
Image: yogatute
तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या शिक्षकांनी, नाहीतर तुमच्या पालकांनी अनेकदा सांगितलं असेल, ताठ उभं राहा. असे लुळ्यापाळ्यासारखे का उभे राहता म्हणून. म्हणजे फक्त उभे असतानाच नाही, अनेकांना तर बसलेले असतानाही पाठीचा गोळा करुन बसायची सवय असते. पण ही सवयच नंतर आपल्याला घातक ठरते. अनेकांना पाठीचा त्रास सुरू होतो. थोडा वेळ बसलं तरी पाठ दुखायला लागते. हे टाळायचं असेल तर पाठीचे व्यायाम करायलाच हवेत. अनेकदा लहान मुलांचीही पाठ दुखते. कारण एकतर पाठीत ताकद नसते, लवचिकता नसते आणि बसण्याची, उभं राहण्याची पद्धत चुकीची असते.
पण आज मी तुम्हाला एक व्यायाम सांगणार आहे. पाठीसाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे. त्यामुळे तुमची उठण्या-बसण्याची पद्धत तर सुधारेलच, पण पाठीचा त्रास होण्याची शक्यताही खूपच कमी होईल. अनेकांना लोअर बॅकचा त्रास होतो, म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखतं. त्यासाठीचा व्यायाम आहे ‘लोअर बॅक रोटेशनल स्ट्रेचेस’!
आपण काही वेळा जसं डोक्याला ताण देतो, तसं पाठीला ताण द्यायचा फक्त. बसल्या बसल्यासुद्धा हा व्यायाम करता येतो, पण त्याची पद्धत मी तुम्हाला नंतर सांगेन.
हेही वाचा!
लोअर बॅक रोटेशनल स्ट्रेचेस कसे कराल?
१. जमिनीवर अंथरायला एखादी सतरंजी नाहीतर मॅट घ्या. सरळ त्यावर झोपून घ्या.
२. आता दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा.
३. आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा.
४. हात जमिनीला टेकलेले असतानाच आपले दोन्ही पाय कंबरेपासून फिरवून जमिनीच्या एका बाजूला टेकवा.
५. पाच सेकंद त्याच अवस्थेत राहा.
६. लक्षात ठेवा, हात मात्र उचलायचे नाहीत, ते वाकडेतिकडे होऊ द्यायचे नाहीत.
७. आता असंच दुसऱ्या बाजूनंही करा.

Image: freepik
पाठीला ताण दिल्याने काय होईल?
१. पाठीचा, विशेषत: पाठीच्या खालच्या भागाला व्यायाम मिळेल.
२. लवचिकता वाढेल.
३. पाठ मजबूत होईल.
४. चपळता आणि स्फूर्ती वाढेल.
करा हा व्यायाम, म्हणजे कोणाला पाठ दाखवायची वेळ तुमच्यावर येणार नाही!
- ऊर्जा
Feature Image: forbes health
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact