जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , भांबर्डा

उत्तेजनार्थ- रुपये ५०,०००

निसर्गातील अन्नसाखळीचे महत्व उलगडणे

शाळेचं नाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भांबर्डा

पत्ता: मु - भांबर्डा, पो - दुधड, ता & जि - छत्रपति संभाजीनगर, 431007

मुख्याध्यापक: श्री. संजय निकम

प्रकल्प प्रमुख शिक्षक: श्री. विवेक वाघे

इ- मेल – vivekwaghe28@gmail.com

शाळेची पार्श्वभूमी. तुमच्या शाळेतल्या मुलांबद्दल थोडं काही -

साधारण दीड हजार लोकसंख्या असलेल्या या भांबर्डा गावची सरळसरळ दोन भागात विभागणी होते; एका भागातली लोकवस्ती बहुतांशी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेली तर दुसऱ्या भागात मागासलेली. शाळेत विद्यार्थी शोषित, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून आलेली. या शाळेत गावातली मेढंग-जोशी या भटक्या समाजातील मुले मोठ्या संख्येने आहेत. उदरनिर्वाहासाठी ही कुटुंबे परंपरागत भविष्य पाहण्याचे व जन्मकुंडली काढण्याचे काम करतात. शाळेतल्या बहुतांश मुलांचे वडील घराबाहेर राहून गावोगाव भटकून चार पैसे गाठीला बांधून कित्येक दिवसाच्या खंडानंतर घरी परततात. जेमतेम पोट भरु शकेल अशी आर्थिक स्थिती, कमालीची अस्वच्छता, सतत होणारी भांडणं व त्यातून होणारी शिवीगाळ आणि टोकाच्या अंधश्रद्धांचा विळखा इथे दिसतो. या सगळ्यांचा प्रभाव मुलांवर स्पष्टपणे जाणवतो.

काय करायचं ठरवलं होतं? ही कल्पना कशी सुचली?

आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे शाळेतील मुलांवर अंधश्रध्देचा पगडा मोठ्या प्रमाणावर होता. मनातल्या अंधश्रध्दा काढून टाका असा तोंडी उपदेश देऊन मुलांमध्ये काहीही बदल होणार नाही हे माहिती होते. बदल घडवून आणण्यासाठी कृती, अनुभव महत्त्वाचे होते. पाल, साप याविषयी मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रध्दा होत्या. या अंधश्रध्दा दूर करण्यासाठी वैज्ञानिक माहितीचा आधार घ्यायचं ठरलं. पाठ्यपुस्तकातली अन्नसाखळीची मदत घेऊन मुलांशी बोलण्याचं, त्यांच्यासोबत काम करण्याचं ठरवलं.

आम्ही काय केलं? कसं केलं?

(प्रकल्पाची सुरुवात कशी झाली? त्यासाठी काय तयारी केली? सुरुवातीला काय केलं? कोणाचं मार्गदर्शन मिळालं/घेतलं? इत्यादी.)

शक्य होतील तसे छोटे प्रकल्प राबवत गेलो. बदल होतोय असं जाणवू लागलं आणि आमचा उत्साह वाढला. सर्वप्रथम या प्रकल्पावर काम करण्यासाठी सर्वप्रथम 'अंधश्रद्धामुक्त समाज घडवूया - विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारूया' हा उपक्रम आम्ही सुरु केला. याची सुरुवात 'सर्प- सर्पदंश, प्रथमोपचार, अंधश्रद्धा आणि जनजागृती' हा कार्यक्रम घेऊन केली. साप आणि त्याच्या दंशाविषयी विस्तृत माहीती देऊन नंतर विद्यार्थ्यांनी ऐकलेल्या तसेच त्यांना माहीत असलेल्या शेकडो प्रश्न, शंका आणि अंधश्रद्धा यावर  मोकळेपणाने  चर्चा घडवून आणली. त्यानंतर अधे-मधे ठरवून वेळ काढून विद्यार्थी आपल्या आई, वडील,मोठी भावंडं तसेच गावातील इतर परिचयातील लोक यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी, त्यांना मिळालेली खरी-खोटी पशुपक्षांविषयीची माहीती घेऊन येत होती . आम्ही शिक्षक  आणि मुलं  त्यावर चर्चा करत गेलो.

शाळेचे क्रीडांगण आणि शाळेच्या/ग्रामपंचायतीची जोडून असलेल्या विस्तीर्ण जागेत जवळपास २०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले.

मग यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना निसर्गातल्या/आजुबाजूच्या घटकांचे निरीक्षण करून त्यांच्यात अभ्यास/ जन जागृती होईल असं काही करता येईल का याची चाचपणी केल्यावर आम्हाला विषय सापडला - 'निसर्गातील अन्नसाखळीचे महत्व उलगडणे'. या प्रकल्पावर काम करतांना, विद्यार्थ्यांना शाळेत, शाळेच्या परिसरात, घरी आणि आजुबाजूला सहजपणे दिसणाऱ्या जीवांचे निरीक्षण करायला लावले.

यात, बेडकं कुठल्या दिवसात ओरडतात ?, ती का ओरडत असावीत ?, काही खातांना तुम्ही बेडकांना पाहिले आहे का ?, घरात दिसणारी पाल घरात का येते ?, ती जास्त वेळा केव्हा नजरेस पडते ?, जेव्हा समोर दिसत नाही, तेव्हा ती कुठे गेलेली/लपलेली असते?, घरातली पाल काय खात असेल ? ती कीटक खात असेल तर आपली शत्रु कशी? पक्षी कसे दिसतात ? ते कोणत्या रंगाचे, आकाराचे आणि उंचीचे असतात? तुम्ही किती जातीचे पक्षी तुम्ही पाहिले आहेत ?, तुम्हाला माहित असलेली पक्षांची नावं सांगा ?, कीटक, मुंग्या, झाडं, वृक्ष, वेली व आजुबाजूच्या असंख्य जीवांबद्दल, असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले आणि त्यांची उत्तरं त्यांच्याकडूनच मिळवली. यातून विद्यार्थ्यांना त्या सजीवांबद्दल माहीती तर मिळालीच शिवाय हे जीव कीटक आणि इतर जीव खाऊन जीवन जगतात, हेही विद्यार्थ्यांना कळाले.

शाळेतल्या पुस्तकात शिकवली गेलेली अन्नसाखळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली आणि समजून घेतली. त्यातून या सगळ्या जीवांचे निसर्गासाठी पर्यायाने मानवासाठी किती महत्वाचे स्थान आहे याचा अनुभव घेतला. त्यातून त्यांचा वन्यजीव, निसर्ग आणि एकूणच पर्यावरणाविषयी जाणीव आणि जिव्हाळा वाढत गेला.

अडचणी काय होत्या ? आव्हानं कोणती ?

(आधी कल्पना केली नव्हती अशी आव्हानं आली का? कोणती? त्या सगळ्या अडचणींतून मार्ग कसा काढला?)

या प्रकल्पावर काम करायचे आणि विद्यार्थ्यांत या प्रकल्पाच्या अनुषंगाने गोष्टी रुजवायच्या हे ठरलेले होते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्येही शिक्षणाप्रती अनास्था दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांची अतिशय तोकडी दैनंदिन उपस्थिती हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. आता विद्यार्थ्यांची ही उपस्थिती कशी वाढेल यावर आम्ही विचार करू लागलो, आणि विविध प्रकारचे प्रयत्न सुरु केले.

      

अधून-मधून किंवा सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, त्यांच्या पालकांना भेटत राहणे, त्यांच्या मोबाइलवर सतत संपर्क साधणे, पालक सभांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना उत्साह वाटतील असे छोटे-मोठे उपक्रम राबवत राहणे यांसारख्या अनेक गोष्टी केल्या.

'साप मानवाच्या उपयोगाचे आहेत आणि त्यांना मारू नये' असं सांगितल्यावर विद्यार्थी पालकवर्गातून आणि एकूणच गावातून त्याला पाठींबा मिळेना. त्यावर शाळेत 'सर्पदंश, प्रथमोपचार, अंधश्रद्धा व जनजागृती' यासारखा उपक्रम राबवला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याशिवाय, पाल विषारी नसते हे विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी अनेकदा शाळेच्या भिंतीवर दिसणाऱ्या पाली आम्ही हातात पकडून दाखवल्या. त्यातून पालींबद्दलची अवास्तव भीती कमी होण्यास मदत झाली.

प्रकल्पाचा परिणाम, प्रभाव?

(आजूबाजूच्या परिसरावर, मुलांच्या मानसिकता आणि सवयींवर, परिसरातील लोकांच्या मानसिकता आणि सवयींवर काही परिणाम झाला का?)

शाळेत या प्रकल्पाच्या निमित्ताने, विविध नवनवीन गोष्टी घडत असल्याने व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या इतर अनेक प्रकारचे प्रयत्न केल्यामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले.

घरातली पाल, आजूबाजूला दिसणारे बेडूक, साप यांसारखे निसर्गात निरूपयोगी व त्रासदायक वाटणारे जीव हे निरुपयोगी नसून त्यांची निसर्गात काही ना काही  महत्वाची अशी भूमिका आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. शिवाय हे जीव अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असून ही अन्नसाखळी टिकून राहणे निसर्गासाठी व पर्यायाने मानवासाठी महत्वाचे आहे हेही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

आपल्याला दिसणारा प्रत्येक साप हा विषारी नसतो; प्रत्येक साप चावल्याने माणूस मरत नाही; विषारी साप चावल्यानंतरही माणूस जिवंत राहू शकतो यांसारख्या गोष्टीमुळे सापांविषयीची अनावश्यक भीती आणि तिटकारा दूर होऊ लागला. यामुळे गावात साप निघाल्यावर गावकरी  सर्पमित्राला पाचारण करू लागले.

निसर्गातले वन्यजीवांचे महत्व लक्षात आल्याने विद्यार्थी व पालकही निसर्ग व निसर्गातल्या जिवांचा आदर करू लागले व त्यांचे आस्तित्व मान्य करू लागले. तसा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. 'वन्यजिवांची शिकार व विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे, व तसे करतांना कुणी आढळून आल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री नंबरवर संपर्क केल्यास आपण ही शिकार/विक्री रोखू शकतो', हे विद्यार्थ्यांना सांगितलेले होते. तर एकदा, एक व्यक्ती घोरपड विकत असल्याचे एका विद्यार्थ्याने पाहिले व त्याने घरच्या मोबाइलवरुन थेट तक्रारच केली. त्याने ठिकाण सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात वनविभागाचे कर्मचारी तिथे हजर झाले व त्या इसम व घोरपडीस जप्त करून निघून गेले. या प्रकल्पामुळे अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना कळू लागल्या. पर्यावरण, निसर्ग व वन्यजिवांविषयी त्यांच्या निसर्गातल्या स्थानाविषयी, उपयुक्ततेविषयी व अन्नसाखळी विषयी विद्यार्थ्यांत जागृती निर्माण झाली.

पुढे काय करायची इच्छा / नियोजन आहे?

लोकमत ऊर्जाकडून मिळालेल्या निधीमुळे आम्ही हा प्रकल्प राबवू शकलो. पुढे काय करायची इच्छा आहे या प्रश्नाची दोन उत्तरं मला देता येतील.


१) हाच प्रकल्प मोठ्या स्केलवर राबवणे. म्हणजे हा प्रकल्प एका शाळेत राबवला तसा केंद्रस्तरावर ज्यात १० ते २० शाळा असतात अशा पातळीवर राबवणे.

२) विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक जिवनशैली अवलंबवावी यासाठी प्रयत्न करणे. फारसे कष्ट न घेता विद्यार्थ्यांना शक्य तितके नैसर्गिक/पर्यावरणपूरक दैनंदिन जीवन जगता यावे, त्यांच्या कृतींमधून निसर्ग संवर्धनास हातभार लागावा यासाठी आवश्यक ती जीवनशैली अवलंबता यावी यासाठी प्रयत्न करणे.

हाच प्रकल्प आपल्या शाळेत राबवायचा असे कुणी ठरवले तर त्यांच्यासाठी काही सूचना

पालक/ विद्यार्थी ज्या आर्थिक, सामाजिक गटातून येतात त्यामुळे त्यांच्याकडून आणि इतरांकडूनही कुठलाही प्रकल्प राबवतांना सुरूवातीला प्रतिसाद मिळत नाही. त्यातच असे वन्यजीव/प्राण्यांसबंधीच्या प्रकल्पाकडे तुच्छतेनं पाहण्याची आपल्याकडे वृत्ती आहे. परंतु आपला उद्देश्य निखळ आणि प्रयत्न प्रामाणिक असले तर आपण असे प्रकल्प यशस्वीरित्या राबवू शकतो, हे अनुभवातून आम्ही शिकलो. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांच्या कलाने हळूहळू असले प्रकल्प राबवावे.

हा प्रकल्प राबवतांना विशेष काळजी घ्यायला हवी. कारण आपण केलेल्या कृतींची नक्कल विद्यार्थी करतात. त्यामुळे साप, पाल, सरडे, विंचू, सापसुरळी सारखे जीव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवतांना, हाताळतांना काळजी घ्यायला हवी, वेळोवेळी आवश्यक त्या सूचना द्याव्यात; नाहीतर अनर्थ होऊन दुर्घटना घडू शकते.

मनोगतं

आम्ही सापसुरळी हातात पकडली, ती चावली नाही. बेडूक जवळून पाहिला. एकदा तर सरांनी विंचू हातावर घेऊन दाखवला, तोही सरांना चावला नाही. आम्हाला सरांनी घरातल्या पालीची माहिती लिहून आणायला सांगितली होती. पाल कीडे खात होती.

- पवन शिंदे (इयत्ता - आठवी)

सरांनी आम्हाला साप चावल्यावर काय करायचे ते सांगितले. आणि साप घरात यायला नको म्हणून घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवायला सांगितली. आम्ही शाळेत लाकडी फळयापासून पक्षांसाठी घरटी बनवली. एकदा एक सरडा एक कीटक खात होता. यावरून सरडे कीटक खातात हे माझ्या लक्षात आले.

- सारीका भिसे (इयत्ता - सातवी)

आमच्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. वाघे सरांनी विविध उपक्रम राबवले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेत नवचैतन्य संचारले आहे.

- श्री. संजय निकम (मुख्याध्यापक)

लोकमत ऊर्जाने आमच्यावर विश्वास दाखवत शाळेत हा प्रकल्प राबवण्यासाठी मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल लोकमत ऊर्जाचे आभार मानायलाच हवे. आजूबाजूला नकारात्मक वातावरण असतांना शिक्षकांनी/शाळेने ठरवलं तर सकारात्मक बदल घडू शकतो हेच यातून दिसून येतं. असे विद्यार्थ्यांत निसर्गाविषयी ओढ़/जिव्हाळा निर्माण करणारे आगळे-वेगळे/अभिनव पर्यावरणपुरक उपक्रम विविध शाळांना राबवता यावेत, यासाठी झटणाऱ्या लोकमत ऊर्जाला अधिक बळ मिळो. धन्यवाद .

श्री. विवेक वाघे (प्रकल्पप्रमुख शिक्षक)