- उमेश घेवरीकर
(पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव जि. अहमदनगर)
कोरोना संकट काळात शाळा बंद शिक्षण मात्र सुरु अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु झाले होते. पालक आणि शिक्षकांना कितीही धास्ती वाटत असली तरी प्रवाहाबरोबर चालत, नवे बदल स्वीकारत मुलांच्या हाती मोबाइल द्यावेच लागले. अर्थात त्याचे चांगले परिणामही दिसून आले. काही काळानं शाळा सुरु झाल्या तरी मुलांच्या हाती असलेला मोबाइल मात्र सुटला नाही. यावरून मग घरात, शाळांमध्ये संघर्ष सुरु झाला. मोबाइलचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम, नेट फिशिंग, ॲडिक्शन असे अनेक विषय ऐरणीवर आले. आमच्या शाळेतही म्हणजे पद्म भूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव या शाळेतही असे प्रसंग उभे राहू लागले. याच मोबाइलकडे अगदी मुलांचा शत्रू अशा दृष्टीकोनातून न पाहता त्याला सकारात्मकतेशी जोडून यातून काही विधायक करता येऊ शकेल का? असा विचार करून आम्ही ‘माय मोबाइल क्लिक’ हा उपक्रम मुलांसोबत राबवण्याचे ठरवले.
या उपक्रमातून मुलांना आपल्या जवळपास किती वैविध्यपूर्ण झाडं. फुलं, पक्षी,प्राणी, किटक आहेत याची ओळख झाली. हे सर्व आपल्या जैवविविधतेचे महत्वपूर्ण घटक असल्याची त्यांना जाणीव झाली. या घटकांवर प्रदूषणाचे नेमके काय परिणाम होत आहेत हेही उमगले.
यासोबतच आपल्या गावात, परिसरात किती प्रकारचे प्रदूषण होते आहे आणि त्याची नेमकी कारणं कोणती हे सुद्धा मुलांनी या स्पर्धेदरम्यान समजून घेतले. हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाय करायला हवेत यावर मुलं चर्चा करू लागली आहेत. पर्यावरण स्नेही जीवनशैली म्हणजे नेमकं काय? ती का महत्वाची आहे?यावर ते पालक आणि शिक्षकांशी बोलू लागले आहेत.

हेही वाचा!

मोबाइलचा वापर करून उत्तम फोटोग्राफी करता येते, भविष्यात या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकतं असेही काही विद्यार्थ्यांना जाणवले. काहींनी विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वाइल्ड लाइफ फोटोंचे संकलन करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर असलेल्या फोटोग्राफी स्पर्धा आणि त्यांची बक्षिसं यांची माहिती त्यांनी प्राप्त केली. मोबाइलचा वापर अशा सहशालेय उपक्रमांसाठी खुबीनं करता येतो हे ' माय मोबाइल क्लिक'द्वारे नकळत पटवून देत त्यातून जैवविविधता, निसर्ग रक्षण करण्याची जाणीव मुलांच्या मनात निर्माण करता आली.
रेशमी किड्याचे जीवन चक्र, विविध रंगांचे नैसर्गिक वरदान लाभलेली अनोखी अळी, घराच्या सोफ्यावर पहुडलेली गोगलगाय, डंख मारण्याच्या तयारीत असलेला विंचू, अनुकूलन साधत उसावर लपलेला किटक असे मुलांनी काढलेले काही फोटो हे त्यांच्याकडील कलात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरले.
मुलं झाली भलतीच खूश
मुलांना या उपक्रमात भाग घेणं अगदीच आवडलं याचं महत्वाचं कारण त्यांना मोबाइल वापरता येणार होता, फक्त तो पालकांच्या मदतीनं किंवा त्यांच्या देखरेखीखाली वापरायचा होता. हा उपक्रम आम्ही सेल्फी किंवा व्यक्तीकेन्द्री फोटोग्राफी यांच्याशी न जोडता थेट जोडला तो ‘जैवविविधता’ या कळीच्या विषयाशी. मुलांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाइलमध्ये त्यांच्या घराच्या, शेताच्या किंवा गावाच्या परिसरातील प्राणी पक्षी किटक, झाडं-झुडपं, फुलं, फळं यांचे फोटो काढून ते आपापल्या विज्ञान शिक्षकांकडे व्हाॅटसॲपद्वारे पाठवायचे असं या उपक्रमाचं स्वरूप ! दरवर्षी १५ ऑगस्ट ते २० फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबवला जात असून २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनी या उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ शाळेत आयोजित करण्यात येतो.

मुलांनी काढलेल्या फोटोंचे परीक्षण तज्ज्ञ फोटोग्राफरकडून करून घेऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतात. या उपक्रमाला स्पर्धेचे स्वरुप दिल्याने निकाल काय लागतो याबाबत मुलांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येते.
मुळात हा एक उपक्रम आहे, फक्त स्पर्धा नाही. त्यामुळे ज्या मुलांकडे मोबाइल उपलब्ध नव्हते त्यांना इतरांनी आपले मोबाइल दिले आणि ते या उपक्रमापासून वंचित रहाणार नाहीत याची काळजी घेतली इतकी ही स्पर्धा निकोप पातळीवर राहिली. सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाइल, इंटरनेट यांचा वापर अवघड गोष्टी सुलभतेने शिकण्यासाठी सहजतेने करता येतो हे पालक आणि विद्यार्थ्यांना उमगलं. माय मोबाइल क्लिक या उपक्रमाद्वारे मोबाइलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडता आलं.
खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
इमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact