
Image: theprint
जे माणसाला जमतं ते प्राण्यांना जमत नाही अशा गोष्टींची यादी मोठी आहे. पण म्हणून प्राण्यांना माणसांप्रमाणे काहीच जमत नाही असं मात्र अजिबात नाही. राकूने काय केलं हे समजून घेतलं तर प्राणी काय करु शकता हे सहज समजेल आपल्याला. पण हा राकू कोण आहे? तर राकू म्हणजे एक वानर. ओरॅंगउटान ही वानराची एक प्रजाती. बिनशेपटाचे माकड. राकू हा ओरॅंगउटान या प्रजातीतला वानर. या राकूने अशी गोष्ट केली आहे ज्यामुळे प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या जगभरातल्या संशोधकांचं लक्ष वेधलं गेलं. सामान्य माणसांनाही राकूच्या कृतीचे आश्चर्य वाटले. असं काय केलं राकूने?- तर राकूने त्याला झालेली जखम स्वत: औषधोपचार करुन बरी केली.
हेही वाचा!
स्वत:वर उपचार करणाऱ्या राकूची गोष्ट
इंडोनेशियातील संरक्षित पर्जन्यवनाच्या क्षेत्रात सुआक बलिअमबिंग नावाचं संशोधन क्षेत्र आहे. या परिसरात राकूचं भांडण दुसऱ्या ओरॅंगउटानशी झालं. दोघांच्यात मारामारी झाली. या मारामारीत राकूला उजव्या डोळ्याखाली जखम झाली. शास्त्रज्ञांचं राकूकडे लक्ष होतं. आता हा जखमी झालेला राकू काय करणार? याकडे शास्त्रज्ञ बारीक नजर ठेवून होते. जखम झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून राकूने जी कृती केली त्याकडे शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं गेलं.
राकूने त्याच भागात असलेल्या एका वनस्पतीचा वापर आपली जखम बरी करण्यासाठी केला. हे झाड वेदनाशामक, जीवाणूनाशक, बुरशीनाशक आणि ज्वलनविरोधी घटकांमुळे ओळखलं जातं. अकार कुलिंग हे या वनस्पतीचं नाव. राकू या झाडाची पानं चघळायचा. ते चघळताना तोंडात जो द्राव तयार व्हायचा तो द्राव राकू आपल्या जखमेवर लावायचा. मग चघळून चोथा झालेली ती पानं तो जखमेवर लावायचा. अशा प्रकारे राकूने स्वत:च्या जखमेवर मलमपट्टी केली.
अकार कुलिंग ही वनस्पती राकू खातो. दलदलीच्या जंगलात ही वनस्पती ओरॅंगउटान हे प्राणी फारच क्वचित खातात. पण राकू ते खात होता. त्याचं कारण त्याला आपली जखम लवकर बरी करायची होती.

Image: theprint
जंगली प्राण्यांनी आपल्या जखमेवर अशा प्रकारे वनस्पतीचा उपयोग करुन स्वत:वर उपचार करण्याची ही पहिलीच केस राकूच्या निमित्ताने शास्त्रज्ञांद्वारे नोंदवली गेली आहे.
राकू हा १९८९ मध्ये जन्माला आला आहे. राकू म्हणजे या जंगलातला अत्यंत आक्रमक नर म्हणूनही ओळखला जातो. संशोधक म्हणतात की ओरॅंगउटान यांनी आपल्या जखमेवर असे उपचार करणे हा काही योगायोग नव्हता. तर राकूने जे केलं ते विशिष्ट उद्देशाने केले. त्याने त्या विशिष्ट वनस्पतीचा उपयोग केवळ जिथे जखम झाली होती तिथेच केलेला होता. अन्यत्र कुठेही नाही. शिवाय हा उपाय एकदा नाही तर आपली जखम पूर्ण बरी होईपर्यंत तो हे करत होता. त्यामुळे राकूची जखम चिघळली नाही आणि त्या जखमेचे व्रणही राहिले नाही. याचा अर्थ या विशिष्ट वनस्पतीचा जखमेवर उपयोग करण्याची पध्दत राकूच्या पूर्वजांमधेही होती हे यातून सिध्द होतं असं संशोधक सांगतात.

Image: michaelsavage
राकूने जे केलं त्याला मेंदूच्या आकलन क्षमतेची गरज असते. याचा अर्थ या विशिष्ट वनस्पतीचा जखमेवर उपचार करण्याची पध्दत त्यांच्या पूर्वजांमध्येच होती.
ओरॅंगउटाने हे जगातल्या मोठ्या वानरांपैकी एक आहे. चिंपाझी, बोनोबोस, गोरिला यांच्याप्रमाणेच ओरॅंगउटान यांचाही माणसांशी जवळचा संबंध आहे.
संशोधक म्हणतात की वनस्पतींद्वारे उपचार करण्याची पध्दत राकूच्या पूर्वजांनी शोधली असावी. ती वापरुनही पाहिली असावी. राकू जिथे जन्मला त्या भागातल्या इतर ओरांगउटानचं निरिक्षण करुन तो जखमेवर वनपस्पतींद्वारे उपचार करण्याची पध्दत शिकला असावा.
अकार कुलिंग ही वनस्पती चीन, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम आणि आग्नेय आशियात आढळते. तिथे ती मलेरिया सारख्या आजारांवर पारंपरिक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तर ओराॅंगउटान ही वानराची प्रजाती जंगलात झाडांवर राहातात. वानरांच्या इतर प्रजातींपेक्षा त्यांना एकट्याने राहायला आवडतं. जंगलात आढळणाऱ्या फळांवर ते जगतात. एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर झुलत राहातात. त्यांची निरिक्षण शक्ती दांडगी असते. समस्या निवारणाचं कौशल्य ते यातूनच शिकतात. हे कौशल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही जातं.
राकूकडे स्वत:च्या जखमेवर उपचार करण्याचं कौशल्य हे असं त्याच्या आधीच्या पिढीकडून आणि त्याच्या निरिक्षण शक्तीतूनच आलं असावं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact