सर्दीमुळे आवाज बसतो, बदलतो! सर्दीचा आवाजावर परिणाम का होतो?

आपल्या शरीरातील घडामोडींचा आपल्या आवाजावर परिणाम होतो. नुसत्या शारीरिक घडामोडीचा नाही तर आपण आनंदी आणि दुखी असलो तरी त्याचा परिणाम आपल्या आवाजावर होतो. आपल्या आवाजावरुनच समोरचा आपण आनंदी आहोत की दुखी. आजारी आहोत की एकदम फिट हे कळतं. इतर कोणत्याही आजारापेक्षा सर्दी खोकल्याचा आपल्या आवाजावर खूप परिणाम होतो. सर्दी झाल्यावर काहींच्या घशातून आवाजच निघत नाही. त्यामुळे त्यांना बोलणं अवघड होतं. तर काहीजण खूप सर्दी झाली तरी बोलू शकतात. पण त्यांचा आवाज मात्र बदललेला असतो. असं का?

हेही वाचा!

Image: clipart-library

सर्दीमुळे आवाज बदलतो कारण..

आपल्या घशामध्ये जिभेच्या अगदी मागच्या टोकापाशी आपलं स्वरयंत्र असतं. या स्वरयंत्रातून आपल्या आवाजाची निर्मिती होते. स्वरयंत्रामधून येणारा आवाज हा त्यात असणाऱ्या स्वरतंतूंच्या कंपनांमुळे होतो. काही विशिष्ट शब्दोच्चारांसाठी घसा, जीभ, दात आणि ओठ यांचासुध्दा उपयोग स्वरयंत्राबरोबर केला जातो.

आपल्याला जेव्हा सर्दी होते, तेव्हा श्वासनलिकेत आणि त्याचबरोबर स्वरयंत्रात आणि स्वरतंतूंवरही शेंबडाचा थर चढतो. स्वरयंत्र आणि घसा साफ करण्यासाठी खोकला येतो. जोरजोरात खोकल्यामुळे स्वरतंतूंना इजा होते आणि ते सुजतात. जंतूंच्या संसर्गाने, काही रसायनांच्या वाफेमुळे आणि धुळीमुळेही स्वरतंतूंना इजा होते. नाकात आणि नाकाच्या बाजूला असणाऱ्या पोकळ्यांमध्येही शेंबूड साठतो. या पोकळ्यांना ‘सायनस’ म्हणतात. त्यामुळे आवाजाची, शब्दोच्चाराची नेहमीची प्रक्रिया आपल्याला नीट करता येत नाही. त्यामुळे आवाज बदलतो.

या आवाज बदलण्यालाच आपण आवाज बसणं असं म्हणतो. अशा वेळी आवाज निर्माण करणारे स्वरतंतू योग्य प्रमाणात आपल्याला हवं तसं काम करू शकत नाहीत. कंप पावू शकत नाहीत. स्वरतंतू हे अतिशय मुलायम, धाग्यांसारख्या पेशींनी बनलेले असतात. त्यांना कित्येकदा अ‍ॅलर्जीमुळे सूज येते. अशी सूज आली, की आपण जरी कितीही प्रयत्न केला, तरी आपण मोठ्यांने बोलूच शकत नाही. आपल्या घशातून फक्त कुजबुजल्यासारखा आवाज काढता येतो.

तसेच आपल्या स्वरतंतूची लांबी आणि जाडी किती आहे यावरही आपला आवाज लहान की मोठा हे अवलंबून असतं. स्वरतंतूची लांबी लहान आणि जाडी पातळ असल्यास स्वरतंतू वेगाने कंप पावतात आणि परिणामी आवाज मोठा होतो. पण स्वरतंतूची लांबी जास्त आणि ते जाड असल्यास स्वरतंतूतील कंपनं हळू होतात परिणामी आवाज लहान होतो. त्यामुळे ज्यांच्या स्वरतंतूची लांबी जास्त आणि जाड असते त्यांना सर्दी झाल्यास स्वरतंतूतील कंपनं आणखीनच हळू होतात आणि त्यांचा आवाज इतरांच्या तुलनेत आणखीनच कमी येतो. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact