-प्राची पाठक

Image: freepik
हातात कागद आला, तर काय काय बनवावंसं वाटतं. मग ते बसचं तिकीट असो, वर्तमानपत्रात येणारे पॅम्प्लेट्स असोत. किमान त्यावर काहीतरी खरडून होतं. नाहीतर, त्याला वाटेल तश्या घड्या घातल्या जातात. पेन हातात घेऊन एका पाठी एक रेघोट्या मारत स्केच केल्यासारखी काही चित्रं कोऱ्या कागदांवर काढली जातात. असं बरंच काही करतो आपण. आपल्या शाळेच्या वह्यांची सगळी मागची पानं अशीच तर भरलेली असतात. कोणी त्याला रफ वर्क म्हणतात!
शाळेची सुट्टी संपून नवीन वर्ग सुरु होतांना जुन्या वह्यांमध्ये किती कोरे कागद शिल्लक आहेत, जरा बघायचं का? भरलेल्या वह्या, नोट्स, रजिस्टर्स आपल्याला नको असतील, तर त्या वर्गात गेलेल्या कोणाला देता येतील. ते ही कोणी नसेल, तर चक्क 'सुटा कागद/वही कागद' अशा गटात चक्क रद्दीत विकता येईल आणि कॅडबरीचे पैसे सुटतील. कागद कसा रिसायकल होतो, ते त्यानिमित्ताने बघता येईल.
उरला प्रश्न कोऱ्या, अर्ध कोऱ्या, एका बाजूने कोऱ्या कागदांचा. त्याचंही बरंच काही करता येईल.
हेही वाचा!
कोऱ्या पानांचं करायचं काय?
१. एका बाजूने कोरे कागद घरात पुड्या बांधायला, काही यादी बनवायला वापरता येतील. ओरिगामी शिकता येईल.
२. अर्ध कोरे कागद एका आकाराचे करून एकावर एक गड्डी करून नीट कटरने कापून घेता येतील आणि त्याच्या छोट्या छोट्या डायऱ्या करून ठेवता येतील. वहीची शिवण येत नसेल, तर चक्क स्टेपल करता येईल किंवा सुई बदलून घरातल्या शिलाई मशीनवर फार जाड नसलेले कागद एकत्र शिवता येतील.
३. बाकीचे सगळे आख्खे असे कोरे कागद आधी जुन्या वह्यांमधून नीट बाहेर काढायचे. जर एखाद्या वहीत लिहिलेले कागद कमी असतील, तर कटरने वरचेवर तितकेच कागद खाली पुठ्ठा टाकून नीट कापता येतील. त्यात वहीची शिलाई तशीच राहील. ती नवीन वही म्हणून वापरता येईल. वहीच्या शिलाईत एका ठिकाणी असलेला कागद सलग असा खाली कुठेतरी असतो. अर्धा कागद फाडला, तर दुसरीकडचा देखील अर्धा अलगद ओढून काढता येतो. तसं करून देखील वहीचे दोरे न तोडता भरलेले कागद काढून नवी वही करता येईल.
४. कोरे कागद कमीच असतील, तर ते एकत्र किंवा दोन-चार असे अलगद काढून नीट गड्डी करून ठेवायची. कटरने त्यांना सरळ काटकोनात कापून खराब भाग काढून टाकायचा पानाचा. असे एकसारखे अनेक कागद जमले की जाड सुईने ते शिवायचे आणि वरतून खालतून पुठ्ठयाचे कव्हर चिकटवून टाकायचे. झाली कोऱ्या कागदांची नवीन वही तय्यार!
यानिमित्ताने वहीचा कागद आपण जपून वापरायला लागू. अनेक कागद अर्धे भरून ठेवण्यापेक्षा एकच पान पूर्ण भरून मग नवीन पान लिहायला घेऊ. वही कशी चिकटवली जाते, वहीचे किती प्रकार असतात, पानं कशी एकत्र जोडली जातात, ते सगळं आपल्याला बघायला मिळेल. करुन तर पाहू! सांगा कशी वाटली ही आयडिया?
prachi333@hotmail.com

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact