
अभ्यासात लक्ष लागत नाही. मी काय करायला हवं?
- पियूष देशमुख, केंब्रिज इंग्लिश स्कूल, सिल्लोड
- अभ्यास करताना लक्षच लागत नसेल तर एका जागी दोन तास बसलं तरी अभ्यास होणार नाही. आधी अभ्यास करावासा वाटला तरच तो करताना लक्ष लागणार आहे. आणि लक्ष लागलं तरच केलेला अभ्यास चांगला लक्षात राहातो. अभ्यासात रस वाटण्यासाठी आणि अभ्यासातलं लक्ष टिकवून ठेवण्यासाठी तुला स्वत:लाच प्रयत्न करावे लागतील.
- अभ्यास करायचा आहे पण नक्की काय करायचं हेच जर डोळ्यासमोर नसेल तर अभ्यासात लक्ष लागणार नाही. अभ्यासाला बसण्याआधी कसला अभ्यास करायचा आहे हे आधी ठरवायला हवं. अभ्यास करताना तुझं लक्ष लागत नसेल तर आधी जे करायचं आहे ते डोळ्यासमोर आण. त्यासाठी आधी तू अभ्यासाचं वेळापत्रक तयार कर. ते वेळापत्रक तू जिथे अभ्यासाला बसतो तिथे समोर दिसेल असं लावून ठेव. यामुळे तुला कोणत्या वेळी काय करायचंय हे सतत दिसत राहील.
- अभ्यासाची पध्दत कोणती याचाही एकाग्रतेवर परिणाम होत असतो. तासनतास एका जागी बसून, एकाच पध्दतीने अभ्यास होत नाही. अभ्यासाच्या पध्दतीतही विविधता आणावी लागते. नुसतंच लिहिणं, नुसतंच वाचणं अशा एक पध्दतीने अभ्यास न करता वाचणे, लिहिणे, नोट्स काढणे, अभ्यासाच्या संदर्भातले व्हिडीओज बघणे, पाॅडकास्ट ऐकणे अशा वेगवेगळ्या पध्दतीने तू अभ्यास केलास तर अभ्यासातला तोचतोचपणा आणि कंटाळा निघून जाईल. केलेला अभ्यास चांगला लक्षातही राहील.
- अभ्यास करताना लक्ष इकडे तिकडे जाणार नाही अशा शांती जागी बस, अभ्यासाला बसताना सर्व साहित्य जवळ घेवून बस, या गोष्टी केल्यास अभ्यास करताना तुझं लक्ष विचलित होणार नाही.
- सलग तासनतास अभ्यास न करता तू मध्ये मध्ये छोटे ब्रेक घ्यायला हवेत. ब्रेकमध्ये खाणं-पिणं, थोडा आराम, बाहेर खेळायला जाणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं, गाणी ऐकणं या गोष्टी केल्यास अभ्यास करुन दमलेला तुझा मेंदू फ्रेश होईल आणि पुन्हा अभ्यास करण्यासाठी तुला उत्साह येईल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


