
“एय!” मंटू घाबरून ओरडला. हे फुलपाखरू खरंच बोलत होतं.
“अरे मंटू घाबरू नको. मी तुला काही करणार नाही. हे बघ…” असं म्हणून फुलपाखरू त्याच्या खांद्यावरून उडून त्याच्या समोरच्या टेबलवर जाऊन बसलं. तिथून ते परत काहीतरी बोलायला लागलं. पण ते लांब गेल्यावर मंटूला ते काय बोलतंय ते कळेना. त्याच्या एकदम लक्षात आलं की ते फुलपाखरू छोटुसं असल्यामुळे त्याचा आवाज पण छोटुसा असणार. आणि एवढं छोटं फुलपाखरू आपल्याला काय करणार? शिवाय फुलपाखराला दात नसतात हे पण त्याला माहिती होतं. मग त्याने त्याचा तळहात समोर आडवा धरला. ते फुलपाखरू उडत उडत त्याच्या हातावर येऊन बसलं. मग त्याने स्वतःचा हात चेहेऱ्याच्या अगदी जवळ आणला. मग फुलपाखरू म्हणालं,
“अरे मंटू तू मला ओळखलं नाहीस का?”
“आधी तू मला सांग तुला माझं नाव कसं माहिती?”
“म्हणजे तू मला ओळखलं नाहीस.”
“नाहीच ओळखलं. कोण आहेस तू?”
“अरे त्या दिवशी बागेतून तू एक अळी उचलून आणली होतीस, तुला आठवतंय का?”
“हो आणली होती. पण ती दुसऱ्या दिवशीच हरवली.”
“हरवली नाही रे बाबा… मी तीच अळी आहे.”
“हॅट!” मंटूला अजिबात पटलं नाही.
“अरे! खरंच…”
“असं कसं होईल? ती अळी कशी होती दिसायला…! आणि तू तर किती छान आहेस.”
“माझे पंख छान आहेत, पण त्याखाली मी तीच अळी आहे. नीट बघ.”
हेही वाचा!
अळी हरवली पण फुलपाखरु भेटलं. अजब फुलपाखरू कुठून आलं?
मंटूने फुलपाखराचं जवळून निरीक्षण केलं, तर खरंच की! त्या फुलपाखराच्या अंगावरचं डिझाईन आणि रंग सेम त्या अळीसारखे होते. अरे ही तीच अळी आहे! मंटूला एकदम पटलंच.
“अगं पण तू होतीस कुठे इतके दिवस?”
“माझ्या कोशात.”
“कशात???”

“कशात नाही रे… कोशात!”
“तिथे काय करत होतीस तू?”
“माझे पंख तयार करत होते.”
“मग मला कशी दिसली नाहीस?”
“तुला मी दिसले. पण तू मला ओळखलं नाहीस.”
“कुठे गं?”
“तू मला जिथे सोडलंस त्याच फांदीच्या टोकाला मी माझा हिरवट पांढरा कोष विणला होता…”
अरे हां! आत्ता मंटूला आठवलं. तिथे एक छोटासा हिरवट पांढरा बॉल लटकलेला त्याने बघितला होता खरा. पण त्याच्या आत त्यावेळी अळीचं फुलपाखरू होत होतं? भारीच! मंटूला एकदम ते फुलपाखरू आवडलं. त्याने त्या फुलपाखराला विचारलं,
“आता मला कळलं तू कुठून आलास ते. पण आता तुझा काय प्लॅन आहे?”
“मी ना, आता तुझ्याबरोबरच राहणार आहे. कारण तू मला त्रास नाही देणार.”

“पण माझी आई मला फुलपाखरू पाळू नाही देणार.”
“पण तू कुठे मला पाळतो आहेस? मी आपणहून तुझ्याबरोबर राहणार आहे.”
“अरे पण तुझ्यासाठी तिच्याकडूनच खायला आणायला लागेल ना!” मंटूने एकदम प्रॅक्टिकल अडचण सांगितली.
“छे छे! मी माझा माझा फुलांवर बसून माझ्यापुरता मध गोळा करीन. तुझ्या बागेत तर भरपूर फुलं आहेत. मला खायला खूप मध मिळेल. आणि मी या फुलावरून त्या फुलावर जातांना माझ्या पायाला पराग लागतील आणि तुझ्या बागेत चांगलं परागीभवन पण होईल. मग तुझी बाग अजून छान होईल.”
“ही बेस्ट आयडिया आहे!” मंटू म्हणाला, “आणि तू रात्री कुठे राहशील?”
“तुला चालणार असेल तर मी तुझ्या उशीच्या कडेला झोपीन.”
“चालेल चालेल. ये मी तुला माझी गादी आणि उशी दाखवतो.” मंटू खूष होऊन फुलपाखराला हातावर बसवून घेऊन गेला.
एक अळी वाचवल्यामुळे त्याला फुलपाखरासारखा मित्र मिळाला होता. त्यानंतर ते फुलपाखरू कायम त्याच्याबरोबर राहिलं, शाळेत गेलं, खेळायला गेलं आणि त्याच्यामुळे मंटू एकदम हिरो होऊन गेला. कारण किती केलं तरी फुलपाखरू मित्र असणारे कितीसे लोक असतात? नाही का!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


