
Image: freepik
आई म्हणते, मुलगी असो की मुलगा प्रत्येकाला स्वयंपाक यायला हवा, असं का? मला अजिबात आवडत नाही ते काम!
प्रथमेश रिसबुड, पुणे
प्रथमेश, शाळेत आपण माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल शिकतो. त्या कुठल्या आहेत बरं? अन्न, वस्त्र आणि निवारा. यातलं अन्न हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तू मोबाईलवर गेम्स खेळतच असशील, किंवा फोनवरुन तुझ्या मित्रमैत्रीणींशीही बोलत असशील आणि बोलता बोलता फोनची बॅटरी गेली तर काय करतोस?
फोन चार्जिंगला लावतोस बरोबर!
अन्न हे पण आपल्या शरीराला रिचार्ज करायचं काम करत असतं. जर अन्न नसेल तर आपण जगू शकतो का? नाही! मग जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, मूलभूत आहे ते आपल्याला बनवता यायला नको का? यात आवडी निवडीचा प्रश्नच नाहीये. स्वयंपाक शिकणं हे जीवन कौशल्य आहे म्हणजे असं कौशल्य जे जगण्यासाठी प्रत्येकाला यायला हवं.
तुला माहितेये करोना काळात लॉकडाऊननंतर परगावी राहणारे अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी दुसऱ्या गावात राहणारे अनेक तरुण यांचे सुरुवातीला खूप हाल झाले कारण लॉकडाऊन नंतर त्यांच्या मेस बंद झाल्या आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नव्हता. घरात सामान, गॅस असूनही उपयोग नव्हता कारण तो वापरायचा कसा, एखादा पदार्थ किंवा अगदी वरण भाताचा कुकर लावायचा कसा हेही त्यांना येत नव्हतं. मग त्यातल्या अनेकांनी सुरुवातीचे हाल सहन केल्यावर नंतर त्यांच्या आईला फोन करून व्हॉट्स ॲप व्हिडीओ करून स्वयंपाक शिकून घेतला. अशी वेळ कुणावरही कधीही येता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आपत्तीत आपल्याला स्वत:ला सांभाळता आलंच पाहिजे आणि त्यासाठी स्वयंपाक आलाच पाहिजे.
हेही वाचा!
दुसरं, स्वयंपाक ही काही फक्त आई किंवा बहिणीची जबाबदारी नाही तर साऱ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुला आवडत नसलं तरीही आई म्हणतेय ते बरोबर आहे. प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच हवा. शिवाय स्वयंपाक हे फक्त काम नाही तर ती एक कलाही आहे. स्वयंपाक करताना आपण विविध प्रयोग करुन वेगवेगळ्या चवीचे पदार्थ करु शकतो. आपण जेव्हा आपल्या हाताने काही करतो त्याचा आनंदही वेगळा असतो. तो केवळ आपल्याला खाण्यातून मिळूच शकत नाही. हे सगळं जर आपल्याला अनुभवायचं असेल तर स्वयंपाक हा आपल्याला यायलाच हवा. स त्यामुळे आता आईच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे गिरवायला सुरुवात कर आणि या कामातला आनंद काय असतो ते एकदा अनुभवून बघ!

Image: freepik
एखादा पदार्थ बनवून बघितल्यावर तुला काय वाटलं, तुझा अनुभव कसा होता हे ही मला नक्की लिहून पाठव. तुला स्वयंपाक शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact