सरकारी प्राथमिक विद्यालय, पुनर्वसन-साळ

उत्तेजनार्थ- रुपये ५०,०००

जैवविविधता डायरी

शाळेचं नाव: सरकारी प्राथमिक विद्यालय, पुनर्वसन-साळ-डिचोली-गोवा

पत्ता: पुनर्वसन-साळ, डिचोली तालुका, गोवा – 403505

मुख्याध्यापक: श्री. धाकटू पाटील

प्रकल्प प्रमुख शिक्षक: श्री. संकेत सुरेश नाईक

इ- मेल – naikssanket@gmail.com

शाळेची पार्श्वभूमी

आमची शाळा डिचोली तालुक्यातील पुनर्वसन-साळ या माळरानावर वसलेल्या निसर्गरम्य गावात स्थित आहे. ही शाळा महाराष्ट्रातील तिराळी धरणामुळे विस्थापित झालेल्या सात गावांतील कुटुंबांसाठी उभारलेल्या पुनर्वसन वसाहतीत सुरू करण्यात आली आहे. येथे मुख्यतः गरीब, कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या आर्थिक आणि सामाजिक मर्यादा आहे.


शाळेचा परिसर नैसर्गिक विविधतेने समृद्ध आहे. ही शाळा दोडामार्ग तालुक्यातील कासाईनाथ डोंगराच्या परिघात येते. शाळेच्या सभोवताल कोलवाळ नदी, ओढे, डोंगररांगा, पाणथळ जागा, देवराई आणि पारंपरिक देवतळे असे निसर्गसंपन्न व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आम्ही या परिसराचा उपयोग शिकण्यासाठी केला. 


आमच्या शाळेचे शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून, "अनुभवाधारित आणि निसर्गाशी जोडलेले शिक्षण" हे आमचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 


आमची शाळा ही केवळ शैक्षणिक संस्था नसून, निसर्ग, संस्कृती आणि समाज यांचे एकत्रित प्रयोगशाळा आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, कुतूहल, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जागरूकता प्रभावीपणे विकसित झाली आहे.


ही शाळा आता "पर्यावरण स्नेही आणि समाजाभिमुख शिक्षणाचे उत्तम मॉडेल" म्हणून ओळखली जात आहे.

कल्पना कशी सुचली?

आमच्या शाळेत गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणावर आधारित अनेक उपक्रम राबवले जात आहेत. निसर्गाशी विद्यार्थ्यांची नाळ जुळावी आणि ते निसर्गाचे संवर्धक बनावेत हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्यक्ष अनुभवाची संधी हरवली होती. त्यामुळे मुलांना पुन्हा निसर्गाच्या जवळ नेणे आणि त्यांच्यातील पर्यावरण संवेदनशीलता जागृत करणे गरजेचे वाटू लागले.


शाळेतील विविध उपक्रमांची यशस्वी पार्श्वभूमी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा सक्रिय सहभाग यामुळे या कल्पनेला अधिक बळ मिळाले. विशेषतः राष्ट्रीय वन्यजीव मंडळ सदस्य तथा  पर्यावरण अभ्यासक श्री. राजेंद्र केरकर यांचे मार्गदर्शन आमच्या प्रत्येक उपक्रमाला मिळत राहिले. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी परिसरातील जैवविविधतेकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. तसेच 'विवेकानंद पर्यावरण जागृती फौज (केरी, सत्तरी)' आणि 'वनश्री प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग)' या संस्थांनी वेळोवेळी दिलेले प्रशिक्षण, कार्यशाळा आणि मार्गदर्शन यामुळे या उपक्रमाची उभारणी अधिक प्रभावी झाली.


गावातील जंगल, देवराई, नदी, ओढे, पाणथळ क्षेत्र, पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती, कीटक, सरीसृप आणि ऋतूनुसार होणारे पर्यावरणीय बदल यांचे विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षण करावे आणि त्याची नोंद करावी, या कल्पनेतूनच 'जैवविविधता डायरी' या नावाने प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कल्पना केवळ एका वर्गापुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण शाळेचा आणि गावाचा सहभाग असलेला उपक्रम बनवण्याचे ठरवले. या उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ निसर्गप्रेमीच नाही तर निसर्गसंवर्धक बनले आहेत.

आम्ही काय केलं? कसं केलं?

प्रकल्पाची सुरुवात:

  • विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
  • निसर्ग निरीक्षण कसे करावे, नोंदी कशा घ्याव्यात, योग्य निरीक्षणासाठी कोणते साधन वापरावे (दुर्बीण, वही, पेन) याचे प्रशिक्षण दिले.
  • शाळेच्या परिसरातील झाडे, प्राणी, पक्षी, कीटक यांची ओळख करून देण्याचा प्राथमिक टप्पा राबवला.
  • विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चर्चात्मक वर्ग घेतले.
  • पर्यावरण अभ्यासक श्री. राजेंद्र केरकर यांचे मार्गदर्शन, तसेच विवेकानंद पर्यावरण जागृती फौज आणि वनश्री प्रतिष्ठान या संस्थांचे सहकार्य लाभले.

अंमलबजावणी:

  • प्रत्येक आठवड्याला ठराविक दिवशी विद्यार्थ्यांसोबत निरीक्षण फेरीचे आयोजन केले.
  • परिसरातील देवराई, पाणथळ भाग, नदीकाठ, डोंगर, रान, गावातील विविध ठिकाणी निरीक्षण दौरे केले.

या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी 

पक्षी निरीक्षण सत्र: पक्षांचे आवाज, रंग, आकार, खाद्य व स्थलांतर यांचा अभ्यास केला.

  • रोड किल सर्वेक्षण: रस्त्यावर मृत झालेल्या प्राण्यांचे नोंद करून, वाहतुकीच्या प्रभावाचे विश्लेषण केले.
  • वृक्षओळख: झाडांची पाने, फुले, फळे आणि साल यांच्या आधारे ओळख पटवली.
  • औषधी वनस्पती शोध: स्थानिक औषधी वनस्पती आणि त्यांचे पारंपरिक उपयोग जाणून घेतले.
  • पाणथळ क्षेत्र अभ्यास: बेडूक, मासे, पक्षी आणि पाणवनस्पतींचे निरीक्षण केले.
  • निरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी माहिती व नोंदी डायरीत लिहिल्या.
  • स्थानिक लोकांकडून कडून पारंपरिक माहिती संकलित केली.
  • मार्गदर्शक शिक्षकांनी विशिष्ट पद्धतीने डेटा संकलनाचे तंत्र शिकवले.


इतर उपक्रम आणि पूरक क्रियाकलाप:

  • काही वेळा विद्यार्थ्यांसोबत 'नदीकाठ वर्ग', 'देवराई भेट', 'निसर्गभेट' घेतली.
  • मुलांनी स्वतःचे निरीक्षण फलक तयार केले.
  • जैवविविधता पूरक उपक्रम राबवले.
  • नोंदी घेतल्यानंतर चर्चा सत्र आयोजित केली ज्यात प्रत्येकाने आपापल्या निरीक्षणाचा सादरीकरण केले.


अडचणी आणि आव्हानं

  • सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये अनेक अडचणी येतात — झाडांची ओळख, वैज्ञानिक नावे शोधणे, दुर्गम भागात जाणे, भीती वाटणे, डेटा संकलनातील अडचणी वगैरे. मात्र, ‘जैवविविधता डायरी’ प्रकल्पात अशा कोणत्याही मोठ्या अडचणी आल्या नाहीत. या यशाचे मुख्य कारण म्हणजे प्रकल्पाचे नेतृत्व करणारे शिक्षक संकेत नाईक हे स्वतः गेली २५ वर्षे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या समृद्ध अनुभवाचा आणि दैनंदिन निसर्ग अभ्यासाचा या प्रकल्पाला मोठा फायदा झाला. तसेच या प्रकल्पात ‘विवेकानंद पर्यावरण जागृती फौज (केरी, गोवा)’ आणि ‘वनश्री प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)’ या दोन नामांकित पर्यावरण संस्थांचा सातत्याने मिळालेला मार्गदर्शन आणि सहकार्यदेखील अत्यंत मोलाचे ठरले.
  • निसर्ग हा स्वतःच एक शिक्षक आहे. योग्य दृष्टी, अनुभव आणि मार्गदर्शन असल्यास तो शिकण्याची संधी सतत देतो. हाच दृष्टिकोन ठेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी अतिशय सुकर आणि यशस्वी झाली. 
  • थोडक्यात:अडचणी नव्हत्या असे नाही, पण त्या येण्यापूर्वीच अनुभव, नियोजन आणि मार्गदर्शनाच्या जोरावर त्या टाळल्या गेल्या.

प्रकल्पाचा परिणाम आणि प्रभाव:

विद्यार्थ्यांमध्ये:

  • निरीक्षणक्षमता आणि पर्यावरणीय जाणीव वाढली.
  • शाळा आणि परिसरातील प्रत्येक झाड, पक्षी, कीटक ओळखण्याची क्षमता वाढली.
  • सर्जनशीलता आणि संशोधन वृत्ती वाढली.

समाजावर:

  • गावकरी देखील आता निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत.

शाळेवर:

  • "ऊर्जा उपक्रम" अंतर्गत ५०,००० रुपयांची रक्कम अनुदान म्हणून मिळाली.
  • "गोव्यातील एकमेव निवडलेली शाळा" म्हणून राज्यस्तरीय ओळख निर्माण झाली.

पुढील योजना:

  • पुस्तक रूपी जैवविविधता डेटाबेस तयार करणे. ‘लोकमत ऊर्जा’ कडून मिळालेल्या निधीचा त्यासाठी वापर करणे.

इतर शाळांसाठी सूचना:

  • परिसराचा अभ्यास करा, स्थानिक लोकसहभाग घ्या.
  • मुलांना प्रत्यक्ष निसर्ग निरीक्षणाचे प्रशिक्षण द्या.
  • शाळा-समाज-पालक-शिक्षक यांचा समन्वय ठेवा.
  • सुरुवातीला लहान पायरीपासून सुरुवात करा – झाडांची नावे, पक्षी निरीक्षण, इत्यादी.

मनोगतं

विद्यार्थी :

"आम्हाला पक्षी, झाडं ओळखता येऊ लागलंय... आता आम्ही निसर्ग मित्र झालोय!"

- अनघा डेग्वेकर

“मी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दलची उत्सुकता आणि त्यांचा आत्मीय सहभाग प्रत्यक्ष अनुभवला. शाळेच्या परिसरात लपलेली जैवविविधता शोधताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, प्रश्नांची सरबत्ती, आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची ओढ पाहून मन भारावून गेलं.

'जैवविविधता डायरी' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी केवळ झाडं, प्राणी, पक्षी ओळखले नाहीत, तर निसर्गाशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं आहे. त्यांनी परिसरातील देवराई, ओढे, नदीकाठ, पाणथळ जागा यांची एक वेगळीच अनुभूती घेतली.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नजरेतून निसर्गाचे दस्तऐवजीकरण करताना जी चिकाटी, सातत्य आणि प्रेम दाखवलं, त्यातून त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना अधिक प्रगल्भ झाली आहे.

हा प्रकल्प इथेच थांबणार नाही. पुढील टप्प्यात जैवविविधतेचा डिजिटल संग्रह तयार करणे, निसर्ग वाचन केंद्र उभारणे आणि गावकऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेणे हे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मी आणि माझ्या शाळेचा दृढ निर्धार आहे.”

-प्रकल्प प्रमुख शिक्षक – संकेत नाईक

“आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हे पुस्तकांपलिकडचं असायला हवं. या उपक्रमामुळे ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरल्याचं पाहून आनंद होतो. विद्यार्थ्यांना वर्गाच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न ठेवता, त्यांना निसर्गात घेऊन जाणं, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणं ही आमची भूमिका आहे.

'जैवविविधता डायरी' प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांनी केवळ निसर्ग समजून घेतला नाही, तर त्यांच्या मनात संवेदनशीलता, कुतूहल आणि संशोधनाची वृत्ती निर्माण झाली.

या उपक्रमात पालक, ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी यांचा मिळालेला सहभाग हे या यशाचे खरे श्रेय आहे. भविष्यातही असे अनुभवाधारित उपक्रम शाळेत सातत्याने राबवण्याचा आमचा मानस आहे. शिक्षण हे अनुभवातून घडावं, आणि त्यातून विद्यार्थी जबाबदार नागरिक बनावेत हे आमचे अंतिम ध्येय आहे.”

- मुख्याध्यापक – श्री. धाकटू पाटील