मान लवचिक आणि मजबूत करण्यासाठी करा जिराफाचा व्यायाम!

Image: freepik

प्राण्यांचे व्यायाम करायला, कश्शी भारी मजा येतेय की नाही? म्हणूनच गेले काही दिवस झाले, मी तुम्हाला प्राण्यांचे व्यायाम शिकवते आहे.आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम. जिराफ खूप उंच असतो. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या चतुष्पाद प्राण्यांमध्ये जिराफ सर्वांत उंच प्राणी तर आहेच, पण सर्वांत मोठा रवंथ करणारा प्राणीही आहे.

जिराफाचे बारकुडे वाटणारे पाय आणि मान यामुळे तो लुकडा-सुकडा वाटतो, पण जिराफाचं वजन किती असतं, तुम्हाला माहीत आहे?

या लुकड्या-काटकुळ्या वाटणाऱ्या जिराफाचं वजन तब्बल १२०० किलोपर्यंत असतं. आणि आपल्या या काटकुळ्या पायांनी एवढं वजन तो सहजपणे पेलतो.

तुम्हाला वाटत असेल, मग तोही हत्तीप्रमाणे हळूहळू पळत असेल. पण तीन हजार किलोचा हत्तीही वेळ आली की वेगात पळू शकतो आणि जिराफ तर ताशी तब्बल ५६ किलोमीटर वेगानं पळू शकतो. हा शाकाहारी लंबूटांग दिवसभरात केवळ दोन-अडीच तासच झोपतो आणि तेही उभ्या उभ्या.

जिराफ कायम मानेचा व्यायाम करत असतो आणि त्याची मान हेच जणू त्याचे हात असतात. हा लांबटांग्या आणि हाडूक उच्चा व्यायाम कसा करायचा ते आपण पाहू.

हेही वाचा!

जिराफाचा व्यायाम कसा करायचा?

१. आधी निट सरळ उभे राहा.

२. दोन्ही हातांची गुंफण करा.

३. हात डोक्यावर न्या.

४. नागीण डान्स करताना हात आपण जसे मागे पुढे करतो, तसे करत चाला.

५. सोबत मानही मागे-पुढे करा.

Images: kidsyogastories

जिराफ व्यायमाचा फायदा काय?

१. हातांतली ताकद वाढेल.

२. खांदे भरभक्कम होतील.

३. मानेचा व्यायाम होईल.

४. मानेचे स्रायू बळकट होतील.

५. मानेचं दुखणं असल्यास ते कमी होऊ शकेल. (पण जास्त दुखायला लागलं तर मान मागे-पुढे करू नका.)

६. खांद्यातल्या सांध्यांची लवचिकता वाढेल.

७. पाठीचाही व्यायाम होईल.

असा हा जिराफ. त्याचे पायाचे व्यायामही फार भारी आहेत. तो चालताना आधी त्याचे दोन्ही पाय उचलून पुढे टाकतो आणि नंतर मागचे दोन्ही. तो व्यायाम कसा करायचा, ते मात्र तुमचं तुम्ही शोधून काढा.

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact