शाळेत जाऊन शिकण्यासाठी झगडणाऱ्या दिशाची गोष्ट!

Image: freepik 

मध्य प्रदेशातलं एक छोटंसं गाव. या गावात आपल्याला आपली छोटी मैत्रीण भेटते- दिशा. तिच्या बाबाचं छोटं मातीचं, कुडाचं कौलारू घर. घराच्या बाजूला गुरांचा गोठा. त्याला लाकडाचं कुंपण. दिशा आपल्या मामाकडून घरी परत येते, बाबाला शोधते; तर तिची आत्या आलेली असते. आत्या विचारते,

‘दिशा, मामाकडं काय केलंस?’

दिशा सांगते, ‘खूप खूप अभ्यास केला, पुस्तकं वाचली. तुला माहितीय का, मला मामानं कित्ती कित्ती पुस्तकं दिली होती वाचायला.’

‘दिशा, घरकाम शिक, शाळाबिळा आजपासून बंद. तुझ्या आईलाही पुस्तकं वाचायला आवडायचं. पुस्तकं वाचून काय मिळतं ग.’ आत्या रागावते.

दिशा हिरमुसली होते.

गावाकडच्या कितीतरी मुलींना अर्ध्यावरच शाळा सोडावी लागते, त्यापैकीच एक दिशा. ती फक्त तिच्या वडिलांवरच खूप प्रेम करते, तिचा बाबाही असतो प्रेमळ. तो दिशाला कधीच रागवत नाही. दिशाचं तिची पुस्तकं आणि शाळेवरही खूप प्रेम असतं. तुम्हालाही तुमची शाळा खूप आवडते ना? तिथं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. मित्रमैत्रिणी मिळतात. खेळायला मिळतं. पुस्तकं वाचायला मिळतात. अभ्यास करायला मिळतो.

… पण काही मुलांना अभ्यास करायलाच आवडत नाही. दिशाचं मात्र तसं नाही हं. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तकं वाचते. गणितं सोडवते. तिचं एकच ध्येय असतं, शिकून मोठं व्हायचं.

हेही वाचा!

… पण गावाकडच्या काही मुलींना पुढं शिकू देत नाही, तसेच तिचे बाबा आणि आत्या तिची शाळा बंद करायची ठरवतात. एकदा असा प्रसंग घडतो की, दिशा बरोबर असल्यानं आणि तिला वाचता येत असल्यानं आत्याची फसवणूक होत नाही. तरीही आत्याला तिचं शाळेत जाणं, शिकणं आवडत नाही. दिशाचा बाबा मात्र शांतपणे विचार करणारा असतो. दिशाही बंडखोरी करते आणि असं पाऊल उचलते की आपल्याला ते पाहून गंमत वाटते. शाळेत जाऊन शिकण्याचा दिशाचा प्रयत्न सफल होतो का, ती मोठेपणी काय करते, हे लेट्‌स गो टू स्कूल १०.३० या लघुपटात पाहायला मिळतं. या लघुपटात दिशाचा शिकण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळतो. दिशाचं पाहून आपल्याला अभ्यास करावासा वाटतो. ही शाॅर्टफिल्म यूट्यूबवर पाहाण्यास उपलब्ध आहे. या दिवाळीच्या सुटीत ही फिल्म नक्की पाहा. ही फिल्म पाहून तुम्हाला काय वाटलं हे मला सांगायला विसरु नका!

लघुपटः लेट्‌स गो टू स्कूल १०.३०

https://www.youtube.com/watch?v=xB9faPTONQk

कुठं पाहाल? - यूट्युब

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact