काय वाचाल?
- ऋषिकेश दाभोळकर

शाळेत जो इतिहास आपण शिकतो तो बऱ्याचदा फक्त राजकीय इतिहास असतो. वेगवेगळे राजे, राण्या त्यांची राज्यं, त्यांच्यातल्या लढाया, युद्ध, स्वातंत्र्यसंग्राम. हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण इतिहास हा काही फक्त राजांचा नसतो तर तो तुमचं माझा सगळ्यांचा असतो. असाच इतिहासाकडे वेगळ्या प्रकारे बघायला उद्युक्त करणारी ‘इतिहासाची धुळाक्षरे’ ही पुस्तक-मालिका मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. आत्तापर्यंत या मालिकेतली पहिली तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ती आहेत १. देशाची फाळणी २. देशाची भाषा ३. देशाचे लोक.
देशाची फाळणी या पुस्तकात भारत-पाकिस्तान फाळणीची कथा, त्यामागील कारणं आणि त्याचा सर्वसामान्य लोकांवर झालेला परिणाम यावर भर दिला आहे. यासाठी बंगालातील गोष्टींवर अधिक फोकस आहे. देशाचे लोक या या पुस्तकात नागरिकत्व, स्थलांतर आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा आहे. तर देशाची भाषा मध्ये राज्यांची निर्मिती करताना भाषा वादाचा विषय कसा ठरला, भाषावार प्रांतरचना कशी घडली यासंबंधीचा इतिहास आहे. या पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाची भाषा. अतिशय रंजक पद्धतीने, इतिहास लेखनाची पथ्ये सांभाळून सोप्या भाषेत मुलांना या विषयाची माहिती ही पुस्तकं करून देतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकांतली चित्रं. गोंड शैलीत काढलेली रंगीत चित्रं या पुस्तकांना वेगळा आयाम देतात. मूळ बंगालीत लिहिलेल्या या पुस्तकांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ इन्फोसिस फाऊंडेशन अवॉर्ड विजेते ‘प्राची देशपांडे’ यांनी चोख केला आहे ही या पुस्तकांची आणखी एक जमेची बाजू. आधुनिक भारताचा इतिहास मुलांपर्यंत पोचवणारी ही पुस्तकं वाचून मुलांना खूप प्रश्न पडतील आणि त्यांची उत्तरं शोधायला ती आणखी पुस्तकं शोधून वाचतील अशी खात्री वाटते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


