
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गारवडी
उत्तेजनार्थ - रुपये ५०,०००
सेंद्रिय परसबाग, विषमुक्त शेती
शाळेचं नाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गारवडी
पत्ता: मु. गारवडी पो. डिस्कळ , ता. खटाव, जि. सातारा.
मुख्याध्यापक: अरुण बापूराव आवळे
प्रकल्प प्रमुख शिक्षक: दिपाली प्रविण जाधव
इ- मेल – dipali140511@gmail.com

शाळेबद्दल
गारवडी हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेला अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटसं खेडेगाव. या गावात असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवडी ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटर अंतरावरील डिस्कळ या गावी जावे लागते. गारवडीची लोकसंख्या सुमारे १२०० एवढी आहे.
शाळेची थोडी पार्श्वभूमी, तुमच्या शाळेतल्या मुलांबद्दल थोडं काही -
खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील डोंगराच्या कुशीत वसलेलं गारवडी हे एक खेडेगाव आहे. दुष्काळाच्या झळा नेहमीच सोसणारं. जेमतेम १०००-१२०० लोकसंख्येचं हे गाव, परंतु अलीकडच्या काळात जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी चार हात करण्याची क्षमता गावाने प्राप्त केली आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. गावात विविध सामाजिक स्तरातील लोक राहतात. गावकऱ्यांची आर्थिक स्थिती ही मध्यम ते बेताची अशी आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या या शाळेत ६० मुलं शिकतात आणि तीन शिक्षक सध्या कार्यरत आहेत.
काय करायचं ठरवलं होतं? ही कल्पना कशी सुचली?
शेती हा गावचा प्रमुख व्यवसाय असल्याने त्याच्याशी निगडित उपक्रमाची निवड केली. विषमुक्त शेती ही काळाची गरज बनली आहे. शालेय जीवनामध्ये विद्यार्थी मनामध्ये सेंद्रिय शेतीचा संस्कार रुजवण्याच्या विचारातून विषमुक्त शेतीचा म्हणजेच सेंद्रिय परसबागेचा प्रवास सुरु झाला. आजकाल कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याचं आपण ऐकतो, वाचतो. रासायनिक खतांचा आवाजवी वापर हे त्यामागील एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. ही बाब खूपच चिंताजनक आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शालेय वयातच मुलांवर सेंद्रिय शेतीचा संस्कार रुजवण्याचे ठरले.
आम्ही काय केलं? कसं केलं?
सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. विद्यार्थी आणि पालक यांच्या समुपदेशनासाठी डॉक्टरांची मदत घेतली. पालक सभेतून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. सुरुवात करायची ठरली पण पहिलीच अडचण होती ती मातीची! शेती करायची तर माती हवी आणि आमच्या शाळेचा परिसर म्हणजे नुसताच खडकाळ प्रदेश! शाळेचे मैदान तयार करण्यासाठी जेसीबीने दगड फोडायला सुरुवात केली होती. शेवटी शालेय परसबागेसाठी लोकसहभागातून माती मिळवली. पालकांना मदतीला घेऊन परसबागेची पूर्वतयारी करून घेतली. पण प्रश्न, शंका, अडचणी होत्याच… कोणती झाडे योग्य ठरतील? माळरानावर पाण्याची व्यवस्था काय? झाडे लावली तर ती तग धरतील का? हे आणि असे बरेच प्रश्न! नाही म्हणायला आमची कष्ट करण्याची, शिकण्याची तयारी होती. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चर्चेतून, लोकसहभागातून मिळत गेले. काही प्रयोग केले आणि हळूहळू बाग फुलायला सुरुवात झाली.
सुरुवातीला माती नसताना खोल खड्डे खणून घेतले आणि त्यात केळी, पेरू ,चिकू, आंबा, पपई अशी फळझाडे लावली. नंतर माती भरून फुलझाडांची लागवड केली. काही महिन्यानंतर केळी केळफुलांनी लगडल्या तेव्हा आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आमचे कष्ट सार्थली लागल्याची आम्हाला झालेली पहिली जाणीव होती ती… मुलांसह शिक्षकही त्या फुलाचे निरीक्षण करत होतो. त्यातून छोटी छोटी केळी तयार होत मोठी होत असलेली पाहत होतो. लवकरच आपल्या कष्टाने पिकवलेली केळी खायला मिळणार अशी भावना होती पण ती फार काळ टिकली नाही, कारण उन्हाच्या तीव्रतेने छोटी केळी करपून गेली. विरस झाला पण पुन्हा कामाला लागलो.
हे करत असताना आम्ही देशी वाणाच्या बियाण्यांचे संकलन सुरु केले. त्यासाठी पालकांची आम्हाला खूप मदत झाली. आता आम्ही शाळेत सीड बँक तयार करून देशी बी बियाण्यांची पारंपारिक पद्धतीने राखेमध्ये साठवण केली आहे. ‘बायफ’ संस्थेकडून गांडूळ खत निर्मितीसाठीचे किट्स उपलब्ध झाल्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला. त्यासाठी शेती शाळेतून गांडूळ आणले. तीन महिन्यानंतर छान गांडूळ खत तयार झाले. ते परसबागेतील भाज्यांना घातल्यानंतर झाडांची वाढ खूपच जोमाने झालेली दिसली. कोंबडी खत, शेणखत, लेंडीखत अशी मदत पालकांकडून नियमित मिळत राहिली, त्यामुळे परसबाग जोमाने उभी राहिली.
परसबाग फुलवण्याच्या प्रवासात विद्यार्थ्यांचा ‘मायक्रो-ग्रीन्स’ या संकल्पनेशी परिचय झाला. मोहरी, मेथी, मटकी यांची लागवड केल्यानंतर पहिल्या सहा-सात दिवसांत नाजूक हिरवीगार छोटी रोपं उगवतात. त्यांना ‘मायक्रो ग्रीन्स’ म्हणतात. ही रोपं मुळासकट उपटून, स्वच्छ धुऊन शालेय पोषण आहारात वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या आहाराचे पोषणमूल्य वाढले आणि मुलांनाही आपण पिकवलेले काहीतरी खाल्ल्याचे समाधान मिळू लागले.
गाव करील ते राव काय करील असे म्हणतात. त्याचा अनुभव आम्ही परसबाग फुलवताना घेतला. लोकसहभागा मुळेच आमची परसबाग माळरानावर असूनही हिरवीगार झाली. या कष्टाचे फळ म्हणून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत खटाव तालुक्यातील पहिले बक्षिस आमच्या परसबागेला मिळाले. जिल्हा स्तरीय स्पर्धेतही आमचा तिसरा क्रमांक आला.
अडचणी काय होत्या? आव्हानं कोणती?
आमची शाळा दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जात असलेल्या खटाव तालुक्यात! शाळेचा परिसर मुरमाड असल्यामुळे परसबाग फुलवणे हे एक आव्हानच होते. पण पालक, ग्रामस्थांनी गाळाची माती उपलब्ध करून दिली. कधी झाडांना कीड लागली, कधी पानं वाळली, कधी पाऊस दगा देत होता. अशावेळी गावातील शेतकरी मदतीला आले. आम्ही नैसर्गिक उपाय शोधले. सेंद्रिय शेतीसाठी वरदान ठरणारा दशपर्णी अर्क आम्ही शाळेतच मुलांना हाताशी धरुन तयार केला. त्यासाठी लागणारी दहा प्रकारची पानं मुलांनी स्वतः गोळा केली. एक महिन्याने दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर त्याची फवारणी केली. त्यामुळे कीड नियंत्रण झाले हे मुलांनी स्वतः पाहिले. जीवामृतसुद्धा विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार करून त्याचा वापर सुरू केला.
एक एक प्रयोग केला. त्यातून शिकलो आणि बाग समृद्ध होत गेली. फळभाज्या तयार होताना खराब होत होत्या. तेव्हा गावातील शेतकऱ्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला चिकट सापळे आणि गंध सापळे वापरण्याविषयी सांगितले. त्याबाबत मार्गदर्शनही केले. त्यांचा वापर केल्यानंतर फळभाज्या किडण्यास कारणीभूत माश्या चिकट सापळ्यांना चिकटू लागल्या. काही गंधाकडे आकर्षित होऊन गंधसापळ्यांमध्ये अडकू लागल्या. त्यामुळे कीड नियंत्रणात आली. आमच्या परसबागेतला भाजीपाला तरारु लागला.
प्रकल्पाचा परिणाम, प्रभाव?
“गारवडीच्या मुलांची खासियत न्यारी, फुलवली सुंदर परसबाग शिक्षणाच्या द्वारी”
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात याचा प्रत्यय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात घेतला.
पुढे काय करायची इच्छा / नियोजन आहे?
यापुढे घरोघरी सेंद्रिय परसबाग निर्माण होण्यासाठी काम करायचे आहे, जेणेकरून कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यास आपला हातभार लागेल. सेंद्रिय शेती आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांमधून जनजागृती करण्याची इच्छा आहे. त्यामुळे शेतामधील भाजीपाला देखील सेंद्रिय पद्धतीने पिकवला जाईल आणि निरोगी भारत घडवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल. त्यासाठी ‘लोकमत ऊर्जा’ कडून मिळालेल्या निधीचा विनियोग करण्याचा प्रयत्न आहे.
हाच प्रकल्प आपल्या शाळेत राबवायचा असे कुणी ठरवले तर त्यांच्यासाठी काही सूचना -
मनोगतं
सेंद्रिय परसबागेचा उपक्रम आम्हाला खूप काही शिकवून गेला. आमच्या शाळेत आम्ही राबवलेल्या या उपक्रमाने आम्हाला पोषक भाजीपाला मिळवून दिला. स्वतःच्या हातांनी पिकवलेला भाजीपाला पोषण आहारातून खायला मिळाला तेव्हा खूप आनंद झाला. विषमुक्त शेतीचे महत्व जाणून आता आम्ही पालकांच्या सहकार्याने घरी देखील सेंद्रिय बागा फुलवल्या आहेत. शेतात रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याबाबत आम्ही पालकांना आग्रह करत आहोत.
-आराध्या भरत कदम, विद्यार्थिनी.
सेंद्रिय परसबाग निर्मितीच्या प्रयोगात आम्ही चुकत चुकत शिकत होतो. मायक्रोग्रीन भाजीपाला, जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत निर्मिती अशा कितीतरी नवीन गोष्टी आम्ही करुन बघितल्या. त्यातून मुलंही शिकलीच पण आम्ही शिक्षकही अनेक नवीन संकल्पना शिकलो. विद्यार्थी शिक्षणाबरोबरच सेंद्रिय परसबागेचे धडेही गिरवत आहेत. आमची परसबाग मुरमाड माळरानावर असूनही फुलली आणि तरारली ती ग्रामस्थांच्या सक्रीय पाठिंब्यामुळे… आज पोषण आहारातून विद्यार्थ्यांच्या पोटात जाणारा सकस भाजीपाला आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर दिसणारा आनंद हे आम्ही केलेल्या कष्टाचेच फळ आहे असे वाटते.
- दीपाली जाधव, प्रकल्प प्रमुख शिक्षिका.
भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही प्रखर इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड देऊन खडकाळ जमिनीवर, मुरमाड मातीत, परसबागेच्या रूपाने नंदनवन फुलले आहे. विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात देखील रिकाम्या जागेत अशा परसबागा तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पूर्णतः विषमुक्त आहेत. हेच या उपक्रमाचे फलित म्हणावे लागेल
- अरुण आवळे, मुख्याध्यापक.
