गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर एक बेबी व्हेल येतो तेव्हा!

Image: weather.com

आपण छान दिवाळीचा, दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेत होतो, मित्रांसोबत मैदानावर खेळत होतो, कल्ला करत होतो, दंगा करत होतो, मस्त दिवाळीचा फराळ खात होतो, आई मला हेच हवं, तेच हवं असा हट्ट करत होतो, टी.व्हीवर वर्ल्डकपच्या मॅच बघत होतो तेव्हा कोकणात गणपतीपुळ्याच्या समुद्रावर काहीतरी वेगळंच घडत होतं. १३ नोव्हेंबरला म्हणजे लक्ष्मी पूजन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर एक देवमाशाचं पिल्लू म्हणजे बेबी व्हेल वाळूत अडकलेलं आढळलं. सुरुवातीला अनेकांना वाटलं हा देवमासा मेलेलाच आहे की काय? पण लोकांनी थोडं जवळ जावून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हा बेबी व्हेल तर जिवंत आहे. पण त्याला काहीतरी होतंय. त्याच्या अंगात अजिबात त्राण नाहीये. या बेबी व्हेलला परत समुद्राच्या पाण्यात सोडलं, ते जर पुन्हा त्याच्या आईला भेटलं तर हा बेबी व्हेल नक्की बरा होणार असं सगळ्यांनाच वाटलं. मग या बेबी व्हेलला पुन्हा समुद्रात, त्याच्या आईकडे पाठवण्याचे प्रयत्न सुरु झाले. यासाठी गावातील लोकं, तिथे फिरायला आलेले पर्यटक, निसर्गप्रेमी माणसं आणि मत्स्यशास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केलेत.

हेही वाचा!

बेबी व्हेलला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी काय काय केले?

देवमाशाचं हे पिल्लू फक्त दोन वर्षांचं होतं. ते पिल्लू असलं तरी चांगलं ३० फूट लांब आणि साडेतीन टन वजनाचं होतं. त्याचे डोळे हत्तीच्या डोळ्यांसारखे दिसत होते. समुद्राच्या ओहोटीबरोबर ते समुद्राच्या किनाऱ्यावर वाहात आलं आणि किनाऱ्यावरील वाळूत फसलं. समुद्राला पुन्हा भरती आल्यानंतरच त्याला पुन्हा समुद्रात सोडले जाणार होते.

जेव्हा भरती आली तेव्हा गावातल्या लोकांनी मच्छिमार नौकांच्या मदतीने त्याला वाळूतून पुन्हा खेचण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी संकटात सापडलेल्या हत्तीच्या सुटकेसाठी वापरले जाणारे बेल्ट वापरले गेले. पण हा महाकाय बेबी व्हेल काही त्यामुळे ओढला गेला नाही. म्हणून मग जेसीबीची मदत घेतली गेली. पण तरी बेबी व्हेल पुन्हा पुन्हा समुद्रकिनारी असलेल्या वाळूमध्येच येत होता. त्यामुळे लोकांनी आणि मत्स्यशास्त्रज्ञांनी पुन्हा मोट्या भरतीची वाट पाहायचे ठरवले.

समुद्रात मोठी भरती येईपर्यंत या बेबी व्हेलला जिवंत ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याला ओल्या कापडात गुंडाळून ठेवणं आवश्यक होतं. म्हणून त्याच्यावर पांढरं ओलं कापड टाकण्यात आलं. त्याच्यावर सारखं पाणीही फवारलं जात होतं.

प्राण्यांच्या डाॅक्टरांनी म्हणजे पशु वैद्यकांनी बेबी व्हेलची तपासणी केली. तेव्हा त्यांना बेबी व्हेल फारच अशक्त झालेलं आढळलं. बेबी व्हेलला ताकद येण्यासाठी डाॅक्टरांनी मग सलाईन लावले, ॲण्टिबायोटिक औषधं दिली. औषधांमुळे बेबी व्हेलच्या शरीरात थोडी तरी ताकद आली. मग कोस्ट गार्डच्या नौकांच्या मदतीने बेबी व्हेलला पुन्हा भरती आल्यानंतर पाण्यात खेचण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वी झाला.

मग तिसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला पहाटे समुद्राला मोठी भरती आल्यानंतर एका टगबोटच्या सहाय्याने या बेबी व्हेलला ८-९ सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात सोडलं गेलं. आता सगळ्यांना वाटलं होतं की हा बेबी व्हेल त्याच्या आईला पुन्हा भेटेल, आईच्या सहवासात हा आजारी बेबी व्हेल पूर्ण बरा होणार. या विचारानेच या बेबी व्हेलला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी अथक प्रयत्न करणारे लोक आपआपल्या कामाला लागली.

Image: freepressjournal

पण झालं उलटंच. समुद्रात सोडलेला बेबी व्हेल त्याच्या आईला भेटूच शकला नाही. आजारी बेबी व्हेल जगू शकला नाही. संध्याकाळी बेबी व्हेलचं मृत शरीर समुद्र किनाऱ्यावर वाहून आलं. मेलेला बेबी व्हेल पाहून सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं.

देवमासा असा समुद्र किनाऱ्यावर येण्याची ही पहिली घटना नाही. अशा घटना होत असतात. एकतर हा मासा जखमी झाल्याने किंवा इतर कारणांमुळे समुद्र किनाऱ्यावर येतात. असे मासे जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते असं मत्स्यशास्रज्ञ सांगतात. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact