पक्के दात पडल्यानंतरही तोंडात येणार औषधाचा दात!

Image: innovativepediatricdentistry

सकाळी उठल्यानंतर दात घासण्याचा किती कंटाळा येतो, पण दात तर घासावेच लागतात. तेही स्वच्छ. कारण एकदा का दात किडले, खराब झाले आणि त्यामुळे ते काढून टाकावे लागले किंवा पडले तर पुन्हा दात येत नाही. मग सर्वजण आपल्याला बोचरे किंवा बोचरी म्हणून चिडवणार अशा भीती वाटायला लागते. एकदा का दुधाचे दात पडून त्याठिकाणी पक्के दात आले की दातांची काळजी घेणं  आवश्यकच. त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या नीट ब्रश करणे आणि रात्री झोपण्याआधी न चुकता ब्रश करणं आलंच.  ज्याचा कंटाळा खूप तीच गोष्ट सक्तीने दिवसातून दोनदा करावी लागणं म्हणजे शिक्षाच. पण पक्के दात खराब झाले तर या भीतीने ही शिक्षा रोज आनंदाने भोगावी लागते. नखं कापली की पुन्हा वाढतात, डोक्यावरचे केस पूर्ण काढून टाकले की पुन्हा उगवतात तसे दात का उगवत नाही. या दातांना काय प्राॅब्लेम आहे पुन्हा यायला? असा प्रश्न अनेकदा दात घासताना पडतोच.

पक्के दात पडल्यावर दात येत नाही कारण..

पक्के दात पडल्यानंतर पुन्हा नवीन दात उगवण्याची क्षमत आपल्या दातांमध्ये नसते. दुधाचे दात येणं, दुधाचे दात पडल्यानंतर पक्के दात येणं या गोष्टीला विशिष्ट पेशी कारणीभूत असतात. या पेशींना ओडंटोबलास्ट असं म्हणतात. या पेशी आपल्या जबड्यात दात तयार होताना अस्तित्त्वात असतात. दात यायला लागणं ते दातांची पूर्ण वाढ होईपर्यंत या पेशी जबड्यात असतात. एकदा का दातांची वाढ पूर्ण झाली की मात्र या पेशी नष्ट होतात आणि पुन्हा तयार होत नाही. त्यामुळे पक्के दात एकदा पडले की पुन्हा त्या जागी नवीन दात येत नाही.

हेही वाचा!

औषधाने नवीन दात येणार?

ही काही थाप नाही. पक्का दात पडला की त्या जागी दात येत नाही, हे खरं. पण पक्का दात पडला तर त्याजागी पुन्हा दात येवू शकतो ही गोष्टही तितकीच खरी. कारण तसं औषध शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.  जपानचे शास्त्रज्ञ, दंतचिकित्सक डाॅ. कात्सु ताकाहाशी यांनी एक औषध तयार केलं आहे. या औषधाच्या मदतीने पुन्हा दात उगवणं शक्य आहे, असं त्यांचा अभ्यास सांगतो.  डाॅ. कात्सु ताकाहाशी हे संशोधक, दंतचिकित्सक आणि जपानमधील मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट किटानो हाॅस्पिटल येथे काम करतात. त्यांनी या इन्स्टिट्यूटमध्येच अभ्यास आणि संशोधन करुन जगातलं पहिलं औषध शोधलं जे पक्का दात पडल्यावर त्या जागी नवीन दात येण्यास प्रोत्साहन देईल.

 Image: kidsnews

औषधामुळे युएसएजी-1 नावाच्या जनुकाची क्रिया बंद होते. हे जनुक पुन्हा दात येवू न देण्यास कारणीभूत असते. औषधाने हे जनुक बंद केल्यावर दात येतो की नाही याची चाचणी डाॅ. कात्सु यांनी प्राण्यांवर केली. त्यासाठी त्यांनी उंदरांवर प्रयोग केले. उंदराच्या दाताची रचना माणसाच्या दाता सारखीच असते. औषधामुळे उंदराच्या जबड्यात नवीन दात आला हे संशोधनात दिसून आलं. 

जुलै  २०२४ मध्ये ' टोरेजेम बायोफार्म' ही जपानमधील फार्मासुटीकल कंपनी या औषधाची चाचणी मानवावर करणार आहे. या औषधाचा उपयोग दातांवर उपचार करण्यास होणार आहे. ज्यांना ॲनोडोनिटा नावाचा दातांचा दुर्मिळ जनुकीय आजार असतो त्यांना दात येत नाही. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅ. कात्सु यांनी शोधलेल्या औषधाचा उपयोग होणार आहे.

पक्के दात पडल्यावरही नवीन दात येणार असले तरी आपण सगळ्यांनी दात नीट आणि तेही दिवसातून दोनदा घासायचे आहेत हे लक्षात ठेवायला हवं!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact