आपला आवडता पण जुना झालेला टी शर्ट पुन्हा नवीन करा! तो कसा?

 Image: .pinterest

आपल्याकडे काही कपडे असे असतात जे आपल्याला कधीच टाकून द्यायचे नसतात. म्हणजे कधीच नाही. म्हणजे मोठं झाल्यावर पण नाही. कारण ते कपडे इतके कम्फर्टेबल असतात, की त्यात अजिबात उकडत नाही. किंवा त्यातला एखादा टी शर्ट आपल्याला लकी असतो. किंवा एखादा स्कर्ट आपल्या लाडक्या मामा किंवा मावशीने पहिल्या पगारातून आणलेला असतो, आणि आपण ऑलरेडी दोन वेळा त्याची उंची वाढवलेली असते. पण आता तो स्कर्ट पूर्ण विटलेला असतो किंवा आपल्या टी शर्टचा पुढचा भाग भुरकट झालेला असतो. त्यावर जर काही स्टिकर असेल तर ते निघून गेलेलं असतं.

‘आता ते कपडे टाकून दे नाही तर मी फरशी पुसायला घेईन’ अशी धमकी आईने दोन वेळा देऊन झालेली असते. पण तरी आपल्याला ते कपडे टाकून द्यायचेच नसतात. अशा वेळी ते कपडे वाचवायचे कसे? असा प्रश्न पडतो ना आपल्याला.  आपले आवडते पण जुने झालेले कपडे वाचवण्याचा एकच उपाय म्हणजे मेकओव्हर. त्यांचं रंग-रुप पालटवलं की आपलं जुनं टी शर्टही नवीन होवून जाईल. मग आई तो फेकण्याची भीतीच राहणार नाही. शिवाय जुना टी शर्ट नव्याने मिरवण्याची संधीही मिळेल. पण या जुन्या टी शर्टचा मेक ओव्हर करायचा कसा? सोपं आहे जुनं टी शर्ट रंगवून किंवा त्यावर पॅचवर्क करून!

हेही वाचा!

जुन्या टी शर्टचा मेकओव्हर कसा करणार?


जुन्या झालेल्या तरीही आपल्याला आवडत असलेल्या टी शर्टवर चक्क एखादं मस्त चित्र काढायचं. किंवा एखादं भारी वाक्य लिहायचं. आणि मग ते मस्त रंगवून टाकायचं. मस्त फ्रेश कलर्स घ्यायचे.. जमलं तर पर्ल कलर्स किंवा स्पार्कल्स घ्यायचे.

कपड्यावरचे रंग वेगळे मिळतात. पण ते ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात मिळतात. आणि समजा रंग नसतील तर? तर एखाद्या दुसऱ्या जुन्या फ्रेश कापडातून आपल्याला पाहिजे ते आकार कापायचे, आणि त्याच्या कडा दुमडून ते शिवून टाकायचे. यात फुलं, चांदण्या, ढग, हार्टस असे आकार करणं त्यामानाने पुष्कळच सोपं असतं. आणि अशी सोपी सोपी चित्र एकमेकांना जोडून त्यातून एक छान चित्र बनवणं पण सोपं असतं. म्हणजे हार्टसचं झाड, किंवा चांदण्याचा पाऊस किंवा असं काहीही... तुमचा टीशर्ट किंवा स्कर्ट एकदम नवीन होऊन जाईल.

 Image: meshirtkits

आपलं जुनं पण आवडतं टी शर्ट वाचवायचं असेल तर लागा कामाला!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact