गोष्टीतल्या कावळ्यांसारखेच खरेखुरे कावळेही धूर्त आणि हुशार असतात का?

Image: bbc

आपण कावळ्याच्या दोन गोष्टी हमखास ऐकलेल्या असतात. एक म्हणजे अडीअडचणीच्या काळात चिऊताई कावळ्याला तिच्या मेणाच्या घरात जागा देते. त्याला आपल्या पिल्लांच्या खाऊच्या डब्यात लपवते. पण हा धूर्त कावळा रात्रभर भर पावसात चिमणीच्या ऊबदार घरात राहातो आणि सकाळी तिच्या पिल्लांचा सर्व खाऊ फस्त करुन पळून जातो. किती राग येतो ना आपल्याला त्या कावळ्याचा, त्याच्या धूर्तपणाचा!

दुसरी गोष्ट म्हणजे तहान लागलेला कावळा मडक्यातलं तळाचं पाणी खडे टाकून टाकून वर आणतो आणि तहान भागवतो. कौतुकच वाटलं होतं ना आपल्याला कावळ्याच्या हुशारीचं.

पण हे सर्व गोष्टीत.. खरा खुरा कावळा कसला आलाय धूर्त आणि हुशार? असंच आपल्याला वाटत असतं. पण खराखुरा कावळा देखील हुशार असतो. उलट कावळ्याच्या हुशारीची तुलना माणसाच्या हुशारीसोबत केली जाते. कावळासुध्दा माणसासारखाच हुशार असं म्हटलं जातं. हे कोण म्हणतं माहीतीये का? अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी कावळ्याच्या मेंदूचा, त्याच्या बुध्दीमत्तेचा, त्याच्या जगण्याचा खोलवर अभ्यास केला आहे. या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आलेत ते कावळा कसा हुशार आहे हेच सांगतं.

हेही वाचा!

कावळा हुशार म्हणता त्याचा पुरावा काय?

अमेरिकेतल्या अभ्यासकांनी काही कावळ्यांच्या प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी कावळ्यांना एका प्रयोगशाळेत आणलं. तिथे कावळ्याच्या समोर कोरड्या झालेल्या अन्नाचं वाडगं ठेवलं. कोरडं ते काढण्यासाठी कावळ्याने डोकं लढवलं, त्याने प्रयोगशाळेत एका भांड्यात असलेलं पाणी थोडं थोडं करुन त्या अन्नाच्या वाडग्यात टाकलं, अन्न मऊ झालं आणि ते कावळ्याला खाता आलं. यावरुन कावळा त्याच्या डोक्यात माणसाच्या हाताच्या अंगट्याएवढ्या मेंदूचा कसा हुशारीने वापर करतो हे लक्षात आलं.

 Image: wired

कावळ्याला आपलं अन्न कसं मिळवावं हे बरोबर कळतं. तो त्यासाठी विविध युक्त्या लढवतो. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाता येतं. शेतात आलेल्या पिकावर डल्ला मारतो, कधी इतर पक्ष्यांनी घातलेली अंडी पळवून खातो.  पाणमांजराचं लक्ष दुसरीकडे वळवून कावळा त्याच्या पुढ्यातले मासे पळवतो, कधी पाळलेल्या कुत्र्यांसमोर ठेवलेल्या अन्नाच्या भांड्यातील अन्न झडप घालून पळवतो आणि भुर्रकन उडून जातो. कावळा फक्त अन्नाची पळवापळवीच करतो असं नाही तर निसर्गात असलेलं अन्नही तो बरोबर शोधून काढतो. तो झाडाच्या बुंध्याला चोचीने टोचे मारुन त्यात लपलेले किडे खातो. तसेच नदी किंवा डबक्याच्या ठिकाणी काड्या, दगडं यांचा वापर करुन ओलसर भाग त्याने चिवडून पाण्यातले किडे खातो. कावळा आपलं अन्न हुशारीने शोधून काढतोच. कावळ्यांकडे उपलब्ध साधनांचा हुशारीने वापर करण्याची बुध्दी आणि चतुराई असते.

कावळ्यांना चेहेरे लक्षात् राहातात. वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटीनेतील संशोधकांनी यासाट्ही काही कावळ्यांचा अभ्यास केला. त्यांनी अभ्यासासाठी पकडून आणलेल्या कावळ्यासमोर गुहेतल्या आदिमानवाप्रमाणे चेहेऱ्यावर मास्क घातले आणि ते कावळ्यासमोर आले. नंतर त्यांनी त्या कावळ्यांना विद्यापिठाच्या आवारात सोडून दिले. आणि संशोधक त्या विद्यापिठाच्या आवारात चेहेऱ्यावर तेच मास्क घालून फिरु लागले. कावळ्यांनी आधी ते मास्क पाहिले होते, त्यांनी ते ओळखले . त्यांना राग आला, ते उडता उडता मास्क घातलेल्या संशोधकांना चोच मारण्यासाठी खाली येत होते. कावळे त्यांना दगडं मारुन उडवणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या माणसांचे चेहेरे बरोबर ओळखतात.

रस्त्यावर एखादा पक्षी किंवा प्राणी मरुन पडलेला असेल तर खूप कावळे अवतीभवती जमा होतात आणि कर्णकर्कश काव काव करतात. त्याचं कारण ते एकमेकांना इथे राहाण्यास काहीतरी धोका दिसतोय, इथे आपण सावधपणे राहायला हवं नाहीतर दुसरीकडे जायला हवं.. यासारखे संदेश हे कावळे एकत्र जमून, काव- काव करुन एकमेकांना देत असतात.

Image: humanesociety

कावळे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. कुटुंबातील कावळे माणस्ं कशी घरात एकमेकांना मदत करतात, तशी मदत करतात. मोठे झालेले कावळे अंडी उबवायला बसलेल्या आपल्या आईला बाहेरुन अन्ब्ब आणून देतात, घरटं बांधायला मदत करतात, घरटं स्वच्छ ठेवायला मदत करतात.

कावळे परिस्थितीशी, बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेतात. त्यामुळेच जगभरात सगळीकडे कावळ्यांची संख्या वाढतेच आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact