- डाॅ. वैशाली देशमुख

Image: freepik
आज आईबाबा दुपारभर घरी नव्हते. समरनं ते गेल्या गेल्या टीव्ही लावला. ती नवीन आलेली वेब सिरिज त्याला बघायची होती. काल त्यानं लावली तर बाबांनी त्याला बंद करायला लावली. काय तर म्हणे ती तुझ्यासाठी नाहीये. म्हणजे काय? मी काय लहान आहे का आता? असं काय आहे त्यात न बघण्यासारखं? आज आईबाबा नाहीयेत तर बघूया तरी, असं म्हणून त्यानं हा प्लॅन केला होता.
त्यातली मारामारी बघून त्याला कसंतरी व्हायला लागलं. तसं त्याच्या गेम्समधे त्यानंही खूप माणसं मारली होती. पण यात काहीतरी भयंकरच दाखवलं होतं. पहिला भाग त्यानं कसाबसा बघितला आणि टीव्ही बंद करून टाकला.
हेही वाचा!
चित्रपटांना असलेल्या सर्टिफिकेटचा अर्थ काय?
तुम्ही जेव्हा पिक्चर बघायला जाता, तेव्हा त्यात सुरुवातीला एक सेन्सॉर सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) दाखवतात. त्यावर U, UA, A किंवा S असं लिहिलेलं असतं. काही जबाबदार व्यक्ती हे पिक्चर्स बघून ते कुणासाठी योग्य आहेत हे विचार करून ठरवतात आणि हे सर्टिफिकेट देतात. U म्हणजे कुणीही बघू शकेल असा पिक्चर. UA म्हणजे साधारणपणे कुणीही बघू शकेल पण शक्यतो १२ वर्षांच्या खालच्या मुलांनी तो आईबाबांबरोबर किंवा कुणातरी मोठ्यांबरोबर बघावा. कारण त्यात असलेले काही सीन्स भयानक, हिंसक किंवा बीभत्स असू शकतात. तुम्हाला जर ते बघून खूप प्रश्न पडले तर ते विचारता यावेत, भीती वाटली तर कुणाचा तरी आधार घेता यावा म्हणून मोठ्यांबरोबर बघा असं ते म्हणतात. A म्हणजे ॲडल्ट किंवा अठरा वर्षांच्या पुढचे लोकच पाहू शकतील असे पिक्चर्स. त्यात लहान मुलांना न समजणारं किंवा घाबरवून टाकणारं किंवा गोंधळवून टाकणारं काय-काय दाखवलेलं असतं. आणि S म्हणजे स्पेशल गटांसाठी असलेले पिक्चर, म्हणजे डॉक्टर्स किंवा वैज्ञानिक, वगैरे.
नको ते बघितलं तर..
पण तुम्ही जेव्हा वेब सिरिज बघता तेव्हा त्यावर असं काही सर्टिफिकेट नसतं. ते कुणी बघावेत, त्यात किती मारामारी किंवा सेक्स असावा यावर कुणाचं नियंत्रण नाही. त्यातले काही भाग खूप मजेदार असतात, पण मध्येच असं नकोसं काहीतरी येतं आणि तुम्ही ते बघत राहता. कारण तुम्हांला खूप कुतूहल वाटत असतं. पण कुतूहल वाटलेली प्रत्येक गोष्ट बघायची किंवा करायची म्हटलं तर ते धोकादायक आहे. समजा तुम्हाला सहावीत असताना दहावीचं गणित घातलं, तर समजेल का काही? येईल का सोडवता? नाही ना? तसंच आहे हे. काही काही मुलांना ते बघितल्यावर रात्री झोप येत नाही किंवा भीतीदायक स्वप्नं पडतात. काहीकाही मुलं तसे प्रयोग करायला जातात, किंवा ते सगळं खरं आहे असं धरून बसतात. या गोष्टीचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांचं अभ्यासतही लक्ष लागेनासं होतं. नको त्या वयात नको त्या गोष्टी पाहिल्या तर त्याचा परिणाम मनावर, विचारांवर आणि भावनांवरही होतो. अभ्यास राहातो बाजूला आणि डोक्यात काही भलतंच सुरु राहातं. त्यामुळे जे चित्रपट, बेबसिरिज हे मोठ्यांसाठी असतील, मोठ्यांनीच पहावेत असे असतील तर ते बघणं टाळणं हे आपल्या हातात असतं.

Image: freepik
समरलाही त्या रात्री झोप येईना. आता त्यानं ठरवलंय, अजून थोडं मोठं झालो की मग बघूया हे, आत्ता नको बाबा!
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact