
आनंद मिळावा आणि पुढच्या तासाला काय हा उत्साह वाढावा यासाठी शाळेत घेतला जातो कलारसास्वादाचा तास. आणि या तासाला मुलं एक वेगळ्याच जगात वावरत असतात.
भंडारा जिल्ह्यातील आसगाव म्हणजे चारपाच हजार लोकवस्तीचे गाव. ते गाव मला माझंच मूळ गाव वाटायचं. मुलांना पाठ्यपुस्तकातलं तर शिकवायचंच पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या जगाचीही त्यांना ओळख व्हायला हवी. त्यासाठी त्यांनी नवनवे अनुभव घेवून पाहायला हवेत ही माझी एक शिक्ष्क म्हणून तळमळ असायची. आसगाव म्हणजे खेडेगावच. पण या गावातले मुलं मुली मात्र एकदम स्मार्ट, धडपडे, धाडसी आणि हुशार. जंगल परिसराशी त्यांची चांगली मैत्री . या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या नव्या वाटांचा. माहीत नसलेल्या जगाचा परिचय करुन द्यावा हे सारखं मनात यायचं. नववीला कलारसास्वाद हा तास आमच्या शाळेत होता. हा तास मी घ्यायचे.
माध्यमं किती फास्ट झालीय.जग कुठल्या कुठे पोहचलंय. ही मुलं पण खूप पुढे निघून जातील.उद्योग व्यवसायात गुंततील. पण मुलींचं काय? हुशार, चुणचुणीत मुलींचं भवितव्य काय? या विचारानं मी फारच अस्वस्थ व्हायचे. दोन चार मुलींची लग्नं अकरावीतच ठरवली गेली. जीव कळवळला फार. किशोरी मंचाच्या किती तरी सभा घेतल्या शाळेत. तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाऊ शकता हा आत्मविश्वास या मुलींना दिला. तुम्हीही माॅडेलिंग करु शकता असं त्यांना म्हटल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर शंका नाही तर उत्साह दिसला. पुढे भविष्यात त्यांना माॅडेलिंग करायचं असेल तर किमान प्राथमिक माहिती तरी त्यांना हवी म्हणून कलारसास्वादाला आम्ही माॅडेलिंग, जाहिरात करणे असा उपक्रम घ्यायचो.
हेही वाचा!
एक तास धम्माल अनुभवाचा
कलारसास्वादाच्या तासाला त्यांना इलेक्ट्रॅानिक मीडियातल्या नवनव्या गोष्टींचा परिचय करुन दिला. कॅमेऱ्या समोर कसे बोलायचे? बोलीतले शब्द असले तरी त्याचा लहेजा, फेक, बाज कसा असला पाहिजे? चित्रिकरण कसं करायचं? या विविध मुद्द्यांवर खूप चर्चा व्हायच्या. सर्व मुलामुलींमध्ये फार उर्जा होती. मी मुलामुलींकडून जाहिराती लिहून घेतल्या. जाहिरातीचं चित्रीकरण करण्याआधी आकाशवाणी,दूरदर्शन, विविध चॅनल्सवर दिल्या जाणाऱ्या बातम्यांचे, कार्यक्रमातील निवेदनाचे निरीक्षण करणे,तसेच बोलून पाहणे.स्वत:चे ध्वनिमुद्रण पुन्हा पुन्हा ऐकणे अशा पध्दतीने मुला मुलींनी जाहिरात कलेचा, माॅडेलिंगचा अभ्यास केला. असा कोणत्याही पुस्तकांशिवायचा अभ्यास. उत्साह आणि कुतुहलापोटी केलेला. निरीक्षण आणि अनुभवातून केलेला. हाच खरा अभ्यास असं मला वाटायचं. कलारसास्वाद या तासाला फारच धमाल करायचो आम्ही.
कोणताही दिन विशेष असला की एखाद्या झाडाजवळ, छान स्पॅाट निवडून शाळेकडून शुभेच्छा देण्याचे अनेक व्हिडीओज विद्यार्थी तयार करायचे. मुलं मुली एकत्र बसून थीम ठरवायचे, त्यानुसार स्क्रिप्ट लिहायचे. ती स्क्रिप्ट कशी सादर करायची हे ठरवायचे. मग शिक्षकांच्या मोबाइलचा कॅमेरा ऑन करुन ॲक्शन. टेक.. रिटेक व्ह्यायचे. पाऊण तासात व्हिडीओ शूट व्हायचा. मग व्हाॅटसअपवरील ग्रूपमध्ये व्हिडीओ व्हायरल करायचो. मॅाडेलिंग काय असतं, जाहिरात कशी करतात याचा सरावच होता तो.
पूजा, सोपान, प्राची,उन्नती,परी,प्रणाली,पूनम,हरिष अशी कितीतरी हुशार मुलं. अशाच छोट्या छोट्या जाहिरातीतून नवनवे शिकत गेली. अभिवाचन स्पर्धेतून शब्दांचं उच्चारण शिकली. अभिवाचन स्पर्धेत भाग घेत, पुरस्कार मिळवत मोठी झाली. रंगभूषा स्पर्धा,वेशभूषा स्पर्धेतून नवे तंत्र शिकली. बेधडक बोलायला लागली. स्वत:ची मतं मांडायला लागली.
मागच्या महिन्यात प्राचीचा फोन आला. 'मॅम, इंजिनिअरिंग झाले. महाविद्यालयात टॅापर आहे मी.मला नोकरी करायचीये आणि मॅाडेलिंगही!' मला विश्वासच बसेना.पेरले ते उगवले होते. स्वत:च्या हिंमतीवर ती घरादाराची जबाबदारी पेलत नवे काही घडवेल हा विश्वास मला समाधान देऊन गेला.
आम्ही शाळे बाहेर जेव्हा वर्गातल्या या माॅडेलिंगच्या तासाची चर्चा करतो , कोणाला त्याविषयी सांगतो तेव्हा ' मॅाडेलिंग अन शाळेत.हॅ..काहीतरीच..टाइमपास नुसता.. ' अशा प्रतिक्रिया मिळतात. पण आमच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून् मुलं काय काय शिकली हे कुठे त्यांना ठाऊक असतं?
- स्मिता गालफाडे.
लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा
खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
इमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact