सई आणि उंदीर – भाग २

“आई हे बघ.” आईचं बोलणं मधेच थांबवत सई म्हणाली, “माझा फ्रॉक फाटला नाहीये, कोणीतरी कुरतडलाय!”

“कशावरून?”

“हे बघ ना.” सईने जमिनीवरून तिच्या फ्रॉकच्या छोट्या छोट्या चिंध्या उचलल्या. त्या मगाशी फ्रॉकवरच असणार. पण खुर्चीवरून फ्रॉक उचलला तेव्हा त्या खाली पडल्या असणार. सईने त्या चिंध्या आईला दाखवल्या. मग आईलापण पटलं की हा फ्रॉक कोणीतरी कुरतडल्यासारखा दिसतोय खरा. तरी त्यावर ती खोलीतून बाहेर जाता जाता म्हणालीच, “कायम तुझ्याच बाबतीत असल्या गोष्टी कशा काय होतात देव जाणे… हा फ्रॉक तर टाकूनच द्यायला लागेल. पण बाकीचे कपडे तरी आवरून ठेव आता. इन फॅक्ट, सगळी खोलीचं आवर.”

हा फ्रॉक फाटण्याचा आणि बाकी सगळी खोली आवरण्याचा काय संबंध आहे ते काही सईला कळलं नाही. पण तिने वर वर खोली आवरली. म्हणजे सगळ्या वस्तू उचलल्या आणि ज्या कपाटात जिथे कुठे जागा असेल तिथे कोंबून भरून टाकल्या. पण तरीही काही गोष्टीची पुस्तकं बाहेर राहिलीच. ती ठेवायला कुठेच जागा उरली नाही. ती पुस्तकं आत ठेवायची तर कपाटातलं सगळं सामान बाहेर काढून कपाट इमानदारीत आवरावं लागलं असतं. तेवढं कोण करेल? मरूदे. नाहीतरी ती पुस्तकं आपल्याला रोज वाचायला लागतातच. असा विचार करून सईने ती पुस्तकं तशीच टेबलवर एका कोपऱ्यात सरकवून ठेऊन दिली. आणि ती खेळायला निघून गेली. रात्री आईने तिला खोली आवरल्याबद्दल शाब्बासकी दिली. ती ऐकून सई खोलीत आली, थोडा वेळ गोष्टीची पुस्तकं वाचली आणि झोपली. आणि सकाळी उठून बघते तर काय! तिची टेबलवर ठेवलेली गोष्टीची पुस्तकं कोणीतरी कुरतडून ठेवली होती. आता मात्र तिचा संताप झाला. काल फ्रॉक आणि आज पुस्तकं! कोण माझं सामान रात्रीतून कुरतडतंय? आज रात्री त्याचा शोध लावलाच पाहिजे आणि त्याला धडा शिकवलाच पाहिजे. असं म्हणून सई दिवसभर रात्र होण्याची वाट बघत बसली. शेवटी एकदाची रात्र झाली. आई-बाबा झोपले. सई पण झोपायला आली. पण ती जागी होती. आज तिने काही रद्दी पुस्तकं मुद्दाम टेबलवर काढून ठेवली होती. आणि ती गपचूप टॉर्च घेऊन बसली होती. बराच वेळ झाला तरी कोणी आलं नाही.

सईला अगदी झोप लागत आली आणि तिला टेबलावरून खुडखुड आवाज आला.

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact