सई आणि उंदीर – भाग ५

दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिघंही अपेक्षेने पिंजऱ्याकडे गेले, पण छे! पिंजऱ्यात उंदीर तर नव्हताच, पण मुंग्यांची भलीमोठी रांग तिथे आली होती. आता सकाळच्या घाईच्या वेळेत त्या मुंग्या घालवण्याचं अजून एक काम वाढलं. आणि शिवाय उंदराने हॉलमधल्या दिवाणावरची चादर कुरतडली होती ते वेगळंच! मग त्या रात्री सईने पिंजऱ्यात रुमाल ठेवला… तो तसाच! एक दिवस पोळीचा तुकडा ठेवला, त्याचाही काही उपयोग झाला नाही. उलट उंदराने सईचा नवीन बूट कुरतडला. मग सईने चिडून तो अर्धा कुरतडलेला बूट आत ठेवला… पण छे! पिंजऱ्याच्या आत ठेवलेलं उंदराला काहीच नको होतं. उंदीर पिंजऱ्यात पकडण्यासाठी बाबाने दिलेली ८ दिवसांची मुदत संपत आली होती आणि खरं सांगायचं तर आता सईला पण त्या उंदराने नुकसान करण्याचा कंटाळा आला होता. त्यापेक्षा उंदराच्या गोळ्या आणून टाकाव्यात हा बाबाचा उपाय बरोबर आहे असं तिलाही वाटायला लागलं होतं. आणि त्यामुळे आठव्या आणि शेवटच्या दिवशी सईने पिंजऱ्यात काही ठेवलंही नाही आणि तिने उंदराची वाटही बघितली नाही. पण एक मात्र झालं, की सईने आजवर कधीही न आवरलेली तिची खोली आणि कपाटं आवरली, सामान नीट लावलं आणि सगळं सामान कपाटाच्या आत सुरक्षित ठेऊन ती झोपून गेली.

तर तिला उंदराचं स्वप्न पडलं. स्वप्नात त्या उंदराने स्वंयपाकघरातून खायला क्रीमची बिस्किटं चोरून आणली होती. सई त्याला सांगत होती, की ती बिस्किटं तू खाऊ नकोस, ती मला बसमधल्या डब्यात न्यायची आहेत. पण उंदीर तिचं ऐकतच नव्हता. सईने त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो तिच्या हाती लागेना. तो पलंगावरून खुर्चीवर, तिथून टेबलवर, तिथून कपाटावर, तिथून दारावर, तिथून खिडकीवर, खिडकीच्या पडद्यावरून खाली असा सुसाट पळत होता. सई पण त्याच्या मागे पळत होती. एकदा सईने त्याला ऑलमोस्ट पकडला, पण तो तिच्या हातून सुटला आणि पळत पळत टेबलवरच्या पिंजऱ्यापाशी गेला. आणि सईने काही म्हणायच्या आत सईपासून लपण्यासाठी तो पिंजऱ्यात शिरला. आत गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण पिंजऱ्यात अडकलोय. मग तो सुटण्यासाठी धडपड करायला लागला. त्याच्या धडपडीने त्या धातूच्या पिंजऱ्याचा आणि त्याच्या आतल्या सापळ्यांचा आणि सगळ्या भागांचा मिळून बराच खडखड आवाज यायला लागला.......

त्या खडखड आवाजानेच सईची झोपमोड झाली, आणि ती इरिटेट होऊन उठली…

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact