
Image: nzbirdsonline
तुम्हाला न्यूझीलंड देशातलं कबुतर माहित आहे का? तुम्ही म्हणाल आपल्या कबुतरांसारखेच तर असतील की ते न्यूझीलंडमधील कबुतरं. अजूनकाय वेगळे असतील ते? पण तुम्ही असा विचार करत असाल तर या केरेरुबद्दल तुम्ही नक्की वाचून पाहा म्हणजे आपल्याकडच्या कबुतरांपेक्षा या केरेरुंचं वेगळेपण नक्की लक्षात येईल. आता हे केरेरु कोण? तर केरेरु म्हणजे न्यूझीलंडमधले कबुतरं. तिथे कबुतरांना केरेरु असं म्हणतात. त्यांना पिजन किंवा ते जंगलातच जास्त आढळतात म्हणून त्यांना वूड पिजन म्हणूनही ओळखतात. केरेरु हा न्यूझीलंडचा स्थानिक पक्षी आहे. तो जगात इतरत्र कुठेही आढळत नाही.
केरेरुला ओळखण्याच्या दोन मुख्य खुणा आहेत. एक म्हणजे न्यूझीलंडच्या जंगलात इंद्रधनुष्यी पक्षी दिसला म्हणजे तो केरेरुच . केरेरु आपल्या शरीरावर विविध रंग वागवतात. त्यांचे डोके हिरवे असते, पोटाकडील भाग पांढरा असतो. केरेरु हा दिसला नाही तरी त्याच्या पंखाच्या आवाजावरुनही त्याला सहज ओळखता येतं. मुळात केरेरु जाडजूड आणि अवाढव्य असतो. त्याचे पंखही जाडजूड असतात. त्यामुळे उडताना या पंखाची जेव्हा फडफड होते तेव्हा 'वुश वुश' असा आवाज होतो. जगात आढळणाऱ्या इतर कोणत्याही कबुतरांपेक्षा
न्यूझीलंड मधला हा केरेरु खूपच मोठा आणि वेगळा आहे. मोठा म्हणजे किती तर तो ५१ से.मी. लांब असतो. उत्तर अमेरिका किंवा युरोपमध्ये आढळणारा राॅक पिजनची लांबीही ३० ते ३५ से.मी इतकीच असते.
हेही वाचा!
केरेरु जरी आताशा शहरी भागातील बागांमध्ये दिसत असले तरी ते प्रामुख्याने
न्यूझीलंडमधील स्थानिक जंगलात राहतात. केरेरुंचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांचं उडणं. विशेष म्हणजे त्यांच्या प्रजनन काळात तर ते फारच वैशिष्ट्यपूर्ण उडतात. केरेरु हे वर्षभर प्रजनन करु शकतात. पण ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यानचा काळ हा त्यांचा प्रजनन काळ म्हणून ओळखला जातो. प्रजननाच्या काळात केरेरु एकदम उंच उडतात आणि एकदम खाली येतात.एरवीच्या उडण्यापेक्षा हे उडणं वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं.
केरेरु हे न्यूझीलंडमधील स्थानिक झाडांसाठी जीवनदाते असतात. न्यूझीलंडमधील अनेक मोठे पक्षी नामशेष झाले आहेत. मोठ्या झाडांची मोठी फळं खाणारे पक्षी कमी झाले तर त्यांच्याबरोबर स्थानिक झाडंही नामशेष होण्याचा धोका असतो. पण
न्यूझीलंडमधील टाराइरे आणि कराका सारखी जुनी स्थानिक झाडं नव्याने उगवत आहेत त्याचं सर्व श्रेय केरेरु यांचं आहे. या झाडाची फळं केरेरु खातात आणि त्याच्या बिया जंगलात इतरत्र विखुरल्या जातात. त्यामुळे नव्याने ही झाडं उगवण्यास मदत होते.

Image: deanwright
केरेरु हे २१ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. पण शिकार आणि शहरात राहणाऱ्या केरेरुंचे होणारे अपघात यामुळे ते ५ वर्षांपर्यंत जगतात. २० वर्षांपूर्वी केरेरुंची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. त्यामुळे धोकादायक पक्ष्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. पण गेल्या काही वर्षांपासून केरेरुंची संख्या वाढल्याने आता धोकादायक पक्ष्यांच्या यादीतून त्यांचं नाव काढून टाकण्यात आलं आहे.
केरेरु खरंच नशा करतात?

Image: nzbirdsonline
जाडजूड, अवाढव्य दिसणाऱ्या केरेरुंची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे ते नशा करतात. याचा अर्थ ते दारु पितात असं नाही. केरेरुंना खूप आंबलेली फळं खायला आवडतात. नैसर्गिकपणे फळं जेव्हा आंबतात तेव्हा त्यांच्या साखरेचं रुपांतर अल्कोहोलमध्ये होतं. ही फळं खाल्यानंतर केरेरुंना नशा चढते.त्याचा परिणाम त्यांच्या उडण्यावर होतो. अनेकदा आंबलेली फळं खाऊन नशेत उडणाऱ्या केरेरुंना उडतांना आपला तोल सांभाळता येत नाही . उडता उडता ते घराच्या खिडक्यांवर, चालत्या गाड्यांवर, उंच झाडांवर आपटून जखमी होतात. दारु पिणाऱ्या माणसाला तू जास्त दारु पिऊ नकोस म्हणून समजावता येतं. पण आंबलेली फळं खावू नका असं केरेरुंना कोण आणि कसं समजावणार बरं?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact