- राजीव तांबे

Image:- vakinha
निवान म्हणाला, 'आमच्या शाळेच्या वरती एक नवीन मजला बांधत आहेत. आणि आज आमच्या ताई आम्हाला तिथे घेऊन गेल्या होत्या..'
'तुम्ही कशाला तिकडे गेलात? तिकडे काय पाहायचं?' आजोबा वैतागून म्हणाले.
निवान म्हणाला, 'तिथे आम्ही एक विचित्र प्रकार पाहिला. ते पाहताना आम्हा मुलांची तर हसून हसून मुरकुंडी वळली.'
'म्हणजे काय झालं काय असं?'
'बारापैकी तीन वर्गखोल्या मस्त बांधून झाल्या आहेत. तर एक माणूस हातात पाइप घेऊन त्या मस्त गुळगुळीत भिंतींवर टूर्र टूर्र करुन पाणी उडवत होता. सगळ्या भिंती ओल्या आणि खाली सगळा चिखल. आणि तरीपण तो पाणी फवारतोच आहे.'
पदराला हात पुसत आजीने विचारलं, 'मग काय झालं?'
'अगं त्यावेळी दक्ष म्हणाला, ‘हे काय असे भिंतीला पाणी घालतात? भिंत म्हणजे काय बाग आहे का? की भितींच्या आत झाडं आहेत?’ हे ऐकताच आम्ही सगळे फसफसून हसू लागलो.'
'बरोबरच आहे त्या माणसाचं..' असं आजीने म्हणताच निवान किंचाळला, 'काऽऽय? भितींच्या आत झाडं असतात आणि ती पाणी पित असतात?'
आज्जो म्हणाले, 'अरे भिंतीत झाडं नसतात पण तरीही भिंतींना पाणी पाजावं लागतं.'
'पण काऽऽ?''
भिंती मजबूत होण्यासाठी.'
'आज्जो नीट सांगा ना..'
हेही वाचा!
'तुमच्या त्या तीन वर्गखोल्यांच्या भिंती बांधून झाल्या की त्या भिंतींच्या विटांवर सिमेंटचा एकसारखा थर देण्याच काम गवंडी करतात. यालाच इंग्रजीत प्लास्टरींग करणं असं म्हणतात. प्लास्टरींग केल्याने भिंत गुळगुळीत तर दिसतेच पण बांधकाम अधिक पक्कं होतं.'
'आज्जोऽऽ पण त्यासाठी भिंतीला पाणी का पाजायचं? ते नाही कळलं.'
'सांगतो. सिमेंट ही अतिशय मऊ राखाडी रंगाची कोरडी पावडर असते.कॅल्शियम सिलीकेट आणि कॅल्शियम ॲल्युमिनेटस् या दोन रासायनिक पदार्थांचं मिश्रण म्हणजे सिमेंट. सिमेंटमधे पाणी मिसळलं की रासायनिक बदल होऊन सुईसारखे लांब स्फटिक तयार होतात. हे स्फटिक एकमेकांच्यात अगदी घट्ट बसल्याने प्लास्टर कडक व मजबूत होतं. आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. यासाठी किमान एक आठवड्याचा अवधी लागतो.'
'बापरे! म्हणजे एक आठवडा रोज भिंतींना पाणी पाजलं पाहिजे.'

Image: freepik
बरोब्बर. सिमेंटमधे भरपूर पाणी शोषून घेण्याची क्षमता असते ती यासाठीच! सिमेंट एकसारखं ओलं राहणं गरजेचं असतं. म्हणून पाणी कमी पडलं तर..'
आज्जोंना थांबवत निवान म्हणाला, 'मी सांगतो. पाणी कमी पडलं तर, रासायनिक प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे ते सुई सारखे स्फटिक तयार होणार नाहीत. त्यामुळे प्लास्टर भुसभुशीत होईल.'
'शाबास! एकदम बरोबर.'
निवानला शाबासकी देत आजी म्हणाली, 'जे कुणाचिही तहान ओळखून त्यांना पोटभर पाणी पाजतात अशीच माणसं राजवाडा उभारतात' ही हुनान प्रांतातली चिनी म्हण लक्षात ठेव.
rajcopper@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact