
जून महिन्यात जेव्हा पहिल्यांदा आकाशात ढगांची गर्दी होते तेव्हा आपल्या मनात मोर नाचू लागतात. डोळ्यांसमोर पिसारा फुलवून जंगलात नाचणारे मोर येवू लागतात. पाऊस-मोर-जंगल यांचं नातं खूप घट्ट आहे. पण तुम्हाला उंच पर्वतांवर राहणारा, बर्फाळ डोंगरांवर नाचणारा मोर माहिती आहे का? डोंगरावर कुठे मोर नाचतो का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. पण मोनाल हा खरोखर उंच पर्वतांवर राहतो . मोनाल हा मोराचाच प्रकार आहे. जगभरात सुंदर मोरांचे वेगवेगळे प्रकार आहेत.त्यातलाच एक प्रकार म्हणजे हा मोनाल पक्षी. मोनालला पर्वतांची राणी म्हणूनही ओळखलं जातं. मोनालचं वैशिष्ट्यं म्हणजे मोनाल हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या भारतातल्या दोन राज्यांचा राज्यपक्षी आहे तर नेपाळ देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. उंच पर्वतांवर राहणाऱ्या या सुंदर मोनालचा राजेशाही थाट पाहून पक्षीतज्ज्ञ मोनालला 'मोनार्च ऑफ द हाय माउंटन' असं म्हणतात. नेपाळमध्ये मोनालला डानफे असं म्हणतात. या डानफेचा उल्लेख नेपाळच्या अनेक लोकगीतांमध्ये केलेला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि नेपाळशिवाय पाकिस्तान, भूतान आणि अफगाणिस्तानातही तेथील उंच पवर्तांवर मोनाल आढळतात. हे मोनाल सहजासहजी कोणाला दिसत नाही.
विविध रंगांच्या छटा आपल्या शरीरावर बाळगणारा मोनाल पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतो. डोक्यावर हिरवा रंग, निळे डोळे, लाल मान, गडद निळा गळा, छाती आइ पोट, धातूसारखी चमक असणारे पंख, लाल तपकिरी रंगांची शेपूट. अनेक रंगांचं सुदंर मिश्रण म्हणजे हा मोनाल पक्षी होय.
हेही वाचा!
मोनाल हा सर्व भक्षी पक्षी आहे. मोनाल सर्व प्रकारचे किडे, झाडाची मुळे, बिया, फुलं, बेरीसारखी फळं खातात. आपलं अन्न शोधण्यासाठी मोनाल २५ से.मीपर्यंत जमीन खोदू शकतात. त्यांची पायाची नखं आणि चोच दोन्ही टोकदार असल्याने त्यांना खोलवर जमीन उकरुन किडे खाणं शक्य होतं.
जसा ऋतू बदलेल तशी राहण्याची जागा बदलणारा मोनाल उन्हाळ्यात समुद्रसपाटीपासून १६,००० फुटांवर राहतात तर थंडीत जसजसं तापमान कमी होतं तसे ते उंचावरुन खाली येवून म्हणजे ६,५०० फुट उंचीवर राहतात. जसजसं समुद्रसपाटीपासून वर जातो तसं तापमान कमी होत जातं. कडाक्याची थंडी सहज झेलणारे मोनाल पक्ष्यांचं शरीर थंडीचा सामना करण्यासाठी परिपूर्ण असतं. फक्त मोनाल पक्ष्यांच्या पिल्लांना मात्र ऊब लागते. पिल्लांसाठी पुरेशा उबेची सोयही मोनाल पक्ष्यांकडे असते.
नर आणि मादी मोनाल एकमेकांपेक्षा वेगळे असतात. अनेक बाबतीत त्यांच्यात भिन्नता असते. मादी मोनालला आकर्षित करुन घेण्यासाठी नर मोनाल नृत्य करतात. एकदा का नर आणि मादी मोनाल यांनी एकमेकांना निवडलं तर ते एकमेकांची सोबत कधीच सोडत नाही. अंडी घालण्यासाठी मादी मोनालच घरटं बांधण्याची तयारी करतात, त्यासाठीचं साहित्य जमवतात आणि घरटं बांधतात. या कामी नर मोनाल मादी मोनालला काडीचीही मदत करत नाही. मादी मोनाल एका वेळेस ३ ते ५ अंडी घालतात. अंडी उबवायला २८ दिवस लागतात. अंडी उबून पिल्लं बाहेर पडेपर्यंत नर मोनाल मादी मोनालसोबतच राहतात. पण अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर मात्र पिल्लांची सर्व जबाबदारी मादी मोनाललाच घ्यावी लागते.
उंच पर्वतांवर राहणं पसंत करणारे मोनाल जंगलात सागवानाच्या झाडावरही आढळतात. पण झाडावरही ते उंच टोकावरच बसलेले असतात. मोनाल पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इतर पक्ष्यांच्या तुलनेत मोनाल जास्त काळ जगतात. ते १० ते १२ वर्षं जगतात. पण एकूण मोनाल पक्ष्यांच्या संख्येचा विचार करता त्यांची संख्या खूपच कमी होत आहे. त्याचं कारण शिकार. मोनाल पक्ष्यांचं सौंदर्य हेच त्यांच्या शिकारीचं कारण बनत आहे. आकर्षक रंग आणि सौंदर्यामुळे मोनाल पक्ष्यांची शिकार मोठ्या प्रमाणवर होत आहे खाण्यासाठी, त्यांच्या रंगीत पिसांचा वापर आकर्षक टोप्या करण्यासाठी म्हणूनही मोनाल यांची शिकार केली जाते. .हे लक्षात आल्यावर आता मोनाल पक्ष्यांच्या संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलं आहे. उंच पर्वतावरचं हे सौंदर्य टिकून राहायला हवं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact