
आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण लगेच आईकडे खाऊ मागतो. आई बाबा घरी नसले, आपण घरात एकटे असलो आणि तेव्हा आपल्याला भूक लागली असेल तरी आपण स्वयंपाकघरात जावून खाऊच्या डब्यातून खाऊ घेऊ शकतो. भूक लागली आहे आणि आपल्याला खायलाच नाही असं आपलं कधी होत नाही. पण आपल्या आजूबाजूला अशी माणसं त्यात आपल्याएवढी, आपल्यापेक्षा लहान मुलंही आहेत ज्यांना भूक लागल्यावर लगेच खायला मिळत नाही. भूक लागली आहे आणि खायलाच नाही ही परिस्थिती किती भयंकर असते ना! अमेरिकेत लाॅस एंजलीस येथे राहणाऱ्या सरयू कोचारलाकोटाने अशी परिस्थिती असलेली माणसं तिच्या आजूबाजूला पाहिलीत. आपण दोन तासही भुकेले राहू शकत नाही,आणि ज्यांना घर नाही, जी माणसं रस्त्यावर राहतात ती माणसं तासनतास कशी बरं उपाशी राहात असतील? हे पाहून सरयूला वाईट वाटायचं. अन्नाची असुरक्षितता हा फक्त काही लोकांचा नाही तर जगभरातला मोठा प्रश्न आहे. आपण यासाठी काही मदत करायला हवी असं तिला वाटलं. सरयूची ही इच्छा इतकी तीव्र आणि मनापासून होती की तिने खरोखर एक उपाय शोधला. तिने गरजूंना, उपाशी लोकांना ते मागतील तेव्हा अन्न देणारे एक मशीन शोधून काढले. 'व्हेंडिगो' हे त्याचं नाव.
हेही वाचा!
सरयू जेव्हा लहान होती तेव्हा तिला तिचे आई बाबा, नातेवाईक गिफ्टस द्यायचे, त्याने सरयूला खूप आनंद व्हायचा. ती जशी मोठ होत गेली तसा तिला घेण्याइतकाच देण्यातला आनंदही काय असतो हे कळू लागलं. तिला आजूबाजूला गरजू माणसं दिसू लागली तसं आपण काही द्यावं याची गरज सरयूला जास्त वाटू लागली. सरयू लाॅस एंजलीस येथे व्हेलकमिंग इण्टरिम शेअर्ड हाउसिंग नावाच्या एका संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करते ही संस्था दर शनिवारी दोन तास गरजू लोकांना पौष्टिक पदार्थ वाटते. हे काम करताना सरयूला पुरेसे अन्न न मिळणाऱ्या, हवं तेव्हा खायला न मिळणाऱ्या लोकांबद्दल जास्त कळवळा वाटू लागला. यावर विचार करत असतानाच तिला खाऊ वाटणाऱ्या वेंडिग मशीनची कल्पना सूचली. अशी मशीन जी गरजूंना त्यांना हवं तेव्हा खायला देईल. तिने ही कल्पना संस्थेतील लोकांना सांगितली. त्यांनाही ती आवडली. सरयूच्या कल्पनेने खाऊ पुरवणारी व्हेंडिग मशीन तयार करण्यात आली. त्याचं नाव व्हेंडिगो असं ठेवण्यात आलं.
ज्यांना राहायला घर नाही, जे खूपच गरीब आहेत अशा लोकांना अन्न पुरवण्यासाठी सरयूने व्हेंडिगो व्हेण्डिंग मशीन तयार केली. ही मशीन जेवढी या लोकांसाठी महत्वाची तेवढीच ती शाळांमध्येही महत्वाची आहे. शाळांमध्ये अनेक मुलं डबा आणत नाहीत. शाळेत जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा त्यांना व्हेंडिगो मशीन पौष्टिक खाऊ पुरवेल अशी सरयूची कल्पना होती. सरयूच्या कल्पनेतून तयार झालेल्या व्हेंडिगो मशीनमधल्या खाऊसाठी लोकंना / मुलांना पैसे मोजावे लागत नाही. त्यांच्यासाठी तो मोफत असतो. या व्हेडिंग मशीनमध्ये डुप्लिकेट टोकन्स टाकल्यावर त्यातून खाऊ बाहेर पडतो. आतापर्यंत सरयूच्या या व्हेंडिगो मशीनद्वारे ६,००० मोफत पौष्टिक खाऊ वाटण्यात आला आहे.

Image: pointsoflight
हेही वाचा!
ऑडूबन मिडल स्कूल या शाळेत सरयूने पहिलं व्हेंडिगो मशीन लावलं. त्यानंतर व्हिगन एलिमेंटरी स्कूल, आणि ओटावा मिडल स्कूल या शाळांमध्ये तिने गरजू मुलांना पौष्टिक खाऊ देणारी व्हेंडिगो मशीन लावली आहे. ज्या शाळांमध्ये ही व्हेंडिगो मशीन लावली त्या शाळेतली मुलं सरयूवर खूप खूश आहेत. कारण ज्यादिवशी त्यांनी नाश्ता केलेला नसतो, डबा आणलेला नसतो तेव्हा या व्हेंडिग मशीनमधला खाऊ खूप उपयोगी ठरतो असं मुलं येवून सरयूला सांगत आहेत. सरयूला जास्तीत जास्त शाळांमध्ये, शहरांमध्ये व्हेंडिगो मशीन लावायचं आहे. सरयूने व्हेंडिगो मशीनद्वारे मदतीचं अनोखं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact