसोबत पदार्थांसाठी वस्तू मोजून मापूण घेण्याच्या कामात सहभागी होणं या गोष्टींमुळे गणिताच्या संकल्पना सोप्या होतात. गणित या अवघड विषयाचं आपल्या रोजच्या जगण्यात काहीच काम नाही असं न वाटता गणित हा विषय आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित असतं याचा अनुभव येतो.
४ . मला गणित येत नाही, अवघड जातं असं न म्हणता मी गणित समजून घेईन, सराव करेन, गणितातही चांगले गुण मिळवेन असं स्वत:च स्वत:ला सांगत राहावं.
५. गणिताबद्दल आवड निर्माण होणारे खेळ खेळावेत. गणिताची कोडी, सांख्यिकी कोडी, फ्लॅशकार्ड यासारखे खेळ खेळावेत.
६. गणितं सोडवताना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक, पालक, मित्र मैत्रिणी यांची मदत घ्यावी.
७. मी किती वेळात किती गणितं सोडवली यापेक्षा गणिताच्या संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा.
८. गणिताचे यूट्यूब व्हिडीओही असतात. ते पाहून गणित जमू शकतं. यासाठी आई बाबांची परवानगी घेऊन गणिताचे व्हिडीओ पाहावेत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


