नावडत्या शिक्षकांमुळे आवडीचा विषयही नावडता झाला. आता?

Image: freepik

विज्ञान हा श्रावणीचा अतिशय आवडता विषय. पण शाळा सुरु झाल्यापासून विज्ञानाचा तास म्हटला की नववीत जाणाऱ्या श्रावणीच्या कपाळावर आठ्या पडतात. शाळेतच नाही, तर घरी आल्यावरही तिला विज्ञानाचा अभ्यास करावासाच वाटत नाही. मागच्या वर्षापर्यंत विज्ञान हा विषय प्रचंड आवडणाऱ्या श्रावणीला अचानक विज्ञान विषय आवडेनासा का झाला? हेच तिच्या आईला कळत नव्हतं. नववीचं विज्ञान अवघड आहे, म्हणून श्रावणीचं असं होतंय का? तर ते तसंही नव्हतं. शाळा सुरु होवून काहीच दिवस झाले आहेत. तेव्हा हा प्रश्न लवकर सोडवायला हवा, नाहीतर परीक्षेत कमी गुण मिळायचे असं श्रावणीच्या आईला वाटलं.

शनिवारी शाळेला सुटी असणार होती. शुक्रवारी श्रावणी शाळेतून दुपारी घरी आली. आल्यानंतर फ्रेश होणं, खाणं-पिणं आणि आराम करुन झाल्यावर तिच्या खोलीत अभ्यास करत बसली. थोड्या वेळानं आई तिच्याजवळ जावून बसली. श्रावणी इंग्रजीचा अभ्यास करत होती

हेही वाचा!

' इंग्रजीचा गृहपाठ दिला वाटतं शाळेत?' आईनं विचारलं. नाही गं.. इंग्रजीचा तर अभ्यासच नाही दिलेला. विज्ञानाचा सरांनी खूप अभ्यास दिलेला आहे.

' अगं मग आधी विज्ञान करायचा ना?'

' अगं विज्ञानाच्या अभ्यासाचा मूड बनवण्यासाठी आधी इंग्रजीचा अभ्यास करतेय मी!'

श्रावणीचं हे विचित्र उत्तर ऐकून आई जरा गोंधळलीच.

' अगं असं का?'

'असंच गं!' श्रावणीने कंटाळून उत्तर दिलं.

' अगं श्रावणी विज्ञान तुझ्या आवडीचा विषय ना.. मग त्याचा अभ्यास करण्यासाठी मूड कशाला तयार करावा लागतो?'

' मग काय करु आई? आमचे निकुंभ सर आहेत ना ते सगळा मूडच घालवून टाकतात. शाळेत विज्ञानाचा तासच नको असं वाटतं मला!'

अगं पण का?

 ' आई मला नाही आवडत ते सर!'

श्रावणी शिकण्याच्या बाबतीत आवडीच्या मॅडम आणि नावडीचे सर असं काही नसतं बरं का!, शिकणं महत्वाचं असतं!

' पण नाही आवडत मला ते सर तर मी काय करु?'\

'अगं पण का? ते तर नेमकं सांगशील की नाही? नुसते सर आवडत नाही असं म्हणून प्रश्न कसा सुटेल? वर्षभर हे असंच सुरु राहिलं तर विज्ञानात मागे पडशील. सर तर म्हणतील मी शिकवलं होतं म्हणून. का नाही आवडत निकुंभ सर तुला!'

हेही वाचा!

आई त्यांचा स्वभाव अतिशय चिडका आहे. रागीट आहे. एकदा शिकवलं की यायलाच पाहिजे असं म्हणतात ते. प्रश्न विचारला की लक्ष कुठे होतं म्हणून ओरडतात. गृहपाठ तपासताना सर्व काही बरोबर असूनही मुद्दाम चुका शोधून काढतात आणि त्यावरुन बोलतात. कितीही चांगल्या आकृत्या काढल्या तरी त्यांना आवडतच नाही. सगळा मूड जातो त्यांच्यामुळे!'

श्रावणी हे सांगताना अगदी रडवेली झाली होती. श्रावणीच्या आईलाही ही समस्या गंभीर वाटली. काहीतरी करायला हवं असं श्रावणीच्य आईनं ठरवलं.

' हे बघ श्रावणी, काळजी करु नकोस. यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढता येईल. तू सरांच्या रागावण्याकडे लक्ष न देता, मागच्या वर्षी जसा विज्ञानाचा अभ्यास करायचीस ना, तसा अभ्यास कर. मी इतर पालकांशीही बोलून बघते!'

आपल्या आईला आपली समस्या कळली हे जाणून श्रावणीला खूप रिलॅक्स वाटलं.

Image: imgbin

श्रावणीसारखी समस्या खूप मुलांची असते. फक्त शाळेत जाणाऱ्या मुलांनाच नाही तर काॅलेजात शिकणाऱ्या मुला मुलींनाही शिक्षकांबद्दल, त्यांच्या शिकवण्याबद्दल तक्रारी असतात. केवळ आवडीचे शिक्षक नाही म्हणून आपल्या आवडत्या विषयापासून मुलं दूर पळायला लागतात, हे सत्य आहे. पण शिक्षक आवडत नाही म्हणून विषयाकडे दुर्लक्ष करणं हा त्यावरचा उपाय नाही. त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला राहून दुसरीच समस्या डोकं वर काढते. म्हणून शिक्षक आवडत नाही या मूळ प्रश्नाकडे लक्ष देणं, तो प्रश्न सोडवणं महत्वाचं. पण हा प्रश्न सुटेल कसा? त्यावर काय उपाय आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर या प्रश्नावर एकच एक उपाय नाही. अनेक उपायांचे पर्याय आहेत. त्यातले आपल्याला जे करायला सोपे, सोयीचे वाटतात ते करुन हा प्रश्न नक्की सोडवता येतो.

हेही वाचा!

नावडत्या शिक्षकांचा प्रश्न कसा सुटेल?

१. शिक्षकांच्या स्वभावामुळे, त्यांच्या शिकवण्याच्या पध्दतीमुळे शिक्षक नावडते होतात. तर त्यावरचा पहिला आणि थेट पर्याय म्हणजे त्यांच्याशी जावून बोलणे. सर/ मॅडम आपल्याला काय बोलतील? ते शिक्षा करतील का? यापुढे आपल्यावर काट खातील का याची चिंता न करता आपल्याला त्या शिक्षकांची जी गोष्ट आवडत नसेल, ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्याबद्दल त्यांची वेळ घेवून त्यांच्याशी मोकळेपणानं न घाबरता बोलावं. आपलं म्हणणं न चिडता, ओरडता अगदी नम्रपणे मांडावं. या अशा थेट बोलण्यामुळे शिक्षक जर चुकत असतील तर त्यांना त्याची जाणीव होते. कधी कधी शिक्षक मुद्दाम करात नाही. ती त्यांची सवय असते. आपल्या सवयीचा मुलांना इतका त्रास होवू शकतो याबद्दल त्यांना माहीतही नसतं. कदाचित आपल्या बोलण्यानं त्यांना त्याची जाणीव होवू शकते. थेट शिक्षकांशी बोलणं अवघड वाटत असेल तर आपली समस्या लिहून शिक्षकांपर्यंत पोहोचवावी.

२. आपल्या वर्गातल्या इतर मुला मुलींशी बोलावं. त्यांनाही शिक्षकांच्या वागण्याचा त्रास होतो का? हे तपासावं. यावर सर्व मिळून काय करता येईल याचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी ग्रूप करुन आपली समस्या संबंधित शिक्षकांपर्यंत पोहोचवली तर त्याचा चांगला परिणाम होतो.

३. संबंधित शिक्षकांशी बोलायला भीतीच वाटत असेल फार तर शाळेतील आपल्या इतर शिक्षकांशी बोलावं. त्यांना मुलांना काय वाटतं हे त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करावी.

४. शाळा व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापक यांच्याशी बोलावं. बोलताना तक्रारीच्या सुरात न बोलता आपल्याला काय समस्या जाणवतेय हे सांगावं. मुख्याध्यापक संबंधित शिक्षकांशी बोलून हा प्रश्न सुटू शकतो.

५. शाळेतील शिक्षकांबद्दल आपल्याला जर काही समस्या वाटत असेल तर घरी आई बाबांशी यावर मोकळेपणानं बोलावं. आई-बाबा स्वत:च सर्व ओळखतील, पुढाकार घेवून तेच आपल्याला विचारतील याची वाट न पाहाता पालकांशी बोलावं. पालकांनी पुढाकार घेतला तरी या प्रश्नातून सहज मार्ग निघतो.

शिक्षकांची शिकवण्याची पध्दत आवडत नसेल, त्यांनी शिकवलेलं समजत नसेल तर घरी शक्य असल्यास आई बाबांची मदत घेवून ते समजून घ्यावं, वर्गात इतर मुलांची मदत घेवून अडलेला भाग समजून घेता येतो. यूटूबवर संबंधित विषयाचे जर काही व्हिडीओज असतील तर ते पाहावेत. पण शिक्षक आवडत नाही म्हणून विषयाकडेच पाठ फिरवावी, मनातल्या मनात राग राग करत राहावा हे त्यावरच उत्तर होवूच शकत नाही. पटतंय का ते सांगा?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 91120505500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact 

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact