तुला तुझी कामं करता यायलाच हवीत,असं आई सारखं का म्हणते?

 

Image: freepik

घरातली मोठी माणसं स्वत:ची कामं स्वत: करण्याचा आग्रह धरतात. पण मला त्याचा कंटाळा येतो.असं का?
- समर्थ आवारे, इयत्ता 6 वी के.बी.पी विद्यालय, कोपरगाव, अहिल्यानगर

- तुझी कामं तुला स्वत:ला करता यायलाच हवीत. त्याशिवाय तू स्वावलंबी कसा होशील? तुला कायम तुझी कामं पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. कामासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहिल्यास कामं होतील की नाही याची खात्री नसते. आणि कामासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहण्याच्या सवयीमुळे तू मात्र आळशी व्हायला लागशील हे नक्की!

-तुला कामाचं वळण लागावं, तुला तुझी जबाबदारी घेता यावी, कोणावरही विसंबून न राहाता स्वतंत्रपणे जगण्याची तुला सवय लागावी, कुठेही गेलं तर तुझी गैरसोय होऊ नये, फजिती होऊ नये यासाठी मोठी माणसं तुला तुझी कामं करण्याचा आग्रह करतात.

- स्वयंपाक, घरातली स्वच्छता, वाणसामान आणणे यासारख्या कामात तू जर आई बाबांची मदत केलीस तर तू त्यातून आवश्यक जीवनकौशल्यही शिकशील.- यातून तुला तुझ्या गोष्टी जबाबदारीने हातळण्याची सवय लागेल. या स्वावलंबनाचा चा उपयोग पुढे शिक्षण/ कामासाठी बाहेरगावी जावून एकट्याने राहण्याची वेळ जर तुझ्यावर आली तर नक्की होईल. तुला तुझी तुझी कामं करण्याची सवय असेल तर तू तुझी जबाबदारी उत्तमरित्या घेऊ शकशील.

- कोणावरही अवलंबून न राहाता स्वत:ची कामं स्वत: करता आली तर तू सक्षम होशील. तुझी मानसिक ताकद वाढेल. जे जमतंय त्यापेक्षा नवीन, जरा अवघड, आव्हानात्मक काम करण्याची इच्छा तुझ्यात निर्माण होईल.

- एखाद्या कामासाठी जेव्हा आपण इतरांवर अवलंबून असतो तेव्हा आपण ती व्यक्ती ते काम कधी करेल आणि आपली गरज कधी पूर्ण होईल याची वाट पाहात राहातो. आणि जर ते काम झालं नाही तर मग आपण तक्रार करत राहातो. पण जर आपली कामं आपणच करणार असू तर मग तक्रारी न करता आपण आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत आपलं काम पूर्ण करतो.

- छोटी छोटी कामं केल्याने काम झालं की काय आनंद आणि समाधान मिळतं त्याचा अनुभव घेता येतो. श्रमाचं मूल्य समजतं. शिकण्याचा, काम करण्याचा आत्मविश्वास वाढतो. हा अनुभव घेण्यासाठी तुला तुझी कामं करता यायला हवीत!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact