नवीन मित्र मैत्रिणी शोधण्यासाठी बाहेर पडा, प्रयत्न करा, जमवून घ्या !

मी काय करु?

- गौरी पटवर्धन

Image: freepik

तुम्हाला भरपूर मित्रमैत्रिणी आहेत हे तर खरंच आहे. पण तरीही… खरं खरं सांगा… तरीही जर का त्यांच्याशी भांडण झालं तर 'आता खेळायला कोणीच उरलं नाही' असं तुमचं होतं का? असं सगळ्यांचंच कधी ना कधी होतं. खरं म्हणजे आपल्याला खूप वेळा असं वाटत असतं, की आपल्याला या मुलांशी खेळायला मजा येत नाहीये, पण तरीही आपण त्यांच्याशीच जमवून घेत राहतो. असं जमवून घेणं ही एक चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचबरोबर 'आपल्याला खेळायला नवीन मित्रमैत्रिणी मिळवता येणं' हेही आपण शिकलं पाहिजे.

आता हे नवीन मित्र मैत्रिणी कुठे भेटू शकतात? तर सुट्टीतल्या शिबिरात, एखाद्या छंदवर्गात, मैदानावर किंवा अगदी आपल्याच गल्लीत किंवा कॉलनीतसुद्धा आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी भेटू शकतात. पण आपण त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतात.

म्हणजे एखाद्या दिवशी चक्क असं करून बघा. जरा उन्हं उतरली की बाहेर पडायचं, शेजारपाजारच्या सगळ्या घरांचं दार वाजवायचं आणि विचारायचं की “तुमच्या घरात आमच्या एवढी मुलं आहेत का? ती खेळायला येतील का आमच्याशी?” १० ठिकाणी विचारलंत तर तुम्हाला २ नवीन मित्र नक्की सापडतील. नवीन मित्र करण्यातली सगळ्यात मोठी गंमत ही असते की ते नवीन खेळ खेळतात. तुम्ही सांगितलेले खेळ शिकतात. त्यातून तुम्हाला अजून काहीतरी मजा सापडते. आणि कदाचित हे नवीन मित्रमैत्रिणी तुमचे कायमचे बेस्ट फ्रेंड होऊ शकतात. आजच एक ट्राय मारुन पाहा बरं...

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact