बोली भाषेत बोला आणि मराठी भाषा चांगली करा! काय आहे हा उपक्रम?

चौरास पट्ट्यात धनधान्यांच्या चौराशी उधळणारं ते समृद्ध गाव. त्या गावात माझी शाळा त्या पाचसात हजार लोकवस्तीच्या गावातली. जिल्हा परिषदेची विद्यार्थीप्रिय शाळा. भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे असणारे आसगाव नावाचे गाव. शिक्षकांच्या बदली कार्यशाळेत मी मुद्दाम निवडलेली ती शाळा.भंडारा येथून साठ किलोमीटर दूर ही शाळा. सत्तेचाळीस कि.मी.चा प्रवास बसने आणि नंतरचा बारा- तेरा कि.मी.चा प्रवास मिळेल त्या साधनानं. मी त्या गावात काम करण्याचा घेतलेला निर्णय फारच मोलाचा होता हे मला आताही शंभर टक्के खरं वाटतं. रडतपडत नोकरी करायची नाही. माझं अपडाऊन सुरु झालं;पण हसतखेळत. त्या शाळेत हजार बाराशे मुलं होती. तिथल्या बोलीचा अभ्यास करण्यासाठी मला या गावाची भुरळच पडली.

गेल्याबरोबर मी भाषिक मंच सांस्कृतिक मंच,दैनिक परिपाठ असे विभाग हाती घेतले. फार झपाटल्यासारखे काम करायला प्रारंभ केला. 'मॅडमजी,अजी, असे कर न जी,अजी मले का वाट्टे सांगू का जी..' मनात उत्साह ओसंडून वाहात होता.

शाळेतील मुलं या झाडी बोलीतच बोलायचे. खूप आवडायची मला त्यांची भाषा. मुलांच्या बोलीचा सन्मान करण्यासाठी मी पण मुलांशी प्रमाण भाषा सोडून बोलीतच बोलायला प्रारंभ केला. मुलं अधिक जवळ आली. या बोली भाषेमुळे मला मुलांच्या अंतरंगात डोकावता आलं.

आम्ही बोलीतून कथाकथन सुरु केलं. बोलीत भन्नाट बोलणारा धनराज मला गवसला. रोहित,शिल्पा,प्राची,करिष्मा,रिया,सोपान पल्लवी ही सारी मुलं खूपच गुणवान. या मुलांमुळे मला त्या गावाच्या जवळपासच्या पंचवीसेक गावांशी नातं जोडता आलं. सर्व गावं सधन.वर्षभर उत्पन्न घेणारी कुटुंबं. प्रत्येकच मुलाकडे मोबाइल. पण त्याचा उपयोग काय? तर फक्त मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकणे, चित्रफिती पाहणे. या मोबाइलचा शैक्षणिक उपयोग नाहीच काही. तेव्हा माझ्या मनात मोबाइलला धरुन मुलांसोबत एखादा उपक्रम राबवण्याचा विचार घोळू लागला. २०१४ च्या आधी फेसबुकवर आणि नंतर समाजमाध्यमावर मला बोली विषयी आणि तिथल्या भाषिक व्यवहारासंबंधी काही चळवळ उभी करावीशी वाटायला लागली.

हेही वाचा!

'जागर बोलीचा आदर मराठीचा' या नावानं आम्ही मराठीभाषा विषयक मुलांचा समूह तयार केला. विदर्भातील अनेक लेखक,कवी,कवयित्री मला माहीत होते. लेखकांचे वाढदिवस किंवा जयंती-पुण्यतिथीचं औचित्य साधून त्या आठवड्यात त्या त्या लेखकांचे साहित्य शोधून व्हाॅट्सअप ग्रूपवर टाकायचे. यामुळे मुलांना मराठी भाषा, बोली भाषा याबद्दलची माहिती इंटरनेटवर शोधायला प्रोत्साहन मिळालं. फोनचा वापर उपयुक्त माहितीच्या शोधासाठी करण्याची गरज मुलांमध्ये निर्माण झाली.

नंतर वर्गात दर महिन्यात एक हस्तलिखित तयार करायचं ठरवलं. या उपक्रमामुळे मुलं लिहिती झाली. प्रत्येक महिन्यात विशेषांक काढले. कलर पेंन्सिल,रंगीत, कोरी पानं,स्केचपेन्स..असला किरकोळ खर्च माझ्यासाठी नगण्य होता.कारण मुलांच्या निर्मितीतून मिळणारा आनंद आणि समाधान फार मोठे होते. हस्तलिखित मुलांच्याच हस्ताक्षरात काढले. मुखपृष्ठासाठी स्माइल कॅान्टेस्ट घेऊन मुलांची निवड केली. मुलांना मंच आणि संधी मिळाली तर ती आत्मविश्वासानं उभी राहतात याचा अनुभव या उपक्रमातून आला.

आम्ही वर्गातल्या वर्गातच हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा करायचो . पाऊस विशेषांक, दिवाळी विशेषांक,आई विशेषांक,गावगंध विशेषांक असं मुलांनी काय काय भन्नाट लिहलं. यानिमित्ताने मराठी साहित्यातल्या बऱ्याच गोष्टी मुलांना कळत होत्या.कवीसंमेलन,चर्चासत्र,परिसंवाद,मुलाखती,हास्यकवीसंमेलन,असे बरेच उपक्रम आम्ही घडवून आणले. बोलीचा अलंकार शाळेत असा बहरत होता. मी बोलीचे बोट पकडून मुलांना प्रमाण भाषेच्या वाटेवर घेऊन आले.

मुलंच झाली सेलिब्रिटी!

दहावी होऊन बाहेर पडलेल्या मुलांना शाळेच्या अनेक कार्यक्रमात, स्पर्धात उद्घाटक आणि परीक्षक म्हणून बोलावले. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पाहुणे म्हणून झालेल्या स्वागतानं मुलं भारावली. केवळ भाषेवर केलेल्या प्रेमामुळे , त्याला जोडून केलेल्या उपक्रमांमुळे मुलं आणि माझ्यात , मुलं आणि शाळेमध्ये घट्ट नातं तयार झालं. भाषेवर, बोलीवर केलेल्या प्रेमामुळे मुलं कशी समृध्द होतात, हे मी रोज अनुभवत असते. 'गावाकडं कधी येता जी?' असा एखाद्याचा फोन आला की मनाला केवढा आनंद होतो.

शी! कसली भाषा बोलायला शिकलीयस गं? असे बोलणारेही मला भेटले. पण असं म्हणणाऱ्यांची मला कीवच जास्त वाटली. '.मले मायीवाली भासाच वोक्टी लागते वो मा तुले का सांगू !' असं म्हणून मला खळखळून हसायला येतं.

- स्मिता गालफाडे

लाल बहादूर शास्री विद्यालय,

भंडारा

खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा. 

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

इमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact