हवामान बदलतंय हे सर्वात आधी कोणाच्या आणि कधी लक्षात आलं?

अचानक एके दिवशी एका व्यक्तीला अमूक गोष्ट सापडली, तमूक गोष्टीचा शोध लागला .. असं आपण गोष्टीत वाचतो अन ऐकतो. ऐकायला वाचायला हे भारी वाटत असलं आणि गोष्टीपुरतं ते पटत असलं तरी ही बाब सगळ्याला लागू होत नाही. जसं हवामान बदल. हवामान बदलाबाबत आता खूप बोललं जात असलं, लिहिलं जात असलं तरी हवामान बदलाचा शोध कोणी लावला, असा प्रश्न आपल्याला पडतोच. तर याचं उत्तर हे अमूक एका तारखेला अमूक एका व्यक्तीने हवामान बदलाचा शोध लावला असं म्हणता येत नाही. खूप वर्षांपासून वेगवेगळ्या अभ्यासकांनी, संशोधकांनी हवामान बदलाबाबत बोलायल सुरुवात केली. त्यावर अभ्यास केला, संशोधन झालं आणि तेव्हा कुठे आज हवामान बदल झालाय, ही बाब जगासमोर आली आहे. 

हेही वाचा!

हवामान बदलाचा शोध कसा लागला?

१८२० मध्ये जोसेफ फुरियर नावाचा फ्रेंच गणित तज्ज्ञ , भौतिकशास्त्रज्ञ म्हणाला, की, पृथ्वी नक्कीक खूप थंड असेल. सूर्यापासून निघणारी सौर किरणं पृथ्वीला उबदार ठेवण्यासाठी पुरेसे नाही. तर पृथ्वी वातावरणामुळे उबदार राहाते.

१८३७ मध्ये स्विस अमेरिकन जीवशास्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ यांनी प्राचीन युरोप आणि उत्तर अमेरिकेतील पूर्वीच्या हिमनद्यांचे पुरावे दिलेत. त्यांनी याद्वारे पूर्वीचं हवामान वेगळं होतं, हे सांगितलं. 

१८५९ मध्ये आयरिश भौतिकशास्त्रज्ञ जाॅन टिन्डल यांनी पाण्याची होणारी वाफ आणि कार्बन डाय ऑक्साइड यामुळे वातावरणात उष्णता अडकते हे पुराव्यासह दाखवले.

अठरव्या शतकाच्या शेवटी स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते स्वॅन्टे अऱ्हेनिअस यांनी हीच गोष्ट जास्त ताकदीने मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या वापरातुन तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइडचं वातावरणातलं प्रमाण निम्म्यानं जरी कमी झालं तरी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान ४ डिग्रीने कमी होईल. अर्थात त्याच्या उलट जर कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं तर तापमान ४डिग्रीने वाढेल. अऱ्हेनिअस याने कार्बन उत्सर्जनास माणूस जबाबदार आहे, असं म्हटलं. 

 Image .bbc

१९३८मध्ये गाय स्टीवर्ट कॅलेण्डर यांनी अऱ्हेनिअसचं म्हणणं सप्रमाण सिध्द करण्यासाठी १९व्या शतकातील तापमानाच्या नोंदी जमवल्या. त्यावरुन ५० वर्षात जागतिक तापमान वाढल्याचं, तापमान गरम झाल्याचं त्याने सिध्द केलं. 

१९६१ मध्ये चार्ल्स डेव्हिड कीलिंग यांनी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडची पातळी वाढतच असल्याचं दाखवलं. 

१९०० ते २००८ च्या दरम्यान इंग्रजी भाषेत क्लायमेट चेंज, ग्लोबल वाॅर्मिंग, ग्रीन हाउस इफेक्ट हे शब्द आले. १९७० मध्ये याची जगात चर्चा सुरु झाली तर १९८० मध्ये हवामान बदल याकडे जगानं गांभिर्यानं लक्ष द्यायला सुरुवात केली. 

हवामान बदलाच्या शोधाचा हा इतिहास आहे. पण वैज्ञानिक गोष्टींना , शोधांना पुरावे लागतात. तसेच हवामान बदलाबाबतही ते आवश्यकच होते. एकीकडे हवामान बदलाचा अभ्यास सुरु होता. त्यातून शेकडो वर्षांपूर्वी हवामान कसं होतं आणि आता त्यात काय बदल झाला, हे अभ्यासणं सुरु होतं, तर यासोबतच हवामान बदलाचे पुरावेही जमवणं सुरु होतं. 

. Image: nytimes

हवामान बदलाचा अभ्यास कसा केला गेला?

