
Image: freepik
लहान मूल जेवत नसले तर आई अस्वस्थ होते आणि बाळाला योग्य तो आहार मिळावा म्हणून वेगवेगळे पदार्थ आणि युक्त्या वापरुन त्याला खाऊ घालते. अगदी तसेच प्रयत्न आणि युक्ता मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी शिक्षकांनी करायचे असतात. वाढदिवसाला त्या वर्गातील मुलांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार पुस्तक भेट देणे हा उपक्रम राबवून झाल्यावर वाढदिवसाला पुस्तक भेट घेणे, स्वीकारणे हा उपक्रम शाळेत सुरु केला. वर्षभरात तब्बल सहाशे सातशे पुस्तकं जमा झालीत.
बरेचदा शाळेतल्या वाचनालयातली पुस्तकं गुदमरतात,मोकळा श्वास घ्यायला, बाहेर पडायला त्यांना जागाच नसते. ती घुसमटतात. ग्रंथपाल पद शाळेत नसल्यानं एखादे शिक्षकच वाचनालयाचे काम पाहतात आणि खरंच पुस्तकं तिथेच संपतात. कारण मुलं पुस्तकं फाडतील,पुस्तकांचा हिशेब ठेवावा लागेल,देणेघेणे व्यवहार कटकटीचा.. कोण करेल एवढे सारे? कामाचे ओझे वाढेल. कारणं कुठलीही असोत पण पुस्तकांचं दालन खुलंच होत नाही. मग मुलांमध्ये वाचनाची आवड रुजेल कशी? ती आवड रुजावी म्हणून मी वेगवेगळे उपक्रम राबवले.
हेही वाचा!
टांगलेले वस्त्र वाचनालय
प्रत्येक भाषा शिक्षकास, वर्ग शिक्षकास त्यांच्या वर्गात हा उपक्रम राबवता येईल. जुन्या साड्या असतातच प्रत्येकाच्या घरी. एका साडीचे एक वस्त्र वाचनालय तयार होते. साड्यांच्या घड्या शिवून त्यावर पुस्तकं मावतील एवढी पाकिटं तयार करुन घ्यावीत. हे टांगलेले वाचनालय वर्गात फक्त दोन खिळ्यांच्या आधारावर उभं राहातं. ते वर्गातल्या खिडकीला देखील बांधता येतं. भांडवल किती? जुनी साडी, पुस्तकं आणि दोन खिळे. या अशा टांगलेल्या वस्त्र वाचनालयामुळे रिकाम्या वेळेत मुलं पुस्तकं वाचतील. या पुस्तकांची काळजी घेण्यासाठी वर्गातच मुलांमध्ये ग्रंथपाल तयार करता येतो. त्यांच्यावर पुस्तकं सांभाळण्याची जबाबदारी सोपवता येते.पुस्तकं चोरीला जातील का? या भयापोटीही शाळेतील ग्रंथदालनात असलेली पुस्तकं बाहेरचे जगच पहात नाहीत.ते भय मी ठेवत नाही. माझं सांगणं आहे की ते कोणत्याही शिक्षकांनी ठेवू नये. विश्वासाने मुलांवर जबाबदारी दिली की मुलं पण शिकतात आणि प्रामाणिकपणे काम करतात.

झुलते वाचनालय
शाळेतल्याच दोन झाडांना किंवा भिंतीला किंवा खिडकीला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कपडे वाळत घालण्याची दोरी बांधून त्यावर पुस्तकं अडकवावीत. कपड्यांना लावतो ते चिमटे लावून वृत्तपत्रं टांगावीत. येता- जाता मुलं चिमटे लावून दोरीला अटकवलेली पुस्तकं चाळतील. मुलांना येता जाता हवी ती पुस्तकं वाचता येतील आणि मुलांनी पुस्तकं हाताळली की पुस्तकंही सुखावतील. कपाटात कोंडून न घेता अशा प्रकारे पुस्तकांनाही मोकळ्या हवेत श्वास घेता येईल.

फिरते वाचनालय
प्रत्येक घरात जुने सामान पडलेले असतेच.अडगळीच्या खोलीत पडलेल्या जुन्या प्रवासी बॅगचा वापर करुन हे फिरते वाचनालय सुरु करता येतं. चाकाची बॅग असेल तर भन्नाटच. प्रत्येक इयत्तेतील मुलांसाठी स्वतंत्र एक किंवा दोन बॅगा या फिरत्या वाचनालयासाठी असतील. मुलं जेव्हा त्यांच्या तुकडीला ऑफ तास असेल तेव्हा प्रवासी होऊन ही बॅग चाकावर चालवत वर्गात नेतील पुस्तकं वाचतील आणि पुन्हा बॅग जागच्या जागी नेऊन ठेवतील. कित्ती सोपे. एखादे शिक्षक गैरहजर असतील तेव्हा मुलं वर्गाच्या बाहेर पडणार नाहीत. वाचनास वेळ काढतील. त्यांचं वर्गातच वाचन सुरु होईल.
मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवता येतील अशा 'आयडियाच्या कल्पना' भरपूर असतात शिक्षकांकडे. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न मात्र मनापासून करावेत.
फार थोड्याशा खर्चात उत्तम आणि अभिनव वाचनालयं उभी राहतील. वाचनालयाचे म्हणूनही विविध उपक्रम घेता येतील. त्यात पुस्तकाचं अभिवाचन, गीतावाचन,शुद्ध वाचन,समजपूर्वक वाचन,गाऊया ओवी अशा स्पर्धा वर्गात घेता येतील. मुलांना छोटीमोठी बक्षिसं देता येतील.
– स्मिता गालफाडे.
लाल बहादूर शास्त्री विद्यालय,
भंडारा.
खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
इमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact