पृथ्वीच्या वातावरणातला 'ग्रीन हाउस इफेक्ट' वाढला असं वाक्य नक्कीच ऐकलं किंवा वाचलं असेल ना तुम्ही.. हे वाचून हा ग्रीन हाऊस इफेक्ट काय? असा प्रश्न अगदी कोणालाही पडेल. हवामान बदल नेमका काय, कसा हे समजून घ्यायचं असेल तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा विषयही माहीत असायलाच हवा. ग्रीन हाऊस इफेक्ट काय असा प्रश्न पडण्याआधी खरंतर ग्रीन हाउस म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्याला हवामान बदलाचे कितीतरी धागे सापडतात. पृथ्वीच्या वातावरणात असलेले पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन हे वायू ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून ओळखले जातात. यांना ग्रीन हाऊस गॅसेस का म्हणतात, हे हा लेख पूर्ण वाचला की नक्कीच समजेल.
हेही वाचा!
ग्रीन हाऊस म्हणजे..
ग्रीन हाऊस म्हणजे हवाबंद काचेची खोली. याचा वापर प्रामुख्याने शेतीत केला जातो. व्यावसायिकरित्या वनस्पती उगवण्यासाठी, पिकं घेण्यासाठी ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी अत्यंत थंड वातावरण असतं, बर्फाळ वातावरणात जिथे शेती करणं तर दूरच पण साधी वनस्पती उगवणं देखील अशक्य असतं तिथे या ग्रीन हाऊसचा वापर केला जातो.
ग्रीन हाऊस ज्या विशिष्ट प्रकारे तयार केलेलं असतं त्या विशिष्ट संरचनेतून 'ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतो. ग्रीन हाऊसच्या भिंती काचेच्या असतात तर त्याचं छत हे अर्धपारदर्शक असतं. येथूनच सूर्याचा प्रकाश ग्रीन हाऊसच्या आत येतो. ग्रीन हाऊसच्या पृष्ठभागावरची सूर्याची ऊष्णता पुन्हा परावर्तित होवून बाहेर पडू शकत नाही. ती ग्रीन हाऊसमधील वायूंद्वारे पुन्हा शोषली जावून ही उष्णता संपूर्ण ग्रीन हाऊसमध्ये पसरते. पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन आणि ओझोन हे वायू ग्रीन हाऊसमध्ये असतात. म्हणून यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. मराठीत याला हरित गृह वायू असं म्हणतात. यातील बरेचसे वायू हे सौर ऊर्जेचं उत्सर्जन शोषून घेण्यास सक्षम नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून शोषली गेलेली सुर्याची उष्णता पुन्हा वातावरणात मिसळली जावून वातावरण गरम होतं.

Image: wikipedia

Image: globalwarming-facts
पृथ्वीवरचा ग्रीन हाऊस इफेक्ट
आपल्या पृथ्वीच्या वातावरणात असलेले पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साइड , मिथेन, नायट्रस ऑक्साइड , ओझोन हे वायू ग्रीन हाऊस गॅसेस प्रमाणे काम करतात, म्हणून या वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. पृथ्वीचं वातावरण संतुलित ठेवण्यात हे वायू खूप महत्वाची भूमिका बजावतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी सौर ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन परावर्तित होवून अंतराळात जाणारी ऊर्जा यांच्यात एक नाजूक बंध असतो. या बंधामुळेच पृथ्वीवरील तापमानाचा समतोल टिकून राहातो. पण गेल्या काही वर्षांपासून हा समतोल ढासळला आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं आहे. कार्बन डाय ऑक्साइड हा ग्रीन हाऊस गॅसेसधला वायू म्हणूनही ओळखला जातो. यासोबतच मिथेन, ओझोन या वायुचं प्रमाणही वाढलं आहे. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणातील ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढल्यानं जो परिणाम वातावरणावर होत आहे, त्याला 'ग्रीन हाउस इफेक्ट' असं म्हटलं जातं. ग्रीन हाऊस इफेक्ट आणि हवामान बदलाचा जवळचा संबंध आहे.
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact