जिल्हा परिषद हायस्कूल , उमरगा

उत्तेजनार्थ- रुपये ५०,०००

मियावाकी जंगल निर्मिती/ मधुमक्षिका पालन

शाळेचं नाव: शाळेचे नाव: जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा.

पत्ता: शिवाजी कॉलेज शेजारी, बालाजी नगर, मु. पो. ता. उमरगा, जिल्हा धाराशिव.

मुख्याध्यापक, प्रकल्प प्रमुख शिक्षक: पद्माकर रावसाहेब मोरे

इ- मेल – padmakarmore1271@gmail.com

शाळेची पार्श्वभूमी

जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा ही उमरगा शहराच्या मध्यभागी वसलेली इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा शहराच्या मध्यभागी असली तरी इथे काळे प्लॉट हमीदनगर सारख्या झोपडपट्टी भागातील मुले शिक्षणासाठी येतात. त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे शिक्षणाबद्दल जागृती नाही अजूनही शिक्षणाचे महत्व येथील पालकांना समजलेलं नाही. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे शहरात अनेक शाळा असल्यामुळे श्रीमंत आणि संपन्न कुटुंबातली मुले इंग्रजी माध्यमाच्या तसेच सीबीएसई शाळांमध्ये शिकतात. शालेय व्यवस्थापन समिती, शाळेची माजी विद्यार्थी आणि येथील पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय चांगला आहे.

काय करायचं ठरवलं होतं? ही कल्पना कशी सुचली?

२०१९-२० मध्ये कोरोना काळात शाळा बंद होत्या माझ्या शाळेला असलेला परिसर, उपलब्ध जागा आणि शासनाकडून दरवर्षी एक मूल एक झाड, एक शिक्षक पाच झाडे असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्हाला देण्यात आला त्याचवेळी मीयावाकी जंगल निर्मितीची संकल्पना आम्हाला त्यावेळेसचे तालुक्याचे तहसीलदार माननीय संजय पवार साहेब यांनी सुचवली शाळेत जागा पाणी व शाळेला संरक्षण भिंत असल्याने येथे झाडे जगू शकतात हा विश्वास आम्हाला मिळाल्यानंतर सामाजिक वनीकरण विभाग आणि महसूल कार्यालय यांच्या मदतीने आम्ही मी यावं की ही संकल्पना उमरगा शहरासाठी नवीन असल्याने प्रायोगिक तत्वावर मिळावा की जंगल तयार करावे आणि इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळावी व वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन वाढण्यासाठी प्रयत्न होतील या उद्देशाने आम्ही मिळवा की जंगल निर्मिती करण्याचे ठरवले ही कल्पना आम्हाला खूपच नवीन होती परंतु तहसीलदार मा. संजय पवार साहेबांनी आम्हाला ही कल्पना सुचवली आणि आम्ही शालेय परिसरात तीस गुंठे जागेवर जपानी पद्धतीने कमी जागेत जास्त वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून आम्ही मियावाकी जंगल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

आम्ही काय केलं? कसं केलं?

प्रथमतः शालेय व्यवस्थापन समितीची तहसीलदार, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. मियावाकी जंगल निर्मिती करण्याची संकल्पना या बैठकीत मांडली. त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. जी जागा भविष्यातही बांधकाम किंवा अन्य कारणांसाठी वापरली जाणार नाही आणि जिथे वृक्षारोपण केल्यानंतर कायमस्वरूपी वृक्ष संवर्धन होईल अशी तीस गुंठे जागा निवडून ती ट्रॅक्टरने नांगरून आवश्यक मशागत केली. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर या जमिनीवर एक मीटर बाय एक मीटर अशी आखणी केली आणि वीस प्रजातीच्या वृक्षांची त्यावर लागवड केली. समाजातील दानशूर व्यक्ती आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले आणि मियावाकी जंगलासाठी ठिबक सिंचन यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आता नगर परिषदेच्या सहकार्याने या झाडांची जोपासना केली जात आहे.

अडचणी काय होत्या ? आव्हानं कोणती ?

  • मराठवाडा हा तसा दुष्काळी भाग आहे पावसाची अनिश्चितता आणि भीषण पाणीटंचाई या गोष्टी येथे दर दोन-चार वर्षाला सतावत असतात.
  • अगोदर शाळेला संरक्षण भिंत असली तरी एक मोठे लोखंडी गेट बसवून शाळेच्या मैदानात येणारी जनावरे आणि वाहने रोखण्याचे आव्हान होते. 
  • शाळा जिल्हा परिषदेची असल्याने शाळेत शिपाई आणि इतर कामगारांची कमतता होती. 
  • सुट्टीच्या काळात विघ्नसंतोषी माणसांपासून झाडांचे संरक्षण करणे हे मोठेच आव्हान होते.  
  • झाडांच्या मुळांशी आलेले तण, गवत काढणे, त्यांना आळी करुन खत घालणे हे काम महत्त्वाचे होते पण त्यासाठी मनुष्यबळ नव्हते.
  • झाडांना उन्हाळ्यात पाणी कसे द्यायचे याचे नियोजन करणेही अवघड होते.
  • वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक बोअरवेल आणि इतर उपकरणे यांच्यासाठीची आर्थिक तरतूद करणेही सोपे नव्हते. मात्र, समाजातील दानशूर आणि पर्यावरण प्रेमी व्यक्तींच्या मदतीने या समस्यांवर आम्ही मार्ग काढला.  

प्रकल्पाचा परिणाम, प्रभाव?

आज तीस गुंठे जागेवर उभे असलेले मियावाकी जंगल हे आमच्या शाळेला सर्वत्र ओळख मिळवून देत आहे. हे जंगल सर्वांसाठी एक मॉडेल बनलेले आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आणि वृक्षारोपण करण्यायोग्य जागा आहे अशा प्रत्येक ठिकाणी या मॉडेलवर आधारित जंगल निर्मिती करा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी १९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी पंधरा लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. आमच्या शाळेतील मियावाकी जंगल हे या कार्यक्रमामागची प्रेरणा आहे याचा शाळेतील आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो.

पुढे काय करायची इच्छा, नियोजन आहे?

शाळेच्या परिसरात फुललेल्या मियावाकी जंगलाने आम्हाला मोकळी हवा, आनंद, समाधान ओळख आणि राज्यभर प्रतिष्ठाही मिळवून दिली आहे. यापुढे या मियावाकी जंगलात मधुमक्षिका पालन करणे, त्यातून अर्थार्जनाचे मार्ग विद्यार्थ्यांना दाखवणे असा आमचा मनोदय आहे. त्यासाठी मधमाश्यांना आकर्षित करुन घेणारी काही फुलझाडेही लावण्यास सुरुवात केली आहे.

मियावाकी जंगल करु इच्छित शाळांसाठी सूचना -

  • वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, निसर्ग यांप्रती आवड असणे महत्त्वाचे आहे. 
  • वृक्षारोपणासाठी जागेची निवड करताना ती विचारपूर्वक करा. ज्या जागेचा भविष्यात बांधकाम किंवा अन्य कारणांसाठी वापर होणार नाही अशी जागा निवडा, जेणेकरुन वृक्षसंवर्धनही होईल.  
  • कोणते वृक्ष लावावेत, ते कसे जगवावेत यांबाबत सामाजिक वनीकरण विभागाची मदत घ्या. 
  • झाडांना पाणी कसे आणि कुठून देता येईल याचे नियोजन आणि विचार करा.

मनोगतं

आम्हाला झाड दत्तक दिले आहे. त्या झाडाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही त्या झाडांना पाणी घालतो. जंगलात पक्ष्यांना आणि प्राण्यांना प्यायला पाण्याची आणि खाण्याची सोय करतो. या जंगलामुळे आमच्या शाळेचा परिसर नेहमी हिरवागार आणि प्रसन्न असतो. आम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं.

- आदित्य सगर, विद्यार्थी.

एक झाड १००० माणसांना ऑक्सिजन देत असेल तर वृक्षांचे महत्व माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. आमच्या शाळेच्या परिसरातील मियावाकी जंगलामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास आणि विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होण्यास खूप मोठी मदत होत आहे.

- संजय रुपाजी, शिक्षक.

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात पाऊस कमी पडत असल्याचे खरे कारण वृक्षारोपणाचा अभाव हेच आहे. उमरगा शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळेच्या आवारात मियावाकी जंगल उभे राहिल्यामुळे परिसराला एक वेगळेच रुप आले आहे. शाळेचा प्रकल्प एक मॉडेल म्हणून ओळखला जात आहे याचे समाधान वाटते

- पद्माकर मोरे, मुख्याध्यापक.