
आनंद निकेतन, नाशिक
प्रथम पारितोषिक - रुपये २,००,०००
पर्यावरण जाणीव जागृती व संवर्धन केंद्र
शाळेचं नाव: आनंद निकेतन, नाशिक
पत्ता: नाईस वजन काट्याशेजारी, कामगार नगर, सातपूर, नाशिक
मुख्याध्यापक: नीलिमा कुलकर्णी
प्रकल्प प्रमुख शिक्षक: अमित टिल्लू
इ- मेल – amittillu@gmail.com

शाळेची थोडी पार्श्वभूमी. तुमच्या शाळेतल्या मुलांबद्दल थोडं काही
आमची शाळा नाशिक शहर परिसरातील सातपूर गावठाणामध्ये येते. आमच्या आसपास इंडस्ट्रियल मधील वसाहती आहेत. तसेच सातपूर औद्योगिक क्षेत्राला लागून आमची शाळा येते. आमच्या शाळेमध्ये आम्ही जाणीवपूर्वक सर्व आर्थिक स्तरातील मुलांना प्रवेश देतो. ज्यायोगे आपण राहात असलेल्या समाजाचे प्रतिबिंबच शाळेमध्ये असते. या तत्त्वामुळे आमच्या शाळेमध्ये विविध आर्थिक घटकातील मुले येतात. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा समावेश देखील आमच्या शाळेमध्ये आवर्जून केला जातो.
काय करायचं ठरवलं होतं? ही कल्पना कशी सुचली?
पर्यावरण रक्षण हा विषय मूलतः फक्त प्रकल्प म्हणून करण्याचा नाही हा आमचा विश्वास आहे. जोपर्यंत पर्यावरण रक्षण हा विषय रोजच्या व्यवहारात, जीवनशैलीत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी आत्मसात केला असं म्हणता येत नाही. ज्या प्रकारे आम्ही आमच्या शाळेत मूल्यशिक्षण हा विषय वेगळा शिकवत नाही तसंच पर्यावरण रक्षण देखील नाही. त्यामुळेच आम्ही शाळेमध्ये पर्यावरण जागृती संदर्भातील वेगवेगळ्या घटकांवर सतत काम करत असतो आणि मुलांना काम करायला प्रेरित करत असतो. पर्यावरण हा एक वैज्ञानिक विषय आहे पण त्याचबरोबर तो सामाजिक आणि भावनिक देखील आहे. शाळेच्या मुलांमध्ये वाढत जाणारी पर्यावरणाची अनास्था व वस्तूंचा भरमसाठ वापर हे आम्हा शिक्षकांना नेहमीच टोचत आलेले आहे आणि त्यावर जर सकारात्मक बदल करायचा असेल तर मुलांमध्ये जाणीव जागृती शिवाय कुठलाही दुसरा पर्याय नाही असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे या प्रकल्पाची सुरुवात शाळेच्या जडणघडणीबरोबरच झाली.
आम्ही काय केलं? कसं केलं?
पर्यावरण शिक्षण हा आनंद निकेतनमध्ये रोजच आणि प्रत्येक कृती बरोबर जोडलेला घटक आहे. स्वतः विद्यार्थी, शाळा आणि पर्यावरण हे वेगवेगळे घटक नसून एकाच रचनेचे भाग आहेत. त्यामुळे यांचा विचार तुटक तुटक न करता एकात्मिक भावनेने करणे आवश्यक असते . कुठल्याही विषयातील जाणीव जागृतीची सुरुवात ही संवेदनशीलते मधून होते त्यामुळे विद्यार्थ्यांना गोष्टी दिसणे, त्या जाणवणे व त्यावर कार्यवाही करणे अशा त्रिस्तरीय रचनेमध्ये आम्ही काम करतो. उदाहरणार्थ शाळेमधील एका नळामधून पाणी थेंब थेंब गळत आहे
१. प्रथम पायरी पाणी गळते आहे याची नोंद विद्यार्थ्यांना करून देणे
२. त्यावर काय कार्यवाही करता येईल जसे नळाचा वॉशर बदलणे किंवा आवश्यकतेनुसार नळ बदलणे
३. प्रत्यक्ष कारवाई जसे स्वतः किंवा तज्ञ व्यक्तीकडून नळ दुरुस्त करून घेणे
याबरोबर वेगवेगळ्या संस्था व झेरॉक्स दुकानातून वाया जाणारे पाठकोरे कागद वापरणे गेली २७ वर्षे सुरु आहे. त्याचप्रमाणे पाण्याची बचत, रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, गणपतीत शाडूची मुर्ती करुन बादलीत विसर्जन करणे, निसर्ग निरीक्षण, बायोवॉकच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या भगातील वनस्पतींची माहिती करुन देणे, ओल्या कचर्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत मुले व पालक यांमध्ये जागरुकता निर्माण करणे असे विविध उपक्रम सतत चालू असतात. (सोबत या विषयावर आम्ही लिहिलेला लेख जोडला आहे)
अडचणी काय होत्या ? आव्हानं कोणती ?
सगळ्यात मोठी अडचण ही मुलांमध्ये संवेदनशीलता आणणे हीच होती मुलांना परिसरातील शाळेमधील, घरामधील पर्यावरणीय अडचणी दिसत नव्हत्या असे नाही त्या विषयाचा परिणाम काय होतो याची कल्पना नसल्यामुळे मुलं ते दुर्लक्ष करतात असे आमच्या लक्षात आले. त्यामुळे वरच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे बरीचशी ऊर्जा ही मुलांना संवेदनशील बनवण्यामध्ये जाते. पाणी गळते आहे, पंखा कोणीही नसताना फिरतो आहे, कागद फुकट जातो आहे, प्लास्टिक ग्राउंड मध्ये पडलेले आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना जाणीव करून हे खूप महत्त्वाचे होते आणि सगळ्यात कठीण सुद्धा.
प्रत्येक प्रकल्प करताना वेगवेगळ्या अडचणी येतातच. मुलांना प्रकल्पासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणे. तज्ज्ञ व्यक्तींची अनुपलब्धता, पालकांच्या क्रमिक अभ्यासक्रमातील अपेक्षांचे ओझं, आर्थिक प्रावधान अशा अनेक गोष्टींची आव्हाने समोर होती.
प्रकल्पाचा परिणाम, प्रभाव?
हा प्रकल्प केवळ आमच्या शाळेच्या मुलांपर्यंतच मर्यादित असल्यामुळे त्यांच्यामधील सूक्ष्म बदल बघणे शक्य झाले. मुले आता बरीच संवेदनशील झाली आहेत. कुठल्याही गोष्टी करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये थोडीफार पर्यावरण स्नेहिता दिसत आहे. इंग्लिशमध्ये एक संज्ञा वापरली जाते इन्फॉर्मड चॉईस यानुसार मुले काही निर्णय घेऊ शकत आहेत. यामध्ये सायकलने शाळेत येणे, स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या वापरणे, कागद फुकट जाऊन न देणे, झाडांची काळजी घेणे वगैरे
पुढे काय करायची इच्छा / नियोजन आहे?
हा प्रकल्प आणखीन मोठ्या स्तरावर करण्याचे नियोजन आहे. आत्ता आम्ही वेगवेगळ्या मर्यादांमुळे हा प्रकल्प आमच्याच शाळेतील मुलांबरोबर करत आहोत. तोच प्रकल्प परिसरातील शाळांमध्ये करण्याची आमची इच्छा आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा देखील असतील जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा पर्यावरण स्नेहित्वाचा विचार यशस्वीरित्या नेता येईल व त्यांच्यामध्ये या विषयासंदर्भातील जाणीव जागृतीचे वर्धन करता येईल.
हाच प्रकल्प आपल्या शाळेत राबवायचा असे कुणी ठरवले तर त्यांच्यासाठी काही सूचना
हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून कराव्यात असे वाटते
१. विद्यार्थ्यांचा व परिसराचा पायाभूत माहिती अहवाल (बेसलाइन सर्वे) नक्की करावा ज्यामध्ये मुलांची पर्यावरणीय समज नोंदवता येते तसेच परिसरातील विविध पर्यावरणीय व अपर्यावरणीय घटना यांची नोंद करावी. जेणेकरून हस्तक्षेपापूर्वी असलेली माहिती व हस्तक्षेपानंतर असलेली माहिती यातील फरक हा मोजमाप करणे सोपे जाईल
२. छोट्या छोट्या प्रकल्पांच्या साह्याने सुरुवात करावी त्याच्या वैज्ञानिक नोंदी ठेवल्या जाव्यात व हे करण्यासाठी त्यांचे छोट्या प्रमाणात कौतुक नक्की करावे.
३.जमल्यास एखादी छोटेखानी खोली/वर्ग यासाठी राखून ठेवावा जेणेकरून मुलांना वेगवेगळे प्रयोग करणे ते मांडणे सोपे जाईल.
मनोगतं
सुरुवातीला मला निसर्ग म्हणजे फक्त झाड, फुलं आणि पक्षी वाटायचे, पण निसर्ग म्हणजे आपलं आयुष्यच आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं आम्हाला शाळेत शिकवलं आहे. शाळेमध्ये आम्ही पाठकोरे कागद वापरतो. एक टन कागद वाचवल्याने सुमारे १७ झाडं वाचतात हे समजल्यावर कागद वाया न घालवणं ही मला जबाबदारी वाटायला लागली. शालेय सहलीला जाताना आम्हाला नेहमी सांगितलं जातं की "जिथे जाता तिथे स्वच्छता ठेवा." त्यामुळे आम्ही खाण्याचे वेष्टन, प्लास्टिक अशा वस्तू परत आणतो. परिसरात काही कचरा दिसला तर तो उचलतो. रंगपंचमी सारख्या सणांना नैसर्गिक रंग वापरतो. त्यामुळे रंग खेळल्यावरही सगळ्यांची त्वचा सुरक्षित राहते. आम्ही ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू बनवायला शिकलो. शाळेत पर्यावरणावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. यात भाग घेऊन मला माझ्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवता येतात. या सर्व गोष्टींमुळे आता मी स्वतः स्वतःहुन काही पर्यावरणपूरक सवयी अंगिकारल्या आहेत. घरी मी वीज आणि पाण्याचा अपव्यय करत नाही. पंखा, लाईट कमीतकमी वापरते.
परिसा मिलिंद आंबवणे, विद्यार्थिनी.
माझ्या शाळेत अभ्यासाशिवाय व्यक्तिमत्व विकास, आजूबाजूला असलेल्या सामाजिक प्रश्न, पर्यावरण अशा विषयावर तज्ज्ञांच्या मुलाखती, चर्चा, गप्पा, क्षेत्रभेटी, सहली असे अनेक उपक्रम होतात. यातूनच प्रेरणा होऊन मी आणि माझ्या काही मैत्रिणी एकत्र येऊन पालकांच्या मार्गदर्शनाने 'खारीचा वाटा' या नावाने एक उपक्रम गट बनला आहे. या गटाच्या माध्यमातून आम्ही ई-कचरा, प्लास्टिक प्रदूषण यासारख्या समस्यांवर काम करायला सुरुवात केली. प्लास्टिकच्या वाढत्या प्रदूषणाचा विचार करता आम्ही प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या बाजारात आणायच्या आणि प्लास्टिक प्रदूषणाला घालण्यासाठी आमच्या परीने खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही लोकांकडून जुने कपडे घेतो. त्यापासून गरजू महिला, NAB संस्थेतील गरजू अंध व्यक्ति यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेतो. त्या भाजीवाल्यांना, फळवाल्यांना मोफत देतो. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल असं आम्हाला वाटतं. त्यासाठी निधी गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल ॲक्टिव्हिटी' करतो. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 'सोशल मीडिया’ ची मदत घेतो. जनजागृतीसाठी पथनाट्य करतो. यातून समाजातील प्रश्नांविषयी खारीचा वाटा उचलण्याचे समाधान मिळते.
- ओवी चौगुले, विद्यार्थिनी.
आमच्या शाळेत पर्यावरण पूरक जीवन जगायला प्रोत्साहन दिले जाते. विज्ञान विषय नुसताच पुस्तकातून न शिकवता प्रयोग करून, विविध वनस्पती बघून शिकवला जातो. सामान्य जीवनात केमिकल्सचा कमीत कमी वापर करणे, फटाके न फोडणे, कमीत कमी प्रदूषण करणे का आवश्यक आहे हे सांगितले जाते. शाळेतल्या ताई दादांची पर्यावरणपूरक जीवनशैली हे आमच्या डोळ्यांसमोर दिसणारे उदाहरण आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून मी माझ्या रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक जगण्याची सुरुवात केली आहे. घराच्या साफसफाईसाठी आम्ही कमीत कमी केमिकल्सचा वापर करतो. वॉशिंगमशीन मधून कपडे धुऊन झाल्यानंतरचे पाणी आम्ही फरशी धुवायला वापरतो. घरी मागवलेल्या सामानाच्या पॅकिंगचा पुनर्वापर करतो. अशाच पॅकेजिंगमधून आलेल्या पुठ्ठ्यापासून तयार केलेला शूरॅक आम्ही वापरतो. बाकी पुठ्ठे गौरी गणपतीच्या काळात सजावटीसाठी वापरले जातात. आमच्या गणपतीचे मखर पर्यावरण पूरक असते. गच्चीवर आम्ही पर्यावरण पूरक बाग केली आहे. त्यामध्ये खरी माती वापरलेली नसून फक्त कुजलेल्या ओला कचरा आहे. त्यासाठी आमच्या गच्चीत खूप गांडूळे आणि किडे पण आहेत. त्यांच्यामुळे भरपूर पक्षी पण येतात. फुलांवर भरपूर मधमाशा, फुलपाखरे येतात. आम्ही कुजलेला सगळा कचरा गच्चीतल्या वाफ्यांमध्ये टाकतो. वाफ्यांमध्ये असलेल्या गांडूळांमुळे त्याची अजून छान भुसभुशीत माती तयार होते. गच्चीवरच्या बागेद्वारे आम्ही समाजापर्यंतही हा संदेश पोहोचवतो. याची पुढची पायरी म्हणून मी आईच्या मदतीने केमिकल फ्री साबण बनवते. माझ्या साबणामध्ये केमिकल्स नसून वेगवेगळ्या प्रकारची तेलं असतात. अशा प्रकारे तुम्ही पण जर पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारलीत तर तुम्हालाच काय तर सगळ्या समाजालाच हळूहळू फायदा होईल.
- उर्वी सरिता साकेत गोसावी, विद्यार्थिनी.
हा प्रकल्प करताना खूप आनंद होतो आणि आपण पर्यावरणासाठी काहीतरी छान करत आहोत ही भावना निर्माण होते आत्ता जे विद्यार्थी दशेत आहेत हीच मुले पुढे जाऊन भारताचे नागरिक होणार आहेत त्यांच्या जगण्यामध्ये जर पर्यावरण स्नेहित्वाचे बीज आज लागले तर पुढे जाऊन ही मुले कायमस्वरूपी पर्यावरण स्नहित्वाचा विचार करतील. मुले नेहमीच शिक्षकांना देखील शिकवत असतात त्यामुळे या तरुण मुलांच्या कल्पक मना मधून येणाऱ्या अनेक गोष्टी मला सुद्धा सतत प्रेरणा देतात आणि नवनवीन गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्साह देतात लोकमत वृत्त समूहाच्या माध्यमातून हा विषय जर समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचला तर आपण नक्कीच पर्यावरण रक्षणाच्या संवर्धनाच्या विषयात भरीव कामगिरी करू शकू धन्यवाद
- प्रकल्प प्रमुख - अमित टिल्लू
नमस्कार,
आनंद निकेतनमध्ये ' पर्यावरण ' हा विषय शिकवण्याबरोबरच प्रत्यक्षात त्यासाठी काय करता येईल यासाठी ताई/दादा प्रयत्न करीत असतात. आमच्या शाळेत गेल्या २५ वर्षांपासून अनेक कामांसाठी आम्ही पाठकोरे कागदच वापरतो, अनेक ऑफिसेस/कॉलेजमध्ये चांगल्या प्रतीचे कागद एकाच बाजूने लिहिलेले /छापलेले असतात. ते वाया न जाऊ देता आम्ही त्यांचा चित्रकला , हस्तकला तसेच शाळेसाठी नित्य लागणाऱ्या कृतिपत्रिका (worksheets) इत्यादीसाठी वापर करतो. पाण्याचा योग्य उपयोग, प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर, शकतो 'युज अँड थ्रो' या प्रकारच्या वस्तू न आणणे, प्लास्टिक बाटलीचा पुनर्वापर, वाया गेलेल्या कागद, कापडाचा, वस्तूंचा (सीडी शंख, शिंपले इत्यादी)वापर आम्ही हस्तकलांसाठी करतो. 'रिड्यूस, रियुज, रिसायकल' ही त्रिसूत्री वापरून दैनंदिन वस्तू काटकसरीने वापरण्यावर आमचा भर असतो व शाळेतल्या मुलांनाही या सवयी लावल्या आहेत. जवळजवळ ४ वर्षे शाळेत गच्चीवरची बाग हा प्रकल्प सुरू केला होता( जो आता जागेच्या अभावामुळे घेता येत नाही.) ओल्या कचऱ्यातून खते व जीवामृत तयार करणे व त्यांचा आपल्या घरातील बागेसाठी उपयोग करणे यावर भर दिला जातो. याबाबत मुलांना माहिती किंवा व्हिडिओ दाखवला जातो.
मुलांशी सतत पर्यावरणीय जागरूकता यावरही बोलले जाते व सतर्क ठेवले जाते. आणखीनही अनेक उपक्रम घेण्याचा मानस आहे, जेणेकरून पर्यावरण संरक्षण व जतन होईल. यावर्षीचा दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना आनंदाबरोबरच जबाबदारीची जाणीवदेखील आहे.
- मुख्याध्यापक - नीलिमा कुलकर्णी