साधारणत: एक शंभर वर्षांपूर्वीचं पृथ्वीवरचं हवामान कसं होतं हे अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञ १०० वर्षांपूर्वीचे वृक्षं जे आजही जिवंत आहेत, त्या वृक्षांच्या बुंध्याच्या घेराचा, त्याच्या आतल्या वर्तुळांचा अभ्यास करतात. पण शास्त्रज्ञांना हजारो, लाखो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरच्या हवामानाचा अभ्यास करायचा असेल तर ते सरोवर, समुद्रातील गाळाचा, अंटार्क्टिका येथील बर्फाच्या आतील भागाचा (आइस कोअर) अभ्यास करतात. हा बर्फाचा आतला भाग मशीनद्वारे खोदून (ड्रिल करुन) काढला जातो. बर्फाच्या आतल्या थरातला भाग जास्त गोठलेला (कडक) असतो. बर्फावरील थर पृथ्वीच्या हवामानात झालेल्या बदलाचा अंदाज देतात. बर्फाच्या थरामध्ये हवेचे बुडबुडेही समाविष्ट असतात. बर्फाच्या प्रत्येक थरातील या बुडबुड्यांवरुन किती कार्बन डाय ऑक्साइड आहे याचा अभ्यास केला जातो. बर्फाच्या आतील प्रत्येक थर पृथ्वीच्या हवामानात वेळोवेळी झालेली घडामोड सांगतो. झाडाच्या बुंध्यांचा घेर, बर्फाचा आतील भाग आणि समुद्रातील गाळ यांचा अभ्यास करुन शास्त्रज्ञ आपली निरीक्षणं नोंदवतात. या निरिक्षणांची तुलना  वर्तमानातल्या हवामानाच्या नोंदीशी केली जाते आणि हवामान बदलाबद्दलची माहीती सांगितली जाते.

हवामान बदल असा फक्त वृक्षांच्या बुंध्याचा घेर, त्याची आतील वर्तुळं, बर्फाचा आतील थर आणि समुद्रातला गाळ यांचा अभ्यास करुनच सांगितला जातो असं नाही तर हवामान बदलाचे पुरावे आता निसर्गातही दिसू लागले आहेत.

हवामान बदलाचे पुरावे काय ?

१. १९व्या शतकापासून पृथ्वीचं तापमान सरासरी १ डिग्री सेल्सिसने वाढलं आहे. गेल्या ४० वर्षांपासून पृथ्वीवरच्या तापमानात वाढ नोंदवली जात आहे. २०१६ आणि २०२०हे सर्वात गरम वर्षं म्हणून ओळखले गेले. वाढतं तापमान हवामान बदलाचा पुरावा आहे.

२. पृथ्वीचं वाढलेलं तापमान समुद्र पोटात घेतो. समुद्राच्या वरच्या १०० मीटर पातळीचं तापमान ०. ३३ डिग्री सेल्सिअसनं वाढलं आहे. ही वाढ १९६९पासून नोंदवली जात आहे.

3. ग्रीनलॅण्ड आणि अंटार्क्टिका खंडावरील बर्फाची चादर मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं आढळून आलं आहे. १९९३ ते २०१९ या काळात ग्रीनलॅण्डमधील सरासरी २७९बिलियन टन बर्फ कमी झाला आहे तर अंटार्क्टिकामध्ये १४८ बिलियन टन बर्फ कमी झाला आहे. म्हणजे तो वितळत चालला आहे.

४ जगभरात हिमनद्या वेगानं वितळत आहे. आल्प्स, हिमालय, ॲण्डी, राॅकिज , अलास्का आणि आफ्रिकेतील हिमनद्या वेगानं वितळत असल्याचं अवकाशातून घेतलेल्या छायाचित्रावरुन लक्षात आलं आहे.

५. उपग्रहांनी केलेल्या निरिक्षणानुसार उत्तर गोलार्धातील वसंत ऋतूतील बर्फाचं आच्छादन कमी झालं आहे. येथील बर्फ वेगानं वितळत आहे.

 Image: lcsun-news

६. जागतिक समुद्राची पातळी ८ इंचांनी अर्थात २० सेंटीमीटरने वाढली आहे. ही पातळी वेगानं वाढत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

७. आर्क्टिक महासागराची व्याप्ती आणि त्याची घनता गेल्या काही दशकांपासून कमी होत आहे.

८. तापमानात टोकाचे बदल झालेले १९५० पासून अनुभवण्यास येत आहे. जास्त तापमानाच्या नोंदी वाढत आहे तर कमी तापमानाच्या नोंदी कमी होत आहे तसेच वाढत्या तापमानासोबत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. निसर्गातले हे बदल पृथ्वीवरचं हवामान बदलतं आहे, हे सांगण्यास पुरेसे आहेत.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact