हवामानात बदल झाल्याने आपल्यावर आणि पशू- पक्ष्यांवर काय संकट येईल?

मनुष्य, पशुपक्षी, किटक यांचं जगणं जमिनीवरील आणि समुद्रातील परिसंस्थांवर अवलंबून असतं. निसर्गातच बदल होत असल्या कारणाने या परिसंस्था विस्कळीत होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मनुष्य आणि प्राणीजीवनही बदलत आहे.नुसतंच बदलत नसून ते धोक्यात आलं आहे. ते धोक्यात आणलं ते हवामान बदलाने..

प्राणीजीवन धोक्यात आलं.. ते कसं?

जगभरातल्या जंगलात, उष्णकटिबंधातील गवताळ प्रदेशात हवामान बदलाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. त्यामुळे जंगलात त्रासदायक, रोगकारक , आक्रमक किटकांच्या प्रजाती वाढत आहेत. जंगलातील वनस्पतींचे प्रकार बदलत असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवनचक्रात अडथळे निर्माण होत आहे. जी निसर्ग परिसंस्था काही वर्षांपूर्वी शांतपणे काम करत होती. आता या परिसंस्थेत ताण निर्माण झाला आहे. या ताणाचा परिणाम प्राण्यांच्या जगण्यावर दिसू लागला आहे.

ध्रुवीय प्रदेशातील अस्वलांचं जगणं वितळणाऱ्या बर्फामुळे धोक्यात आलं आहे. केवळ ध्रुवीय प्रदेशातील प्राणी जीवनच नाही तर ॲमेझाॅनची वर्षावनं, गॅलापॅगोस बेटं येथील जैवविविधतेवर अवलंबून असणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्राण्यांचे जंगलातील हजारो वर्षांपासूनचे अधिवास धोक्यात आले आहेत. समुद्राचं तापमान वाढत असल्याने समुद्रातील प्रवाळांचं खाद्य असलेल्या खडकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाळांची उपासमार होत आहे. स्थलांतरित पक्षांसाठीच्या पाणथळीच्या जागा कमी होत आहे. पाणथळ जागेवर जगणाऱ्या पक्ष्यांच्या एकूण प्रजातींपैकी 85 टक्के प्रजाती जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. समुद्राची पातळी वाढल्याने समुद्र किनाऱ्यावर राहाणाऱ्या प्राणी पक्षांची जागा नष्ट होत आहे.

Image: news.climate.columbia.edu

हेही वाचा!

निसर्गात ज्या वेगानं बदल होत आहे, तो वेग प्राणी, पक्षी आत्मसात करु शकत नसल्याने त्यांचा विणीचा काळ, स्थलांतराचा काळ यात बदल होत आहे. तसेच वनस्पती उगवण्याचं , फुलण्याचं, बहरण्याचं वेळापत्रक बदलत असल्याने प्राणी पक्षांसाठीची निसर्गातली अन्नसाखळीच धोक्यात आली आहे. त्याचा परिणाम हा प्राण्यांच्या जगण्यावर होत आहे.

मानवाच्या जीवनाला कोणता धोका आहे?

 १. हवामान बदलाने वातावरण, पर्यावरण, प्राणी, शेती यावर होणारा परिणाम मनुष्याच्या जगण्यवरही दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे शेती अनिश्चित झाली आहे. शेतीचा कस ज्या मातीवर अवलंबून असतो, त्या मातीचा दर्जा खालावला आहे. जमीन सुपीक करणारी, पिकं जगवणारी, वाढवणारी मातीतली आर्द्रता , खनिजं कमी झाली आहेत. त्यामुळे शेती पिकवताना किड नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड जात आहे. शेतकऱ्यांना शेती करणं खर्चिक होवू लागलं आहे. परिणामत: शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं आहे. एखादा दुष्काळ किंवा पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होवून त्याला स्वत:लाच खायला अन्न मिळत नाहीये. शेतीतल्या अनिश्चितता आणि अनियमिततेचा परिणाम फळं, भाज्या यावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांवरही होत आहे. यामुळे या उद्योगांवर अवलंबून असलेलं मनुष्यजीवन तर धोक्यात आलं आहेच सोबतच जगभरात अन्नाचा तुटवडाही यापुढच्या काळात जाणवू लागणार आहे, असं अभ्यासक म्हणतात.

२. हवामान बदलामुळे दुष्काळ, पूर, त्यातून होणारे अपघात, मृत्यू, अन्न टंचाई, त्यातून निर्माण होणारी युध्द्दजन्य परिस्थिती गंभीर होत आहे.

३. हवामान बदलाने हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. वातावरण गरम झाल्याने जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचा धूर, ओझोनचे धुके हवेत मिसळत आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अशी हवा दमा आणि ह्रदय विकार असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरत आहे. मलेरिया, झिका यासारखे विषाणूजन्य आजार वाढत आहे. यापुढे अशा आजारांचा धोका आणखी तीव्र होत जाणार आहे.

 Image: scientificamerican

 ४. हवामान बदलामुळे निसर्गात टोकाचे वातावरण निर्माण होत आहे. उन्हाळ्यात उष्माघाताने तर पावसाळ्यात पुराने लोकांचे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

५ . हवामान बदलाचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नाहीतर मानसिक आरोग्यावरही होत आहे. वातावरणाचे टोकाचे परिणाम अनुभवावे लागत असल्यामुळे लोकांमध्ये भीती, मानसिक दुर्बलता , चिडचिड, आक्रमकता या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

६. हवामान बदलाचा परिणाम अन्न, पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होण्यावर होवू लागल्याने लोकांना स्थलांतरही करावं लागत आहे. हवामान बदलामुळे जगातल्या गरीब लोकांचं जगणं आणखीनच अवघड झालं आहे. मानवाच्या, प्राण्यांच्या जगण्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या या हवामान बदलाकडे म्हणूनच गंभीरतेने बघण्याची, त्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची वेळ येवून ठेपली आहे. आता जर आपण काहीच केलं नाही तर निसर्ग आपलं भविष्यातलं जगणं अवघड करणार आहे. निसर्गाला वाचवण्यासाठी आपण काही उपाय केले तर निसर्गही आपल्याला नक्कीच मदत करेल!

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact