मैत्री कशी असावी तर विन्या परेशसारखी.ही दोघं कोण आहेत?

Image:raanguhagar

‘विन्या’ ही गोष्ट आपल्या एका मित्राची आहे हं! हा मित्र असेल सातवी-आठवीत. तो क्रिकेटचा मोठा फॅन असतो. हा विन्या निसर्गाच्या सानिध्यातल्या एका विद्यार्थी वसतिगृहात राहून तिथंच शाळा शिकत असतो. अशा पद्धतीच्या शाळेला आश्रमशाळा म्हणतात. ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात अनेक छोट्या छोट्या गावांच्या परिसरात अशी आश्रमशाळा असते. कारण शाळा मुलांच्या घराजवळ नसते. शाळेत रोज येजा करणं मुलांना शक्य नसतं, ती मुलं अशा शाळेत शिकतात. आई-बाबांपासून लांब राहून शिकतात. आपण कसा आई-बाबांकडं पिझ्झा किंवा एखाद्या महाग गोष्टीसाठी हट्ट करतो, तसं ही मुलं करत नाहीत. त्यांना वसतिगृहात जे अन्न शिजवलं जाईल तेच खावं लागतं. हे पाहिजे न ते पाहिजे, असा काहीच ‘चॉईस’ नसतो.

तर अशी ही विन्याची शाळा. शाळेचा हा परिसर मस्त हिरवाईनं नटलेला, डोंगररांगांनी सजलेला. वळणदार रस्त्यानं इथल्या लाल मातीचं सौंदर्य दाखवणारा. त्यामुळं हे वसतिगृह बहुतेक कोकणातलं आहे. कारण यातली भाषा कोकणी आहे. इथली मुलं गणपतीच्या सुटीसाठी घरी निघाली आहेत. या मुलांना घरी जायला फार आवडतं.

हेही वाचा!

गणपतीत मोदक खायला मिळतात. घरचं जेवण मिळतं. त्यांना आवडतील ते पदार्थ मिळतात. आता गणपतीची सुटी आली आहे. त्यामुळं इथली मुलं आपल्याला न्यायला कधी येतील, हा विचार करत गावच्या दिशेला डोळे लावून बसली आहेत. विन्याच्या बरोबर वसतिगृहात राहून शिकणारा परेशही बाबांची वाट पाहतोय. कधी एकदा घरी जातोय, असं त्याला झालंय. पण त्या दिवशी त्याला न्यायला कोणीच येत नाही. परेश हिरमुसला होतो. वसतिगृहात दोघंच उरतात, परेश आणि विन्या. विन्याला माहिती आहे की, त्याला न्यायला येणारं कोणीच नाही.

तो परेशला सांगतो, तुला आज ना उद्या तुझे बाबा नक्की न्यायला येतील; पण मी मात्र इथून कुठंच जाऊ शकत नाही.’ विन्या परेशला समजावून सांगतो. वसतिगृहात दोनच मुलं उरतात. परेश आणि विन्या. परेश गावाकडं जातो का? नक्की काय झालेलं असतं, त्याचे बाबा का येत नाहीत, आता त्याच्या नव्या मित्राचं- विन्याचं काय होणार, हे पाहायला ‘विन्या’ हा मराठी लघुपट नक्की पाहायला हवा! विन्या आणि परेशची मैत्री एकदम अजब आहे. या लघुपटात फार संवाद नाहीयेत, पण तरीही विन्या आणि परेशच्या मैत्रीतली खास गोष्ट आपल्याला कळते. मैत्री कशी असावी तर विन्या आणि परेशसारखी असं सांगणारा हा लघुपट पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=U68PNIFd3gA यावर क्लिक करा.

लघुपटः विन्या

कुठं पाहाल? - यु्ट्युब

दिग्दर्शकः सुशांत सावंत

 https://www.youtube.com/watch?v=U68PNIFd3gA

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact