
Image: freepik
वाघ. या प्राण्याचं नाव घेतल्याबरोबर लगेच आपल्यातही शक्ती संचारल्यासारखी वाटते की नाही? वाघ आहेच तसा बलदंड. काय त्याची चाल, काय त्याचा रुबाब.. त्याच्या नुसत्या एका डरकाळीनं सगळ्यांची पाचावर धारण बसते. वाघाचा पंजा ही त्याची मुख्य ताकद. लहान आकाराच्या प्राण्यांना त्यानं एक दणका दिला तर त्यांची कवटी फुटून ते जागच्या जागी ‘राम’ म्हणू शकतात!
वाघांचे अनेक प्रकार असतात. लहान, मोठे. आपल्याकडे आढळणारा वाघ साधारण दोनशे किलो वजनाचा असतो, मादी मात्र वजनानं कमी असते. प्रत्येक वाघानं आपलं क्षेत्र ठरवून घेतलेलं असतं आणि साधारण साठ ते शंभर चौरस किलोमीटर परिसरात त्याचं राज्य चालतं. दुसऱ्या वाघांनाही तो आपल्या इलाक्यात येऊ देत नाही. एका झटक्यात ताशी ६५ किलोमीटर वेगानं तो चाल करून जाऊ शकतो आणि एका ढांगेत तब्बल पाच ते सहा मीटरचं अंतरही कापू शकतो.
आज आपल्याला व्यायाम करायचा आहे, तो वाघाचा. दबा धरुन बसण्याचा आणि सावजाच्या मागे मागे जाण्याचा. या व्यायामाचं नाव आहे ‘क्राऊचिंग टायगर’ . वाघासारखी शिकार आपल्याला जमणार नाही, पण वाघासारखा दबा धरण्याचा व्यायाम करुन आपण आपल्या शरीरातील स्नायुंची ताकद मात्र नक्कीच वाढवू शकतो.
हेही वाचा!
वाघासारखा दबा धरताना..
१. दोन्ही गुडघे जमिनीवर टेका.
२. आता दोन्ही हातही खाली जमिनीवर टेकवा. कोपरात वाका.
३. ज्यांना यात आणखी थरार हवा असेल, त्यांना हाताच्या पंजांऐवजी आपले कोपरही टेकवता येतील.
४. जितकं खाली वाकता येईल तितकं वाका.
५. नजर समोर ठेवा.
६. आता एकेक हात आणि पाय पुढे टाकत हळूहळू पुढे चालत जा.

Image: .chinadaily
क्राउचिंग टायगरमुळे काय होईल?
१. हातांची ताकद वाढेल.
२. पंजांमध्येही बळकटी येईल.
३. पाठीचा व्यायाम होईल.
४. पाय आणि मांड्या मजबूत होतील.
५. वाकून चालल्यामुळे दंडाची मागची बाजू, म्हणजे ट्रायसेप्स स्ट्रॉँग होतील.
लक्ष्यात घ्या, हा वाघाचा व्यायाम आहे. तोही त्याच्या शिकारीच्या वेळेचा. त्यामुळे झेपेल तेवढाच करा. नाहीतर आजारी पडून तुमचीच ‘शिकार’ व्हायची!
- ऊर्जा
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact